किशोर राणे , सिंधुदुर्ग
गणपती हा सर्व विद्येचा अधिपती आहे. सर्वाधिक गणरायाची चित्रं रेखाटली जातात. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असं एक गाव आहे गणपतीचं चित्र काढणेही निषिद्ध समजले जाते. गणपतीची मातीची मूर्ती कुणी बनवत नाही. पण गणरायाच्या दर्शनाशिवाय गाववासीयांचा एकही दिवस जात नाही. हे गाव सर्वाधिक गणेश भक्तांचे आहे. गावचे आराध्य गणरायच आहेत. असे असले तरी गजाननाचे स्मरण मनातून करावे त्याचा भपकेबाज नको किंबहूना त्याचा प्रत्येक ठिकाणी उदो उदो नको. तो मनात असायला हवा. अशी गाववासीयांची नितांत श्रद्धा आहे. मालवण तालुक्यातील कोईल गावात ‘एक गाव.. एक गणपती’ ही प्राचीन काळापासून सुरू असलेली संकल्पना आजही जोपासत आहे. गणपतीच्या छायाचित्राविना हिंदू धर्मिय लग्नपत्रिका तुम्हाला आली तर समजायचे कोईल गावातले लग्न आहे. या गावातील मंडळी गावाबाहेरच्या मातीने केलेल्या कोणत्याही मूर्तीला फुलंसुद्धा वाहत नाहीत म्हणे! गावचा गणपती एकच. त्याचे दर्शन हृदयापासून, हृदयातून घ्यायचे. त्याला हृदयात साठवायचे. असे दर्शन घ्यायचे तर देवळातच यायला हवे. या गावात गणेशाचे कोणत्याही अवतारातले अथवा कोणत्याही कलाकृतीतले छायाचित्र ग्रामस्थांच्या घरात आढळून येणार नाही. लग्नपत्रिकेवर गजाननाचे छायाचित्र छापण्याची जुनी परंपरा आहे. मात्र कोईल गावातील वधू-वरांच्या पत्रिकेवर गणपतीचे छायाचित्रही छापले जात नाही. या गावातील ग्रामस्थांबरोबरच गावाबाहेर स्थायिक झालेले कोईलचे मूळ रहिवासी ही परंपरा जपतातच. आपल्या गावच्या गणपतीचे दररोज दर्शन व्हावे यासाठी कोणी फोटो काढले, ते घरात लावले आणि तेथे पावित्र्य जपले गेले नाही तर गणपतीची अवकृपा होण्याची धास्तीही ग्रामस्थांना असते. काही जण अनावधानाने तर काही जण जाणीवपूर्वक गणपतीचा फोटो घेतला तर काय होईल असे विचारतात. मात्र मागाहून त्यांना मंदिरात येऊन क्षमायाचना करावी लागते. याबाबत अनेक उदाहरणे आणि घटना ग्रामस्थ सांगतात. गणपतीच्या दररोजच्या दर्शनासाठी चाकरमान्यांनी काही फोटो काढून मुंबई येथे निवासस्थानी लावले होते. मात्र दुर्दैवाने पावित्र्य जपता आले नाही त्याचे प्रायश्चित त्यांना भोगावे लागले. हे कल्पनाचे खेळ असतील अथवा योगायोग.. मात्र कोईलवासीयांची श्रद्धा यामुळे अधिकच दृढ झाली. मग घरातील ज्येष्ठांनी गावाकडे धाव घेतली. गावातील जाणकारांनी गणपतीची क्षमायाचना करण्यास सांगून फोटो वगैरे लावला आहे का याची चौकशी केली. यावेळी या मंदिरातील गणपतीचा फोटो फ्रेम करून लावला असल्याचे कळले. तो फोटो विसर्जन करण्याचा सल्ला ग्रामस्थांनी दिला. गाववासीयांच्या मताप्रमाणे त्या परिवाराने कृती केली आणि त्यांची संकटे दूर झाली. हे ग्रामस्थ आता दरवर्षी गणेशोत्सवात गावात पोहोचतात. गणपतीच्या फोटो बाबत गैरसमज नको, मात्र या देवतेचा फोटो आपल्याकडे ठेवायचा असल्यास आचरणही तेवढेच शुद्ध असायला हवे असे ग्रामस्थ निष्ठापूर्वक सांगतात. गावात सिमेपलीकडून कोणत्याही कारणासाठी माती आणू नये. तशा मातीची मूर्ती करू नये अशी परंपरा