दोन कान दोन हात, बाप्पा करी संकटावर मात: कथा रेडीच्या द्विभुज गणपतीची

September 6th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

शशांक मराठे, वेंगुर्ला

 

कोकण किनारच्या जलमार्गातील बंदर म्हणून रेडी सर्वदूर ज्ञात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्याच्या दक्षिणेस समुद्र किनारपट्टीला लागून हे गाव वसलेले आहे. ‘सौंदर्य हे पाहणा-याच्या नजरेत असतं’ अशा अर्थाची एक म्हण आहे. मात्र रेडी  परिसर आपल्या नैसर्गिक अमूल्य अशा ठेव्यामुळे पाहणा-याच्या नजरेला सौंदर्याचे निराळेच परिणाम देतो. हिरवेगर्द माडांचे बन, लाल माती, गरजणारा दर्या आणि रुपेरी वाळू यांचं लेणं नेसून उभे आहे रेवतीद्वीप, रेवतीपट्टण किंवा रेवतीनगर म्हणजेच आजचे रेडी गाव. लोहखनिजांच्या खाणींमुळे जगाच्या नकाशावर वेगळी ओळख ठेऊन असलेल्या या गावात सोळाव्या शतकात बांधण्यात आलेला ‘यशवंतगड’ ऐतिहासिक वारसा सांगतो तर श्री देवी माऊली, श्री महादेव आणि द्विभुज गणपती या धार्मिक स्थळांच्या त्रिवेणी संगमामुळे आध्यात्मिक अनुभूती देतो.

रेडी बंदर किनाऱ्याजवळच लोह खनिजाच्या खाणीच्या परिसरात १८ एप्रिल १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुज मुर्ती दृष्टांतात प्रकट झाली. या ठिकाणी श्रीगणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. दर संकष्ठीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते. रेडी येथील नागोळा वाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी हा ट्रक ड्रायव्हर म्हणून येथील लोहखनिजाच्या कंपनीत नोकरीला होता. रेडीतील मायनिंगच्या खाणीवरुन बंदराकडे व बंदराकडून खाणीकडे त्याच्या लोहखनिज भरलेल्या ट्रकची सतत ये-जा होत असे दि. १८ एप्रिल १९७६ रोजी एका विशिष्ट ठिकाणी त्याने आपला ट्रक उभा केला व तो तेथेच झोपला. पहाटेच्या सुमारास त्याला स्वप्न पडले व स्वप्नामध्ये श्रीगणपतीने येऊन त्याच ठिकाणी खोद आपले या ठिकाणी वास्तव्य आहे असा दृष्टांत दिला. त्यानुसार कांबळी व वासुदेव जुवेलकर यांनी मायनिंग कंपनीतील काही मजुरांच्या मदतीने खोदकामास सुरुवात केली. काही भागाचे खोदकाम करताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा व कानाचा भाग स्पष्ट दिसू लागला. लगेच ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या मंदिरात ही सर्व मंडळी गेली व त्यांनी देवीचा कौल घेतला. श्रीदेवी माऊलीने श्रीगणपतीच्या मूर्तीची त्याच ठिकाणी स्थापन करण्याचा कौल दिला. खोदकाम करता करता दि. १ मे १९७६ रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसली. श्री गणराया प्रगटले ! ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेमध्ये कोरलेली होती व मूर्ती जांभ्या दगडाचीच होती. सुमारे सव्वा महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला. श्रीगणेशाची ती द्विभुज भव्य मूर्ती अतिशय देखणी व सुबक दिसते. नवसाला पावणारा हा रेडीचा श्रीगणेश भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी गणेशाचे सुबक मंदिर बांधण्यात आले. प्रत्येक संकष्टीस व श्रीगणेशाच्या प्रगटदिनी अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने या परिसरास जत्रेचेच स्वरुप असते. अनेक भाविक पर्यटक रेडीच्या या गणपतीच्या दर्शनासाठी अगत्याने श्रध्देने येतात.

रेडी गावाला मोठा इतिहास आहे. असे सांगितले जाते कि सुमारे तेराव्या शतकात रेडी ही रेवतीनगर या नावाने सत्येश्वर राजाची राजधानी म्हणून ओळखली जात होती. यादरम्यान नाथपंथी सांप्रदायाचा प्रसार सुरू होता. त्यावेळचे नाथपंथीय श्री सिद्धेश्वर व आज तळवणे येथे समाधिस्थ झालेले परशुराम भारती महाराज यांनी नाथपंथांच्या प्रसारासाठी कोकण भागात वास्तव्य केले होते.

