पुणे- राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी पुणे जिल्ह्यास भेट देऊन राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत माहिती जाणून घेतली. .क्षत्रिय यांनी शिवाजीनगर येथील नागरी सुविधा केंद्रास तसेच पुणे महापालिकेच्या वारजे-कर्वेनगर येथील क्षेत्रिय कार्यालयास भेट दिली. जिल्हाधिकारी सौरभ राव, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवाजीनगरयेथील नागरी सुविधा केंद्रातून वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले जातात. यासाठी महाऑनलाईनचे सॉफ्टवेअर वापरले जाते. जातीच्या दाखल्यासह सर्व प्रकारचे दाखले विहीत मुदतीपूर्वी देण्यासाठी काय करावे लागेल, याचीही त्यांनी माहिती घेतली. सॉफ्टवेअर मध्ये काय बदल करता येतील याबाबत सूचना केल्या. पोहचपावतीमध्ये दाखला वितरणाची तारीख नमूद करणे, कालावधी पूर्ण होण्याची वाट न पहाता वेळेपूर्वी दाखले वितरण करणे यासारख्या सूचना त्यांनी केल्या. नागरिकांना जलद,पारदर्शकपणे सेवा देण्यासाठी आणखी काय सुधारणा करता येतील याचा प्रस्ताव सादर करण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या. सुविधाकेंद्रात आलेल्या नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. केंद्राच्या परिसरात सेवाहक्क कायद्याबाबत माहितीफलक लावले आहेत का, याचीही त्यांनी पहाणी केली. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्ह्यातील सेवाहक्क कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीबाबतचे सादरीकरण केले. सुविधा केंद्रातून 98 टक्के प्रकरणांचा विहित मुदतीत निपटारा होत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त केले.
पुणे महापालिकेच्यावतीने वारजे-कर्वेनगर येथील क्षेत्रिय कार्यालयातही नागरिकांना ऑनलाईन सेवा देण्यात येत आहेत. या सेवा ऑनलाईन दिल्याने नागरिकांची झालेली सोय, त्यामध्ये करावयाच्या सुधारणा आणि अन्य बाबी यासंदर्भात पालिकेच्या वतीने सादरीकरण व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. श्री.क्षत्रिय यांनी या सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. राज्य सेवाहक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीकरिता आणखी नवीन सेवांचा समावेश करणे शक्य आहे का,याची माहिती घेऊन नागरिकांकरिता नव्याने सेवा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या. पुणे महापालिकेच्या वतीने डिजीटल ऑनलाइन सेवा अधिक गतीने देण्यात याव्यात,नागरिकांनाही यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे,असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्यावतीने दाखल्याच्या निपटा-याचे प्रमाण सुमारे 98 टक्के असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त शीतल उगले, राज्य लोकसेवा हक्कचे उपसचिव काटकर,महापालिका सहायकआयुक्त गणेश सोनुने आणि इतर अधिकारी उपस्थित होते.