असल्याने गणपती मंदिर परिसरातील विशिष्ट जागेवरील माती नागपंचमी दिवशी घराघरात नागाच्या मूर्तीसाठी वापरली जाते. गणपतीच्या मंदिरात कृष्णाष्टमीचा उत्सव होतो तेव्हाही हीच माती मूर्तीसाठी वापरतात. हरितालिका मूर्ती असो वा सरस्वतीची मूर्ती गावातील मातीच यासाठी वापरली जाते. गावाबाहेरच्या मातीच्या मूर्तीला कोईलवासीय हात लावत नाहीत. मूर्ती पूजेबाबत नव्हे तर गणपतीच्या मूर्तीसाठी आवश्यक असणारा कोणताही भाग कोईल गावच्या सीमेतून नेला जात नाही. कोईल शेजारील गावांमध्ये एका गणपती शाळेत साचा हवा होता. यासाठी आडवलीवरून बांदिवडे गावात लवकरच पोहोचता यावे म्हणून कोईल गावातून काही जण निघाले. मात्र गावात त्यांना पुढची वाटच मिळेना. दोन दिवस ते रस्ता भरकटले होते. गावातील ज्येष्ठ मंडळींनी गणरायाला शरण जात त्यांचा शोध घेतला आणि सीमेबाहेर रवानगी केली. असे ग्रामस्थ सांगतात. गावच्या परंपरा आणि प्रथाही लक्षवेधी आहेत. गावात घरे-दारे रंगविली जातात. भाद्रपदात गणेशउत्सवासाठी घरे सज्ज केली जातात. या रंगरंगोटीत गणपतीचे चित्र टाळले जाते. असे म्हणतात, पूर्वी आडवली गाव हा कोईल चारीवडे भागात एकच मोठा गाव होता. हजारो वर्षापूर्वी पूर्वजांमध्ये देवदेवतांच्या पूजेवरून वादविवाद झाला. जेथे वादविवाद झाला ती जागा वादाची जागा म्हणून गावच्या सीमेवर प्रसिद्ध आहे. येथे देव भांडले असे सांगितले जाते.कोईलमध्ये यावेळी गणपती स्थानापन्न झाले. त्यावेळी पूर्वजांनी मंदिरातील गणपतीशिवाय कुठच्याही मूर्तीची पूजा होणार नाही असे वचन दिले. आणि गाव या वचनाला कसोशीने जपतो आहे. पिढयान् पिढया याची जपणूक करण्यात आली. पुढेही करण्यात येईल, असे ग्रामस्थ सांगतात. गावात साटम महाराजांच्या जन्मस्थानाची वास्तू आहे. सातेरी देवीचे मंदिर आहे. त्याची यथासांग पूजा केली जाते. माघी गणेशउत्सव आणि वार्षिकोत्सवही दिमाखात साजरे होतात.या लौकिक सोहळयाचे नेत्रसुख घेणे ही एक पर्वणीच असते. देवळात ११ दिवस आरती होते. गावक-यांकडून गाऱ्हाणी घातली जातात. प्रत्येक घरातून देण्यात आलेल्या शिध्यातून गणपतीचा प्रसाद होतो. पहिल्या दिवशी सर्वानाच मंदिरात महाप्रसाद असतो. ११ दिवस उत्साहाचे भर्रकन निघून जातात. वेळ येते विसर्जनाची. पालखी सजवली जाते. सोबतीला असते निशाण. स्वयंभू मंदिरातील गणपती मूर्तीचे विसर्जन न होता, फुलपात्रे, निर्माल्ये त्या पालखीत ठेवली जातात. ढोलताशांच्या बरोबर पालखी मिरवणूक निघते. फकिराच्या तळीच्या दिशेने गड नदीकडे ही मिरवणूक पोहोचते. निर्माल्याचे विसर्जन होते. यावेळी भक्तांकडून काही चूक झाली असल्यास मनोमन क्षमा मागितली जाते. यावेळी गणपतीच्या चरणावर त्याचे काढलेले फोटो ठेवत येथील चित्रे गंगेत समर्पित केली जातात.त्या दिवशी गावातून फेरफटका मारताना साटम गुरुजींची भेट झाली. त्यांना म्हटले, गुरुजी विज्ञान युगात असे काटेकोर नियम पाळणे अंधश्रद्धा वाटत नाही का तर ते म्हणाले, गावकरी पूर्वजांचा वारसा निष्ठेने चालवत आहेत. गणरायाची निष्ठा जपणारे आम्ही कडवे भक्त आहोत. येथे अंधश्रद्धेचा प्रश्न येतोच कुठे.
