रायगड – रायगड जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कशेडीपासून खारपाड्यापर्यंतच्या मार्गावर धावणाऱ्या सहा आसनी आणि तीन आसनी रिक्षाचे चालक-मालक सध्या गणवेशात पहायला मिळत आहेत. १६ ऑगस्टपासून ही गणवेश सक्ती अंमलात आली आहे. या सक्तीचे काही रिक्षाचालकांनी समर्थन केले आहे. तरी काहींनी नाराजीचा सूर लावला आहे.
रायगड जिल्ह्यात सहा आसनी आणि तीन आसनी मिळून जवळपास १५ हजार रिक्षाचालक आहेत. तर जिल्ह्यात ७५०० हून अधिक सहा आसनी रिक्षा आहेत. शिव ग्रामीण योजनेंतर्गत आणि मॅझिक गाड्यांचीही आता भर पडली आहे.
रायगड जिल्ह्यातील प्रवासी रिक्षाचालक गेल्या अनेक वर्षापासून विना गणवेशात फिरत होते. (शहरी अपवाद वगळता) परंतु आता सर्वच रिक्षाचालकांना गणवेशातच प्रवाशी वाहतूक करावी लागणार आहे. मोटार कायदा कलम १९८८ अंतर्गत गणवेश सक्तीचा आहे. मात्र आतापर्यंत गणवेशाची सक्ती रिक्षा चालकांवर झाली नव्हती.
इतर मोठ्या शहरातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना लक्षात घेता प्रवाशांना निर्भयतेने रिक्षांतून प्रवास करता यावा, कायदा आणि सुव्यवस्थेचीही भिती रिक्षाचालकांमध्ये असावी या हेतूने रायगड जिल्ह्यातही गणवेश सक्ती करण्यात आली आहे. सफेद गणवेशातील मालक वजा चालक हे या गणवेशावर नाराज आहेत. अनाचक गाडीचे काम निघाल्यास गणवेश सतत खराब होणार, अशी नाराजगी एका रिक्षाचालकाने व्यक्त केली.
गणवेश सक्ती आवश्यकः पोलीस निरीक्षक म्हात्रे
अचानक रिक्षाचालकांवर गणवेश सक्ती आल्याने नाराजीचा सूर काही निघत असला तरी ही गणवेश सक्ती नक्कीच त्यांच्या फायद्याची आहे आणि आवश्यक देखील आहे. या गणवेशामुळे त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव राहिल. काही ठिकाणी रिक्षाचालकांकडून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली होती. जिल्ह्यात अशा प्रवृत्तीला आळा बसावा आणि प्रवशांना निर्भयतेने प्रवास करता यावा यासीठीही गणवेश सक्ती करण्यात आली आहे. गणवेश हा नियमानुसार आहे. एप्रिल २०१७ पासून गणवेशात रिक्षाचालवाव्यात अशा सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु रिक्षा चालकांकडून मागण्यात आलेल्या मुदत वाढीमुळे अखेर १६ ऑगस्ट पासून गणवेश लागू करण्यात आला. सुरूवातील प्रवाशी रिक्षाचालकानंतर पुढे टॅक्सी परवाना असलेल्या इतर वाहनचालकांंनाही गणवेश लागू होईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. म्हात्रे यांनी दिली.
गणवेशाला सहकार्य राहिलः विजय पाटील
पोलीस प्रशासनाकडून नियमानुसारच गणवेश सक्ती करण्यात आली आहे. या गणवेश सक्तीमुळे प्रवासी निर्भयतेने प्रवास करतील. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल, असे सांगतानाच रायगड जिल्हा विक्रम-मिनीडोअर संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी जिल्ह्यातील रिक्षाचालकांच्या प्रामाणकिपणाबद्दल कौतूकही केले. शासनाच्या योजनांना आमचे सहकार्य राहिल. त्याबरोबरच आमच्या गैरसोयी आणि अडीअडचणींबाबत शासनानेही सहकार्याची भूमिका ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रवासी सहा व तीन आसनी रिक्षाचालकांना गणवेश सक्तीचा: मालकास पांढरा तर चालकास खाकी गणवेश
Team TNV August 18th, 2017 Posted In: येवा कोकणात
Team TNV