विवेक ताम्हणकर
अलीकडे कोकणातील हापूसला कशाची दृष्ट लागली याचा शोध आता दापोली कोकण कृषी विद्यापीठाकडून घेतला जात आहे. या हापूस आंब्याच्या झाडांना म्हणे ‘चैत्रपालवी’ येत नाही आणि म्हणूनच हापूस उशिरा धरतो, किंबहुना कोकणी बागायतदार नुकसानीत जातात. आता हे नवे संशोधन केमिकलच्या जाळ्यात सापडलेल्या हापूसला कोणता उतारा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आंब्याला चैत्रपालवी येत नसल्याने आंबा उत्पादन उशिराने येते व अखेरीस कवडीमोलाने तो विकावा लागतो. त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान हेते. ही परिस्थिती अशीच राहिल्यास आंबा पीक उत्पादन घटण्याची भीती असून कोकणातील शेतकऱयांचा आर्थिक स्रोत धोक्यात येईल. त्यामुळे दापोली कृषी विद्यापीठाच्या तज्ञ वैज्ञानिकांनी चैत्रपालवी का येत नाही, त्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काय केले म्हणजे आंब्याला चैत्रपालवी येईल, याचा अभ्यास व संशोधन सध्या केले जात आहे.
पूर्वी गुढीपाडव्यावेळी म्हणजे मराठी चैत्र महिन्यात अर्थात एप्रिल महिन्यात आंब्याच्या झाडांना पालवी येत असे. चैत्रात पालवी आली की, ती जून महिन्यात जून होत होती व साधारण ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये मोहर बाहेर पडत होता. मात्र, आता गेल्या काही वर्षांपासून हे निसर्गचक्र बदलत चालले आहे. आता पावसाळा संपला की, ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये पालवी येते आणि त्यानंतर मोहर नोव्हेंबर, डिसेंबर ते जानेवारी अखेरपर्यंत येतो. साहजिकच आंब्यासाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण मिळत नाही. फळ लहान येते. पुढे वाढती उष्णता नुकसानकारक ठरते.
आंब्यातील या बदलाचा शोध घेण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली संशोधन सुरू सुरु असून शास्त्रन्यांची एक टीम यावर काम करत आहे. या संशोधनात. झाडांचे अन्न तयार करण्याचे कार्य कसे व किती प्रमाणात सुरू आहे. त्यांच्यावर कशाचे दुष्परिणाम होत आहेत. रासायनिक व हवामान बदलाचे परिणाम किती होतात, या सर्व मुद्यांसह झाडांच्या शरीरक्रियेचा अभ्यास केला जात आहे.
संशोधनानंतर योग्य उपाय योनानानंतर चैत्रपालवी येण्यास पुन्हा सुरुवात झाली, तर आंबा पिकावरील धोका दूर होईल. उत्पन्न वेळेत येऊन उत्पादन वाढण्यास मदत होईल.बागायतदारांना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान घटते आंबा पीक त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान पाहता आता कोकणी माणूस काजू लागवडीकडे वळू लागला आहे.