विवेक ताम्हणकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातला कुर्ली-घोणसरी धरण प्रकल्प कणकवली, वैभववाडी तालुक्यांना वरदान ठरणारा असला तरी उजव्या आणि डाव्या तिर कालव्यांचे काम अपूर्ण असल्याने धरण उशाला कोरड घशाला अशी शेतकऱ्यांची स्तिथी आहे. या धरणावर वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहे मात्र त्याकरता लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. तर प्रकल्प बाधित शेतकरी अजूनही भूखंड आणि नागरी गरजांपासून वंचित आहेत.या धरणाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी १४ हजार १७२ दशलक्ष निधीची गरज आहे, तर कालवे व वितरिकांसाठी २५ हजार ५९९ दशलक्ष निधीची गरज आहे. असा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने शासनाला पाठविला आहे.
कुर्ली आणि घोणसरी या कणकवली तालुक्यातील गावांमध्ये हे धारण आहे. या धरणामुळे कुर्ली गावातील सुमारे ४५० घरे बाधित झाली त्यांचे फोड येथे नवीन कुर्ली वसाहत या नावाने पुनर्वसन करण्यात आले तर घोनसरी गावातील २५० घरे बाधित झाली त्यांचे ब्रह्मनगरी घोनसरी म्हणून फोडा येथेच पुनर्वसन करण्यात आले. सध्या कणकवली तालुक्यातील १३ व वैभववाडी तालुक्यातील ४ अशा १७ गावांना या धरणाचे पाणी सोडले जात आहे. डाव्या कालव्यातील पाण्यामुळे २४९ हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलीताखाली आहे व उजव्या कालव्यातील पाण्यामुळे १५५१ हेक्टर असे १८०० हेक्टर जमिनीचे क्षेत्र पाण्याखाली आले आहे. ऊस हि प्रमुख शेती या धरणाच्या पाण्यावर केली जात आहे.गेल्या १० वर्षात येथील शेतकरी ऊसासोबत, भातशेती, भुईमूग, कडधान्ये, भाजीपाला उत्पादन मोठया प्रमाणावर घेत आहे. त्यामुळे येथे कृषी समृद्धी आली आहे.
कुर्ली-घोणसरी धरणाचा उजवा व डावा तीर कालवा व पोटकालवे यांचे काम अपूर्ण असल्यामुळे धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेकडो शेतकरी अजूनही वंचित राहिले आहेत. धरणाचा उजवा तीर, कालव्याचे माती व खोदाईचे काम पूर्ण झाले आहे. धरणापासून आचिर्णे गावापर्यंत या कालव्याची ४.६१ कि.मी. लांबी आहे. कालव्याला पोटकालवे काढल्यास वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.२, आचिर्णे, गडमठ, घाणेगडवाडी अशा चार गावांतील १९६६ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. त्याचप्रमाणे डावा तीर कालवा धरण ते फोंडाघाट गावापर्यंत नियोजित आहे. या कालव्याची लांबी ७.५२ कि.मी. आहे. फोंडाघाट गावच्या हद्दीपर्यंत कालव्याचे १ ते ५ कि.मी. माती काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ५ कि.मी.च्या पुढील मातीकाम व पोटकालवे पूर्ण झाल्यास कणकवली तालुक्यातील वाघेरी, पियाळी, लिंगेश्वर, घोणसरी, लोरे नं.१, गांगेश्वर, फोंडाघाट, उत्तर बाजारपेठ, फोंडाघाट-दक्षिण बाजारपेठ, मठखुर्द, तिवरे, कोंडये, डांबरे इत्यादी १३ गावांतील २५४६ हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. डाव्या कालव्यातील पाण्यामुळे २४९ हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलीताखाली आहे. उजव्या कालव्यातील पाण्यामुळे १५५१ हेक्टर जमिनीचे क्षेत्र पाण्याखाली आले आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातील कणकवली व वैभववाडी तालुक्यातील एकूण १७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाटबंधारे विभाग, फोंडाघाटच्या वतीने १० प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये धरण व अन्य उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी १४ हजार १७२ दशलक्ष निधीची गरज आहे, तर कालवे व वितरिकांसाठी २५ हजार ५९९ दशलक्ष निधीची गरज आहे.
कुर्ली-घोणसरी धरणातील पाण्यापासून गद्रेमरीन कंपनी, रत्नागिरीमार्फत विजनिर्मिती केली जात आहे. आतापर्यंत ३१.२६३ द.ल. युनिट विजेची निर्मिती करण्यात आली आहे. या धरणामध्ये दरवर्षी पावसाळयात १८७.५० दशलक्ष घनमीटर इतका साठा केला जातो. तर धरणाच्या पाण्यावर १.५० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती केली जाते. मात्र यावर्षी १२५ टक्के वीजनिर्मिती केल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.धरणाच्या पाण्यापासून वीजनिर्मितीबरोबर मत्स्य व्यवसाय करण्यासाठी ठेकेदाराने गतवर्षी ४ लाख छोटे मासे तलावात सोडले आहेत.
कुर्ली आणि घोनसरी गावातील प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन झाले खरे मात्र आजही हे प्रकल्प बाधित लोक विविध सोईंपासून वंचित आहेत. नवीन पुनर्वसन गावठाणात रस्ते, पाणी, वीज या समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. कुर्ली गाववासीयांना अजूनही स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालेली नाही. तर या प्रकल्पाचे १९८४-८५ मध्ये मुल्याकंन झाल्याने प्रकल्प बाधितांना अत्यंत अल्प मोबदला मिळाला. त्यातही घर बांधणीसाठी ४५० भूखंडचे वाटप करण्यात आले होते. यापैकी काहीजणांनी घरे बांधली तर काहींनी पैश्या अभावी घरे बांधली नाहीत असे भूखंड परत घेण्याच्या नोटिसा शासनाने प्रकल्प बाधितांना पाठविल्या होत्या. हे भूखंड मागे घेऊ नयेत अशी प्रकल्प बाधितांची मागणी आहे. तसेच आजही ९० टक्के बाधित शेतकऱ्यांना शेत जमिनी मिळालेल्या नाहीत यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे.