विवेक ताम्हणकर
कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.
कोकण किनारपट्टी आजही पर्यटकांच्या पसंतीचा भाग मानली जाते. कोकणात जाण्यासाठी अनेक पर्याय उलपब्ध आहेत, तरी बोटींमधून प्रवास करण्याची धम्माल कशात नाही, असंही मानलं जातं. वाहतुकीच्या दृष्टीने चांगला असणारा हा पर्याय लवकरात लवकर खुला व्हावा, अशी मागणीही नेहमी केली जाते.
सुमारे पन्नास वर्षांपूवीर् चाकरमान्यांची एकमेव पसंती कोकण बोटीलाच असायची. त्यातूनच ते विजयदुर्ग, देवगड, वेंगुलेर् असा प्रवास करायचे. १८४५ च्या सुमारास ब्रिटिशांनी प्रवासी सेवेसाठी बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला. १९४० ते १९५० च्या सुमारास संत तुकाराम, संत रामदास, अँथोनी अशा बोटी नावारूपाला आल्या होत्या. त्या वेळी प्रवाशांची क्षमता अडीशे ते तीनशेच्या आसपास होती आणि तिकीट अडीच, तीन, चार रुपये असायचं. पुढे बोट उद्योगाला मोठ्या प्रमाणात चलती मिळाली आणि त्यानुसार तिकीट दरही वाढले.
साधारण या बोटीवर तीन डेक असायचे, त्यांचे दर लोअर डेक १२ रु. अपरडेक १६ रु., केबीन ४० रु. असे असायचे. मुंबईतून चाकरमानी याच बोटीने मुंबई ते मालवणचा प्रवास करू लागले. तेव्हा माझगावच्या भाऊच्या धक्क्यावर गर्दी जमायची ती सकाळी ९ वाजताची कोकण बोट पकडण्यासाठी.
बोट सुटताना तीन भोंगे व्हायचे. दुसऱ्या भोंग्याला सर्व प्रवासी बोटीत चढायचे आणि तिसऱ्या भोंग्याला शिडी उचलली जायची. सकाळी १० वाजता काळेकुट्ट धुरांचे लोट आकाशात सोडत बोट मुंबई बंदर सोडायची. एकदा बोटीत स्थानापन्न झालं की वेगळंच विश्व निर्माण व्हायचं. तिथे गप्पांचे फड रंगत जायचे. जेवण असो की नाश्ता, सर्व जण एकत्र बसून त्याची मजा लुटायचे अशी माहिती त्याकाळात बोटीने प्रवास केलेले देवगड प्रवाशी आकाराम ताम्हणकर यांनी दिली.
मात्र, रामदास बोट बुडाली ते प्रकरण चांगलंच गाजलं. पुढे बॉम्बे स्टीम कॉपोर्रेशनने रत्नागिरी, चंदावती, इरावती अशा नवीन बोटी ताफ्यात सामील केल्या. ग्राहकांना खुश करण्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था त्या वेळी सर्वप्रथम सुरू करण्यात आली. त्याच वषीर् मार्चमध्ये चंदावती बोट मालवणच्या बंदरात रुतून बसली ती कायमचीच. पुढे १९६४ साली काही कारणांनी ही कंपनी बंद पडली. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गोव्यातील उद्योजक विश्वासराव चौगुले यांच्या स्टीमशिपमार्फतच्या चौगुले बोटसेवा पुन्हा सुरू केली. चौगुले स्टीमशिपने रोहिणी, सरीता, कोकणसेवक बोटी सुरू केल्या. मात्र, या बोटींचं आथिर्क गणित जमेना. त्यातच मालवणात बंदरात रोहिणी बुडाल्याने कंपनीला तोटा सहन करावा लागला. नंतर खाजगी उद्योजक पुढे येत नसल्याने या सेवेचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं.
मुंबई -गोवा सागरी वाहतूक मोगल लाइन्सच्या अधिपत्याखाली चालवण्यात आली. पण या सेवेत कोकणातील प्रमुख बंदरं वगळण्यात आली. १९८८ मध्ये मोगल लाइन्स वाहतूक सेवाही बंद पडली. ब्रिटिशांनी नफ्यात चालवलेली बोटसेवा तोट्यात का आली, याचं कारण अजून लक्षात आलेलं नाही. कोकणवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी बोटसेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी नेहमीच केली जाते. पर्यटनाच्या दृष्टीने या उद्योगाला चालना मिळू शकतो. ही सेवा पुन्हा एकदा सुरू झाल्यास त्यास प्रवाशांचा नक्कीच प्रतिसाद लाभेल. मात्र, ही सेवा सुरू होण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणं गरजेचं आहे.