सिद्धपुरुषाच्या सिद्धविद्येने सत्येश्वर राजा भयभीत झाला होता. त्याने कट करून सिद्धपुरुषाला मारण्याचा प्रयत्न केला असता समुद्राने उग्ररूप धारण करून सत्येश्वर राजा व त्याची राजधानी रेवतीनगरला बुडवून टाकले अशी आख्यायिका सांगितली जाते. रेवतीनगरच्या अस्तानंतर या भूमीचे अस्तित्व व जागृती कायम टिकवून राहावी यासाठी ग्रामदेवता धावून आली. माऊली देवीच्या स्थापनेचा इतिहास देवी कोषामध्ये मिळतो.

श्रीदेवी माऊली ही स्वयंभू व नवसास पावणारी देवता रेडी येथे अनादिकाळापासून आहे, असे दिसून येते. तिला पार्वती म्हणूनही मानण्यात येते. कारण तिच्या शोधार्थ श्रीदेव महादेवाचा या भूमीला पदस्पर्श झाल्याने माऊली मंदिराजवळ स्वयंभू श्री महादेव मंदिर तसेच ३३ वर्षापूर्वी साक्षात्कारातून पकट झालेले द्विभुज श्रीगजानन ही तिन्ही ठिकाणे एका त्रिवेणी संगमात असल्याचे बारकाईने पाहिल्यास लक्षात येते.

गेल्या ५०-६० वर्षापासून अंधारी देवता या देवीच्या चतु:सीमेत काळे सोने आहे, असे सांगत होती. पण याचा अर्थ त्यावेळी कोणालाही समजला नाही. त्यानंतर रेडीत खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर रेडीतील रयतेला त्याची प्रचिती आली जी भक्तमंडळी या देवास मनोभावे भजतात, त्यांना प्रचिती येते व जे जे दुष्ट व अहंकार वृत्तीने वागतात त्यांना शासनही मिळते या अनुभवाची साक्षात अनेक उदाहरणे असल्याचे जाणकार सांगतात.

सध्या असलेल्या माऊली मंदिराचा मुख्य भाग सुमारे अडीचशे वर्षापूर्वी बांधल्याचे संकेत मिळतात. तर मंदिराच्या घुमटाचे प्लास्टर १८२८ मध्ये पूर्ण केल्याची नोंद मंदिराच्या भिंतीवर होती. जिल्ह्याच्या तुलनेत छोटेसे दिसणारे हे गाव असले तरी गावाची महती अवर्णनीय अशीच आहे.

वेंगुर्ले तालुक्यापासून १८ ते २० कि.मी. अंतरावर हे रेवतीनगर म्हणजेच रेडी आहे. येथे सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशहाने खाडीच्या मुखाशी, मोक्याच्या ठिकाणी किल्ला बांधला. रेडी गावातून प्रवेशद्वारापर्यंत जाणारी वाट आहे. इ.स.१६३२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यास ‘यशवंतगड’ असे नाव दिले. त्यावेळी या किल्ल्याची दुरुस्तीही केली मात्र कालांतराने १८१९च्या सुमारास इंग्रजांनी हा किल्ला सावंतवाडीकरांकडून जिंकून घेतला.

स्वातंत्र्यानंतर काही वर्षे या गडाकडे शासनाचे लक्ष होते परंतु त्यानंतर होत गेलेले दुर्लक्ष ही सध्याची गडाची पडझड पाहून लक्षात येते. वास्तविक येथील सुंदर सागरतीर, सभोवतालची वनराई आणि शिवस्पर्शाच्या इतिहासाची अखंड गाथा याचा सजगतेने फायदा करून घेता आला नाही. विशेष म्हणजे गडाच्या प्रवेशद्वारापासून एक वाट समुद्रकिनारा व तटाच्या बाजूने जाते. तेथे तटाच्या आतील बाजूस एका चौकोनी घुमटीत गणपतीची कोरीव पण दुर्लक्षित मूर्ती आहे. रेडीच्या प्रसिद्ध द्विभुज गणपतीच्या मूर्तीसारखीच या मूर्तीची घडवणूक आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions