विनया वालावलकर
घर म्हटलं कि त्यात थोडेफार मतभेद, रागवे-रुसवे वगैरे आलेच… आणि त्यातूनही जर त्या घरात भावंडं असतील तर मग काय बघायलाच नको… माझं घर देखील त्याला अपवाद नाही… माझ्या घरात मी आणि माझा धाकटा भाऊ… मी मोठी असल्यामुळे शक्य तितक्या वेळेस त्याच्यावर ‘ताईगिरी’ करायचा प्रयत्न करत असायचे.. आणि मग त्यातून भांडणं झाली कि तक्रार आजी कडे जायची.. न्यायनिवाड्याचं काम आजी कडे असायचं.. आम्हा दोघांकडेही आपापले बरोबर मुद्दे असायचे.. मग आजी पुढे मोठा प्रश्न निर्माण व्हायचा.. आता नेमकी बाजू कोणाची घ्यायची.. अशा वेळी तिच्याकडे एक ‘भारी आयडिया’ असायची.. ती आम्हाला सांगायची की, “तुम्ही दोघेही बरोबर आहात तरीही तुमच्यात अशी भांडणं का होतात माहित आहे? कारण आपल्या देवांकडून ते आपल्याकडे आलंय. असं म्हणून गोष्ट सुरु व्हायची.. मग आम्ही भांडण विसरून त्या गोष्टीत अडकून जायचो” नंतर नंतर तर आमच्या भांडणामुळे कोणी आम्हाला ओरडलं तर आम्हीच देवांची गोष्ट सांगून स्वत:च्या भांडणाचं समर्थन करायचो. अगदी लहान असतांना खूप गंमत वाटायची या सगळ्याची.. मग हळू हळू मोठे झाल्यावर भांडणं पण बदलली आणि ती भांडणं आजीकडे जाणं हि बंद झाली.. आता तर आजी पण नाही राहिली.. पण आजीने सांगितलेली गोष्ट मात्र आजही आठवते..
मी मुळची वालावलकर.. म्हणजे कुडाळ मध्ये असलेल्या वालावल गावची.. जिथे आमच्या कुलदैवताचं म्हणजेच लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे… कुडाळ पासून १५ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.. सूर्यभान आणि चंद्रभान प्रभू-देसाई बंधूनी बांधलेलं हे मंदिर वास्तुकलेच एक सुंदर उदाहरण आहे.. या मंदिराचे संपूर्ण बांधकाम सागवान लाकडात केलेले आहे.. त्या लाकडामध्ये विविध देवदेवतांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत.. खांबांपासून ते छतापर्यंत हे कोरीवकाम दिसतं.. मंदिरासमोर एक सुंदर दिपमाळ आहे.. या मंदिराजवळच कमळांनी भरलेला एक सुंदर तलाव आहे.. या मंदिरापासून थोडं पुढे घाटी चढून गेलं कि तिथे देवी माउली चं मंदिर आहे..
माउली देवी आणि लक्ष्मीनारायण हे दोघे भाऊ – बहिण आहेत असं म्हणतात.. तर या भावाबहिणींची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे.. असं म्हणतात कि, आता माउली च जिथे मंदिर आहे तिथे पूर्वी हे दोघे भावंड रहात होते.. एक दिवस बहिण भावाला खालच्या तलावावरून तिच्यासाठी पाणी आणायला सांगते.. आज्ञाधारक भाऊ लगेच निघतो.. तो तलावावर पोहोचतो देखील.. पण तेवढ्यात त्याला कसला तरी सुगंध येतो… तो त्या सुगंधाच्या दिशेने जातो तेव्हा त्याला दिसतं कि काही कुळवाडी लोकं तिथे तांदळाचे वडे तळत आहेत.. आता झाली का पंचाईत.. देवाला तांदळाचे वडे अतिशय प्रिय.. तो स्वत:ला अजिबात थांबवू शकला नाही.. तो जाऊन वडे खायला बसला.. कुळवाडी देखील खुश… देव स्वत: आपल्याकडे जेवायला आले म्हटल्यावर ते हि उत्साहाने त्याला वडे देऊ लागले.. या सगळ्यात बहिणीने सांगितलेलं काम देव साफ विसरून गेला.. इथे मात्र बहिणीला भावाची काळजी वाटायला लागली.. शेवटी काळजीपोटी माउली आपल्या भावाला शोधायला जाते.. तलावाजवळ येऊन ती जे दृश्य बघते त्याने तिचा संताप अनावर होतो.. आपल्यासाठी पाणी आणायचं सोडून आपला भाऊ आरामात वडे खात बसला आहे हे तिला सहन होत नाही.. ती भावावर अतिशय चिडते… आणि “ताईगिरी” करत सरळ त्याच्या एक सणसणीत थप्पड मारते.. सगळे अवाक् होऊन हा प्रकार बघत राहतात.. ताई आपल्या भावाला सांगते कि आता तू परत घरी यायचं नाही.. इथेच रहायचं.. मला तुझं तोंड देखील बघायचं नाही.. आपल्या ताई चा राग बघून भाऊ पण घाबरतो… मग तो तिची माफी मागायला लागतो.. आता शेवटी ताईच ती.. कितीवेळ रागावणार आपल्या लाडक्या भावावर.. हळू हळू ती शांत होते.. पण ताई असली तरी देवी.. एकदा दिलेला शाप कसा परत घेणार.. म्हणून मग ती त्याला उ:शाप देते.. आणि सांगते कि तू इथेच राहायचं पण माझ्या दर्शनाला जो कोणी येईल तो आधी तुझं दर्शन घेऊन मगच माझ्याकडे येईल… ही प्रथा अजूनही खरोखरीच चालू आहे.. असं म्हणतात कि या सगळ्या प्रकारामुळेच लक्ष्मीनारायणाचा एक गाल दुसऱ्या गालापेक्षा जरा सुजलेला आहे..
आता बोलून चालून हि आख्यायिका.. खरं खोटं काय ते आता त्या भावंडांनाच माहिती.. पण अशा अनेक मजेशीर गोष्टी ऐकण्यात आम्हा भावंडांचं बालपण मात्र खूप छान गेलं.. आणि आपल्याच देवाची अशी गोष्ट ऐकून आम्ही भावंडं भांडण हा आमचा जन्मसिद्ध अधिकार असल्याप्रमाणे पुढच्या भांडणाच्या तयारीला लागलेलो असायचो…