रायगड: केंद्र व राज्य सरकार ग्रामीण तसेच शहरी भागात बालमृत्यू तसेच मातामृत्यू रोखण्यासाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्चही करण्यात येतो. यामुळे बालमृत्यू तसेच मातामृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यात यश मिळाले असले तरी, आजही रायगड जिल्ह्यात बालमृत्यू तसेच मातामृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आरोग्य यंत्रणेकडील आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षभरात रायगड जिल्ह्यात ३०५ बालमृत्यू तर २६ मातामृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
आरोग्य यंत्रणेकडून दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नवजात बालकांसाठी व त्यांच्या मातांसाठी कोट्यवधींचा निधी खर्चून त्यांच्या संगोपणासाठी उच्च प्रतिच्या योजना राबविण्यात येतात. तसेच आरोग्य यंत्रनेमार्फत केंद्र सरकारची राष्ट्रीय बाल सुरक्षा योजना तर राज्य सरकारतर्फे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येतो. यासाठी आरोग्य विभागाजवळ कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका अशी फौजही आहे. यासह विविध माध्यमातून बालकांची पालकांनी काळजी कशी घ्यावी, तसेच मातांनी कोणती काळजी घ्यावी, यासाठी जनजागृतीचे कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत.
या सर्व बाबींमुळे रायगड जिल्ह्यात बालमृत्यू तसेच मातामृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यात यश मिळाले असले तरी, आजही जिल्ह्यात बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण मोठे आहे. २०१२-१३ या वर्षात जिल्ह्यात ४४९ बालमृत्यू तर ३३ मातामृत्यू झाले होते. या प्रमाणात घट होऊन २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात ३०५ बालमृत्यू तर २६ मातामृत्यू झाले आहेत.
वर्ष – बालमृत्यू – मातामृत्यू
२०१२१३ – ४४९ – ३३
२०१३-१४ – ३८८ – २८
२०१४-१५ – ३४२ – २७
२०१५-१६- ३२८ – २९
२०१६-१७ – ३०५ – २६
————————–
मृत्यूचे प्रमाण रोखण्याचे प्रयत्न
डॉ. अजित गवळी
जिल्हा शल्यचिकित्सक
बालमृत्यू तसेच मातामृत्यू रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. सरकारच्या सर्व योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. स्त्री गरोदर असल्यापासून ते बालकाचा जन्म होईपर्यंत सर्व प्रकारची काळजी घेतली जाते, वारंवार तपासणी तसेच सल्ला देण्यात येतो. बालकांचीही काळजी घेतली जाते. कुपोषित व कमी वजनाच्या बालकांवर उपचार तसेच त्यांना पूरक आहार पुरविण्यात येतो. तसेच माता व बालमृत्यूच्या कारणांचा अभ्यास करुन ते प्रमाण अधिक कमी करण्यावर भर देण्यात येत आहे.