जे. डी. पराडकर
कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी प्राचीन वाङमयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे.भारताच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहेअसे मानले जाते. मोगलाईच्या काळात सुमारे इ.स. १६०० च्या पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण रहात होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. “आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन”, असा निश्चय करुन त्यांनी आराघ्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला. अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की, “मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे अर्थात गणेशगुळे येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरुप धारण करुन प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरुप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजाअर्चा कर, तुझे संकट दूर होईल.” असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सघ्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दूधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला, त्यांनी तात्काळ सर्व परीसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कार्ये भिडे भटजींनी पुढे सुरु केली.
गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याचीही एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला. गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवट आहे. भारताच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे, त्या लगतचे गाव असून सकल देवतांमध्ये आराध्यदैवत अशी श्री मंगलमुर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला आहे. समुद्रापुढे पुळणीचे म्हणजे वाळूचे भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जावू लागले.
श्रीगणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदु संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्र्वाच्या मुळाशी ओमकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्रीगणेश ही देवता ओमकार रुप आहे. त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकाररुपात आणणारी अनेक प्राचिन मंदिरे आहेत. गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान हे यापैकी एक! या स्थानाचे वैशिट्य इथल्या असीम सृष्टीसौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र. समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांबसडक पुळण. मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगरांची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य! सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्काराने शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे.
गणपतीपुळे येथील श्रीगणेशाचे स्थान हे स्वयंभू आहे. स्वयंभू ही कल्पना फक्त आद्य देवतेलाच साजेशी आहे. स्वयंभू देवता या सृष्टीचाच एक भाग असतात. त्यांना साकार रुपात आणावे लागत नाही. स्थापत्य म्हणून अथवा मूर्ती म्हणून घडवावे लागत नाही. सृष्टीच्या जन्मकाळीच त्यांचा जन्म झालेला असतो. अथवा त्या सृष्टी म्हणूनच जन्माला आलेल्या असतात. अशा स्वयंभू स्थानाचे दर्शन घेणे ही एक अत्यंत रोमहर्षक स्थिती असते.
श्रीगणेशाला साकार रुपात आणण्याचा प्रयत्न गेले हजारो वर्षे भाविकांनी आणि कलावंतानी केला आहे. गणपतीपुळे येथील स्वयंभू रुप या कल्पनांचे एक सामान्यीकरण आहे. याची साक्ष दर्शन घेताना आपल्याला पटते. पावसाळ्यात हवा कुंद असताना जेव्हा या स्वयंभू आकाराच्या नाभीतून जलस्त्रोत सुटतो तेव्हा परमेश्र्वराच्या निकट सानिध्यात असल्याचा भास कुठल्याही परंपरेतील मनुष्याला झाल्याशिवाय राहत नाही.
भारताची संपूर्ण पश्चिम किनारपट्टी नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. त्यातही कोकणच्या लाल मातीतील वनराजीचं एक वेगळं वैशिष्टय आहे. माडाच्या मुळातच देखण्या वृक्षाने किनाऱ्याच्या पाश्वभूमीवर एक नैसर्गिक महिरप साकारली आहे. इथल्या आंब्याच्या हिरव्या पण गडद अशा सावलीने तापमान तर राखलं आहेच, पण भारताला लाभलेलं प्राचिन गांभीर्य जपलेलं आहे. जिथं माडांची आणि आंब्याची गर्द झाडी आहे, तिथली प्रत्येक सायंकाळ एका समृद्ध आणि प्रसन्न मूडने समाप्त होते. याच कारणाने गणपतीपुळ्याचा सूर्यास्त भाविक पर्यटकांना गेली अनेक वर्षे भुरळ घालत आला आहे.
