विवेक ताम्हणकर
मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या रायगड जिल्ह्यातील खोपोली बाजारपेठेला बकालपणा आलाय तो येथील फेरीवाले आणि त्यांच्यावर वरदहस्त असलेल्या राजकारण्यांमुळे. एकेकाळी खोपोलीत सोन्याचा धूर निघत असे. आता मात्र या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पहायला मिळते. पूर्वीची महा बाजारपेठ आणि आताची बाजारपेठ पाहता येथे पादचाऱ्याना चालणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत इथल्या नगर परिषदेत नव्याने दंडाखाल झालेले मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी या बकालापानांवर कायद्याचा हातोडा ठोकायला सुरवात केली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
खोपोली नगर परिषदेने समाज मंदिर मार्गावरील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरातील फेरीवाल्यांची अतिक्रमणे हटवण्याच्या शुक्रवारच्या मोहिमेनंतर शनिवारी पुन्हा सुरु करुन खोपोली नगर परिषदेचे नवे मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी आपला निर्धार जाहीर केला. शुक्रवारी अतिक्रमणे हटवल्यानंतर नगर पालिकेचे कार्यालय बंद होताच फेरीवाले व हातगाडीवाले यांनी पुन्हा रस्त्याचा ताबा घेतला होता . यामुळे आतापर्यंतच्या कारवायांप्रमाणे ही कारवाई सुद्धा फुसका बार ठरण्याची नामुष्की येणार हे स्पष्ट झाले परंतु मुख्याधिकारी शिंदे यांनी शनिवारी पुन्हा अतिक्रमणे तोडण्याचे काम नव्या जोमाने तर सुरू केलेच पण नगर परिषदेच्या कार्यालयीन वेळेनंतर कोणतेही अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेत त्यांनी कर्मचारी तैनात केले. परिणामी शनिवारी कार्यालयीन वेळेनंतर व रविवारी कार्यालय बंद असूनही कोणतेही अतिक्रमण झाले नाही हा बदल खोपोलीतील नागरिकांनी पहिल्यांदाच अनुभवला. मुख्याधिकाऱ्यांच्या अतिक्रमणे हटवण्याच्या या इच्छाशक्तीचे व निर्धाराचे कौतुक करण्यात येत आहे . अशीच कारवाई बाजार पेठ, शीळ फाटा या भागांसह शहरातील सर्व भागांमध्ये करण्याची गरज व्यक्त केली जात आहे .
मुख्याधिकारी संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगर अभियंता दीपक जाधव, आरोग्य निरीक्षक प्रफुल्ल गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांच्या फौजफाट्याने केलेल्या कारवाईस पोलिसांचे सहकार्य लाभले.आतापर्यंत शेकडो वेळा अशा कारवाया झाल्या आणि वाया गेल्या. स्थानिक नेतेच अशा कारवाया हाणून पाडतात व नगर परिषदेची प्रत्येक वेळची अतिक्रमण हटवण्याची मोहीम फुसकी ठरवतात हा नेहमीचा अनुभव असल्याने नागरिकांमध्ये शुक्रवारच्या मोहिमेच्या यशस्वितेबद्दल शंका प्रदर्शित केली जात होती. पण शनिवारपासून आलेल्या अनुभवाने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
नगर परिषदेच्या सभांमध्ये अतिक्रमणांच्या विरोधात कडकभडक विधाने करून नगरसेवक प्रशासनावर तोंडसुख घेतात पण प्रत्यक्ष कारवाई केल्यावर मात्र मूग गिळून बसतात. त्यामुळे प्रशासन एकाकी पडते आणि शहरातील अतिक्रमणे फोफावतात व वाहतुकीची कोंडी भीषण होते असा अनुभव वारंवार येत असल्याने नागरिक हताश होत असत . पोलीस, नगरपालिका प्रशासन यांच्या नावाने बोटे मोडणाऱ्या जनतेच्या गैरसोयींबाबत प्रशासन व लोक प्रतिनिधी ठाम भूमिका घेत नसल्यामुळे प्रशासनाने शुक्रवारी व शनिवारी केलेली कारवाई यशस्वी ठरेल याबाबत शंकेचे वातावरण असताना मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून पोलीस ठाण्यापासून दीपक हॉटेलपर्यंतचा मार्ग, भाजी मार्केट ते सोमजाई वाडी मार्ग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा परिसर नुसता अतिक्रमणमुक्तच झाला नाही तर स्वच्छही झाला आहे. ह्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी अतिक्रमणे काढण्याची मोहीम यशस्वीपणे राबवण्याचा निर्धार केल्यामुळे कौतुक करण्याबरोबरच सर्व राजकीय पक्षांच्या व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा कामात ढवळाढवळ करू नये व त्यांच्या कारवाईच्या विरोधात आंदोलने करू नयेत अशी भावना नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
कुणाचे नुकसान अपेक्षित नाही –
मुख्याधिकारी मुंबईतील ठाणेसारख्या शहरात फेरीवाल्याना शिस्त लावणारे खोपोलीचे मुख्याधिकारी संजय शिंदे यावेळी म्हणाले, या कारवाईतून कुणाचे नुकसान करण्याचा आमचा उद्देश नाही. खोपोलीकराणा नेहमीच वाहतुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. पादचाऱ्याना चालणेही कठीण होऊन जाते. या त्रासातून सर्वांची सुटका व्हावी हाच या मागचा हेतू आहे. फेरीवाल्याना ठरवून दिलेल्या जागेत त्यांनी आपला व्यवसाय करावा नगर परिषद त्याला नेहमीच सहकार्य करेल. खोपोलीतीळ वाहतुकीची कोंडी सोडविणे आणि शहर स्वच्च व सुंदर बनविणे याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देत असल्याचेही ते म्हणाले.
हि मोहीम थांबता नये – अमोलराजे बांदल-पाटील
मुख्याधिकाऱ्यानी उचललेले पाउलं अत्यंत योग्य आहे. आज खोपोलीतील बाजारपेठेत साधी मोटारसायकल घेऊन जाणे कठीण आहे. येथेच शासकीय रुग्णालय आहे. खोपोली पोलीस ठाणे ते या रुग्णालयापर्यंतचे ३०० मीटरचे अंतर कापताना केव्हा केव्हा रुग्नवहिउकाना २० मिनिटेही लागतात. एखाद्या अनपेक्षित घटनेवेळी आवश्यक यंत्रणा घटनास्थळी पोहचविणे फारच कठीण होऊन जाते. आणि म्हणून मुख्याधिकाऱ्यांच्या या मोहिमेला आमचा पाठिंबा आहे. असे मत खोपोलीतील उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे त्या अमोलराजे बांदल-पाटील यांनी व्यक्त केले.