पुणे – शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील वंचित घटकाला व्हावी. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा. या उद्देशाने संवादपर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांचे मंथन करण्यात येत असल्याचे मत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी व्यक्त केले.
बारामती येथे श्रीमंत आबा गणपती महोत्सव व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मोरोपंत नाट्यगृहात संवाद पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बारामती नगरपालिकेचे बांधकाम सभापती सर्वश्री अतुल बालगुडे, नगरसेवक सचिन सातव, अमर धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, तहसिलदार हनुमंत पाटील, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, तनिष्का प्रमुख ज्योतिताई लडकत, माजी नगरसेवक सुभाष ढोले, मंडळाचे अध्यक्ष राजेश जाधव, किरण इंगळे, माहिती कार्यालयाचे प्रतिनिधी विलास कसबे, शरद नलवडे, मिलींद भिंगारे, भिमराव गायकवाड, गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तावरे यांनी पालिका प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांविषयी नागरीकांशी संवाद साधला. शहरातील नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासन योग्य खबरदारी घेत आहे. नागरीकांच्या चांगल्या आरोग्यासाठी पालिका प्रशासन युध्दपातळीवर काम करत असून डेंग्यू, चिकणगुन्या याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन श्रीमती तावरे यांनी केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी बांगर म्हणाले, शहर व परिसरातील नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनामार्फत 24तास गस्त घालण्यात येत आहे. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी विविध पथके तयार करण्यात आली असून यामध्ये दामिनी, बीट मार्शल व निर्भया पथकाचा समावेश आहे. उपविभागातील नागरीकांच्या तक्रारी व अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचेही बांगर यांनी सांगितले.
तहसिलदार पाटिल म्हणाले, शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचल्याचे सुपरिणाम दृश्य स्वरुपात दिसणे महत्त्वाचे आहे. याद्वारे आपल्याला योजनेचे फलित लक्षात येईल. नागरीकांनी योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भांत चांगले प्रस्ताव असतील तर सादर करण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले.
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी प्रास्ताविकात “संवाद पर्व” उपक्रमाचा हेतू सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर जगताप यांनी मानले.