श्री गणेशस्वरुप असलेलं स्वयंभू पाषाण समुद्रसपाटीला समांतर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचीव आण्णाजी दत्तो यांनी केंबळी छप्पराच्या जागी सुंदर घुमट बांधला. पुढे पेशव्यांचे सरदार गोविंपंत बुदेले यांनी देवालयाचा सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानचे कारभारी माधवराव वासुदेवराव बर्वे यांनी सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढविला. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी नंदादीपाची व्यवस्था केली. तर माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी दगडी धर्मशाळा बांधली. आज दिसणाऱ्या मंदीराच बांधकाम सन १९९८ ते २००३ या कालावधीत सुरु होतं. प्राचीन भारतीय स्थापत्यकला डोळ्यासमोर ठेवून नव्या मंदिराची उभारणी करण्यात आली. एकाच दगडातून कोरुन काढल्याचा भास व्हावा, असं रेखीव बांधकाम रेड आग्रा या खास पाषाणातून उभं राहिलं आहे. या जागेची नैसर्गिक ठेवण मुळातच एक उत्तम प्राकृतिक अविष्कार आहे. उंच घुमटाकृती गर्भागार आणि सभामंडपावरील नक्षीदार छप्पर संधीप्रकाशात डोळ्याचं पारणं फेडतात. मंदिराच्या दक्षिणोत्तर दोन्हीं बाजूला पाच त्रिपूरं आहेत. त्रिपूरी पौर्णिमेला जेव्हा त्यावरील दिवे प्रकाशमान होतात तेव्हा मंदिराची रोषणाई आपल्याला दिपवून सोडते.
सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यात सूयार्स्ताच्या वेळी किरणे थेट स्वयंभू पाषाणचं दर्शन घेतात. तर पावसाळ्यात उधाणाच्या भरतीच्या वेळी लाटा थेट मंदिराला चरणस्पर्श करतात. मंदिरामागचा डोंगर स्वयंभू म्हणून संरक्षित आहे. या स्वयंभू स्थानाला प्रदक्षिणा म्हणजे डोंगराला प्रदक्षिणा. डोंगराभोवतीचा हा प्रदक्षिणा मार्ग जांभ्यादगडानी बांधून घेतला आहे. प्रदक्षिणा मागार्वरुन होणारं सागरदर्शन हा सुद्धा आल्हाददायक अनुभव असतो.
कालबद्ध अशा तीन नैसर्गिक ऋतूंच वरदान हे दक्षिण भारताचं वैशिष्टय आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. निसर्गाच्या या तीनही अवस्थांचं नियमीत आणि संयमीत दर्शन श्री गणेशाच्या या आद्य भूमीत दिसून येतं. त्यामुळे अलीकडे वषर्भर भाविक पर्यटकांचे रीघ असते. उन्हाळ्यात सरासरीपेक्षा कमी तापमान, स्वच्छ सूर्यप्रकाश, सूर्य कर्कवृत्ताकडे झुकल्याने उशीरा होणारा सूर्यास्त आणि त्यामुळे लांबत जाणारा सनसेटचा देखावा. आसमंतात उभारलेल्या अतीभव्य यज्ञकुंडात उतरणारं सूयर्बिंब. क्षितीजाच्या अथांग रेषेवर रंगांची मनमोहक उधळण सारी सायंकाळ व्यापून उरलेली असते. मोसमी वाऱ्याची चाहुल देणारे ढग जेव्हा क्षितिजावर उगवतात तेव्हा या रंगांमध्ये ढगांचे अनेक घनाकार मिसळून जातात.
