पुणे :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने ‘महामानवाला अभिवादन’ हा लोकराज्यचा एप्रिलचा विशेषांक तयार करण्यात आला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टीचे) महासंचालक कैलास कणसे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
येथील बार्टीच्या कार्यालयातील महासंचालकांच्या दालनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विभागीय कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, माहिती सहायक संग्राम इंगळे उपस्थित होते.
यावेळी कैलास कणसे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असामान्य आणि अव्दितीय व्यक्तीमत्व होते. देशातील गरीब, पिडीत, शोषीत, दलित, महिला, कामगारांसह सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. डॉ. बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केली, असून प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेल्या आलौकीक कार्याची छाप आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या ‘महामानवाला अभिवादन’ हा अंक अत्यंत वाचनिय आणि संग्रही ठेवण्यासारखा आहे. या विशेषांकाच्या माध्यमातून या महामानवाला अनोखी आदरांजली वाहण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहन राठोड म्हणाले, या विशेषांकाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकण्याचे काम करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेबांचे कार्य अलौकीक असून ते दूरदृष्टी असणारे नेते होते, त्यांच्या कार्याला या विशेषांकाच्या माध्यमातून उजाळा मिळाला आहे. लोकराज्यचा हा विशेषांक प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्यांकडे विक्रीसाठी ठेवण्यात आला असून विभागीय माहिती कार्यालय, पुणे, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.