पुणे : निसर्गाने लादलेल्या अंधत्वावर मात करत आपल्या विशेष कौशल्याने थरावर थर रचत या मुलांना ज्या उत्साहाने दहीहंडी फोडली हे अत्यंत कौतुकास्पद आहे. अशा मुलांच्या विकासासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड या संस्थेच्या माध्यमातून शाळा आणि वसतिगृह चालवले जाते. त्यांचे हे कार्य नेत्रदिपक आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देवून शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. दही हंडी निमित्त या संस्थेच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शैक्षणिक संकुल येथे अंध मुलांचा पुस्तक दहीहंडी हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, आज सर्वत्र एकात्मता आणि योग्य नियोजनाचे प्रतीक असलेला दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र जीवनात आलेल्या अंधकारामुळे मनामध्ये कुठलीही निराशा न ठेवता दहीहंडी फोडतात हे बघून कधी कधी आम्हाला डोळे असून नसल्यासारखे वाटते. या सारख्या मुलांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते स्वत: प्रयत्न करतातच कारण त्यांच्यासाठी तो त्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो. मात्र समाजाने ही पुढाकार घेवून त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे.
अशा मुलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी तीन टक्के निधी राखीव ठेवावा असा राज्य सरकारचा नियम आहे. या निधीतून या शाळेच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न करू. या पलीकडेही आवश्यकता वाटल्यास राज्य सरकार कडून मदत मिळवून देवू असही श्री बापट म्हणाले.
कार्यक्रमाला आमदार अनंतराव गाडगीळ, संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख, नरेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.