मुस्लीम बांधवही गणरायाच्या सेवेत श्रावणातील संकष्टीबरोबर गणपतीच्या दिवसात अंगारकी संकष्टीला दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी फुललेली असते. विशेष म्हणजे मुस्लीम बांधवही कोईलच्या गणपती दर्शनासाठी आवर्जून येत असतात. भक्तांच्या कोणत्याही इच्छा तत्परतेने पूर्ण करणारा देव म्हणून कोईलच्या गणपतीची ख्याती आहे.
गणरायाचा मुखवटा वेशीबाहेर कोईल गावात जाण्यासाठी जाणा-या मार्गाच्या सोबतीला दरडाचा देव असतो (दरडाचा देव हा प्रदेश टेकडीवजा भाग आहे.) या टेकडीवर दाट झाडीत अनेक पशू-पक्षी वावरत असतात. या गावात कुणीही पशुहत्या करत नाहीत. मात्र वर्षातून एकदा दरडाचा देव म्हणून या भागाची पूजा केली जाते. गावात मार्गशीष महिन्यात दहीकाला (जत्रा) उत्सव होतो. दहीकाल्यात दशावतार नाही असे होणार नाही. आणि दशावतारात गणपती नृत्य होतेच होते. दशावतारांचा पेटारा प्रत्येक गावागावात पोहचत असतो. यात गणपतीचा मुखवटा शस्त्रास्त्रे आणि इतर आयुधे असतात. मात्र कोईल गावात जत्रोत्सवासाठी येताना पेटा-यातील गणपतीचा मुखवटा वेशीबाहेर म्हणजे मालडी गावात ठेवून कलाकार गावात दाखल होतात. या जत्रेत गणपतीचे नृत्य केले जात नाही.
गावात बंदूक चालविण्यास मनाई गाव शाकाहारी नाही. मात्र गावात बंदूक चालविण्यास मनाई आहे. गावातील कुणीही बंदूक घेतल्यास त्याचे इच्छित कार्य सफल होत नाही. देवाकडून शिक्षा मिळते असा गाववासीयांचा विश्वास आहे. गावात दारूभट्टी लावण्यास बंदी आहे. तशी देवाचीच इच्छा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात सलग दहा र्वष राहणा-या व्यक्तींना येथील नियम जगाच्या कोणत्याही कानाकोप-यात गेले तरी पाळावेच लागतात, अशी गाववासीयांची श्रद्धा आहे. कोईल गावातील काही भगवंतगड कोळेकरवाडी येथे स्थायिक झाले. करूळ भागात काही जण स्थिरावले. मात्र सर्वच भागात ते आपली परंपरा जपतात. आराध्याबाबत पूर्वजांनी घेतलेल्या प्रतिज्ञेला जागतात.
संस्कृतीचे साक्षीदार कोईल गावात मशीद म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागाबाबत गूढ आहे. गावातील लोकसंख्या खूप कमी आहे. बरीचशी घरे बंदच असतात. नोकरी-धंद्याच्या निमित्ताने अनेक जण परभागात स्थायिक झाले आहेत. उत्सवादरम्यान गावात येतात. मग घराघरांत गजबज वाढते. परंतु त्या विशिष्ट भागाला ‘मशीद’ का म्हणतात याबाबत निश्चित अशी गावक-यांना काही माहिती नाही. तशी कुठेही नोंदही नाही. मात्र या भागात काहीतरी गूढ आहे. कोणतीतरी निश्चितच घटना येथे घडली असावी असे काही पुरावे मिळतात. पूर्वी मुस्लीम बांधव या भागात असावेत. त्यांचे हे श्रद्धास्थान असावे असेही म्हटले जाते. या भागाच्या शेजारी काही वर्षापूर्वी वसंत शिवराम साटम यांनी घराचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम सुरू केले. यावेळी ५-६ फूट अंतरावर जमिनीत काही मूर्ती आढळल्या काही कोरीव काम केलेले दगंड मिळाले म्हणून परिसरात खोदकाम करण्यात आले. यावेळी काही विरगळ, काही शिल्प सापडली. यातील सुरक्षित असणारी शिल्प गणपती मंदिराशेजारी आणण्यात आली. त्याची सुरक्षित मांडणी करण्यात आली. यातील काही मूर्तीची पूजाअर्चाही केली जाते. या प्राचिन दस्ताऐवजांचा अभ्यास केल्यास निश्चितच कोईल गावाची भूतपूर्व संस्कृती हाती लागू शकते.