विवेक ताम्हणकर
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या माध्यमातून या महामार्गासाठी जमिनी गेलेल्या सिंधुदुर्गातील प्रकल्पग्रस्थांच्या हाती तब्बल ७३५ कोटी रुपये पडले आहेत. त्यामुळे काळात आर्थिक उलाढाल मंदावलेल्या येथील बाजारपेठांना चांगले दिवस येऊ लागले आहेत. या रक्कमेवर कोणताही कर आकारला जात नसल्याने प्रकल्पग्रस्थही खुश आहेत. दरम्यान येणारा गणपती सणही आनंदात साजरा होईल अशे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
खारेपाटन ते झाराप या सिंधुदुर्गातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी एकूण ३५ गावांतील १४३ हेक्टर जमिन शासनाला संपादीत करावी लागली. त्यासाठी भुमिपुत्रांच्या खात्यावर जमिनीच्या मोबदल्यात शासनाला एकूण ७३४ कोटी ८० लाख, २६ हजार एवढी रक्कम जमा करावी लागली. आणि या रकमेचे वाटपही सुरु झाले. यात कणकवली तालुक्यातील हळवल व वागदे तर कुडाळ तालुक्यातील ओरोस व कसाल या गावांनी या भरपाईवर आक्षेप घेतल्याने या चार गावांची भरपाई तेवढी प्रलंबीत राहीली आहे. उर्वरीत ३१ गावांनी निवाडे स्विकारल्यानंतर येथील जमीनदारांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवातही झाली आहे.
या चौपदरीकरणाच्या प्रकल्पामध्ये कणकवली व कुडाळ असे दोन तालुके येत असून त्यात कणकवली तालुक्यातील २२ व कुडाळ तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे. कणकवली तालुक्याला एकूण संपादीत ९९.५८ हेक्टर क्षेत्राचे ४८५ कोटी ६७ लाख ४५ हजार ८०५ एवढी रक्कम जमिन मोबदल्याच्या रुपात प्राप्त झाली आहे. तर कुडाळ तालुक्यात संपादीत ४२.२५ हेक्टर क्षेत्राचे २४९ कोटी १४ लाख ५६ हजार ५९८ एवढे रुपये प्राप्त झाले आहेत. यामध्ये कणकवलीतील हळवल व वागदे तर कुडाळ तालुक्यातील कसाल व ओरोस गावांचा सामावेश नाही. या मध्ये कणकवली तालुक्यातील ओसरगांव ला जमिन मोबदल्याच्या रुपात ९६ कोटी ८२ लाख, ८३ हजार २६३ एवढी तर कुडाळ तालुक्यातील हुमरमाळा गावाला २८ कोटी, ९४ लाख, ४२ हजार १९२ रुपये एवढी सर्वाधीक नुकसान भरपाई प्राप्त झाली आहे.
खरतर महामार्गालगत जमीन असूनही या जमिनींना भविष्यात एवढा भाव मिळेल, आणि तो ही टॅक्स फ्री च्या रुपात असे फारसे कुणाला वाटलेही नव्हते. शासनाचा रेडी रेकनरचा दरही म्हणावा तसा समाधानकारक नव्हता. या पूर्वी झालेल्या झाराप ते पत्रादेवी या चौपदरीकरणासाठी तेथील जमिनदारांना खुप कमी पैसे मिळाले होते. मात्र दिवस बदलले. नोटाबंदी आणि जी. एस. टी. मुळे मंदीच्या खाईत लोटलेल्या सिंधुदुर्गला या चैपदरीकरणाच्या माध्यमातून जणुकाही संजिवनीच प्राप्त झाली आहे. येथील उलाढालीत अनपेक्षीतपणे ७३५ कोटींची भर पडल्यानंतर ही रक्कम ठेवींच्या रुपात आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक बँका प्रयत्न करत आहेत. त्यात बँकांची, पतसंस्थांची विश्वासाहर्ता व व्याजाचा वाढीव दर जिथे मिळेल तिथे ठेवी ठेवण्याचा कल दिसत आहे. बांधकाम व्यावसायीकांनीही आपली तयार बांधकामे व प्लॉटस् विकण्यासाठी अनेक स्किम मार्केटमध्ये आणल्या आहेत.
दरम्यान कणकवलीच्या तुलनेत कुडाळ तालुक्यात नुकसान भरपाईचा दर कमी मिळाल्याची तक्रार कुडाळ मधुन पुढे येत आहे. कसाल, ओरोस वासीयांनी तर कणकवलीच्या तुलनेत मिळालेला दर कमी असल्याचे कारण पुढे करत जाहीर केलेली नुकसान भरपाई नाकारली आहे. या नुकसान भरपाईपोटी प्रकल्प ग्रस्थांच्या नावावरील ही रक्कम त्यांच्या वैयक्तीक खात्यावर जमा करण्यात काही बँक चालढकल करत असल्याची तक्रार अनेकानी केली आहे. काही तरी तांत्रिक कारणे सांगत ही रक्कम देण्यासाठी जाणुनबुजुन विलंब लावत या ठेवींची रक्कम विनाव्याज वापरण्याचा प्रयत्न बँकांकडून होत असल्याची तक्रार केली जात आहे. यासाठी जिल्हाधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.