काही वर्षापूर्वी पावसाळ्यात भाविक पर्यटकांची संख्या कमी होत असे, पण आता पर्यटनाच्या आणि जीवनशैलीच्या संकल्पना बदलल्या आहेत. वाहतुकीच्या सोयी झाल्याने आता भर पावसात किनाऱ्यावर उतरणारे मुसाफीर वाढले आहेत. भर पावसात टपोरे तुषार झेलत लाटांशी खेळता येत. सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेता घेता पावसात भिजण्याची तऱ्हा काही औरच आनंद देते. श्रावणाची चाहूल लागताना पावसाचा जोर जेव्हा कमी होतो. तेव्हा अवघ्या परिसरावर सायंकाळी जो संधीप्रकाशाचा रंग पसरतो त्याची मोहकता डोळ्याखेरीज फोटो, शुटिंग या पैकी कशानेही टिपता येत नाही. हिवाळ्यात भाविक पर्यटकांचा पूर लोटतो आणि हा उत्सव पावसाच्या आगमनापर्यंत टिकून राहतो. हिवाळ्यातही सरासरी तापमानात फारसा फरक पडत नाही. उलट किनारा उबदार बनतो. पर्यटकांचा लाटांशी चाललेला खेळ लांबत रहातो. लाटांशी खेळून बाहेर पडावसं वाटलं तर पुळणीत पडून रहावं. या पुळणीला खेटून असलेली खुरट्या डोंगरांची रांग सागराचं विहंगम दर्शन द्यायला एक नैसर्गिक आसन आहे. लांबसडक पसरलेल्या पुळणीला लागून असलेली ही डोंगररांग पर्यटकांना सर्वाधिक पसंत आहे. सागराचा भलामोठा पट दृष्टीच्या कवेत घेण्यासाठी बनवलेल जणू भलमोठं प्रेक्षागृह. इथून सनसेट पाहणाऱ्यांची संख्या वाढते आहे. हिवाळ्यात पहाटेच्या आणि सायंकाळच्या संधीप्रकाशात मंदिराच्या स्थापत्यासह स्वयंभू डोंगराच दर्शन दृष्टीसह मनाला सुखावणारं असतं.
मंदिरात वर्षभर धार्मिक उत्सव साजरे केले जातात भाद्रपद महिन्यात दररोज रात्री आरत्या, मंत्रपुष्प व कीर्तन असा कार्यक्रम असतो. माघ उत्सव, दसरा,दीपोत्सव,कोजागिरी पौर्णिमा,वसंतपूजा,गुढीपाडवा ते अक्षय्यतृतीया श्रींची पालखी मिरवणूक असे कार्यक्रम साजरे केले जातात.
गणपतीपुळेची आरती
आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।
स्वयंभू पश्चिम दिग्विसी । प्रकटला भक्त रक्षणासी ।
सन्मुख सागर समदृष्टी । शोभतो हरित गिरिपृष्टी ।
विराजे सिंदुर सर्वांगा । वाहते सव्य नाभीगंगा ।
वर्णु काय तीर्थ महिमा ऽऽऽ ।
स्थान हे पुलिन, असे जरी विजन, निवासे परम कृपेने पावन ते जाणिले ।
त्रिभूवनी क्षेत्र धन्य झाले । देखता मूर्ती गणेशाची । होईना तृप्ती नयनांची ।
आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।
जय जय सुमुख एकदंता । वरदा ऋद्धिसिद्धीकांता ।
जपता द्वादश नामांसी । कामना सिद्धी पदा नेसी।
शोभवी प्रणव रुप वदना । क्षाळितो तीर्थराज चरणां।
अहा ती अस्तसमय शोभाऽऽऽ ।
पूजितो तरणी। स्वर्णमय किरणी । निनदे गगनी । गर्जना मंद अंबुधीची । चालते दिव्य दुंदुभीची ।
आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ॥2॥
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला । भक्तगण येत दर्शनाला ।
उगवता धन्य माघमास । लागते रीघ यात्रिकांस ।
सकलजन नारी-नर येती । दर्शने पाप मुक्त होती ।
काय तो यात्रेचा दिवस ऽऽऽ ।
मिळेना वाट, उसळली लाट, स्वारीचा थाट, दाटते गर्दी भाविकांची । पालखी निघे मोरयाची ।
आरती गाऊनी सदभावे । त्रिविक्रम शांतिसुखा पावे ।
आस ही पुरवी दासाची । भक्ती दे अखंड चरणाची ।
आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।
रचना- त्रिविक्रम परशराम केळकर, गणपतीपुळे