श्री गणपतीचे स्वरूप आणि त्याचे रहस्य

September 6th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

चंद्रशेखर तेली, जामसंडे, तालुका देवगड

 

प्रत्येक मंगलकार्यात श्री गणपतीचे प्रथम पूजन करूनच सुरुवात केली जाते. यावेळी पूजनाच्या थाळीत मंगलस्वरूप गणपतींचे स्वस्तिक चिन्हांचे रेखाटन करून ,त्याच्या आजूबाजूला म्हणजे डाव्या व उजव्या बाजूला दोन दोन उभ्या रेषा काढल्या जातात. स्वस्तिक चिन्ह हे गणपतीचे स्वरूप आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला ज्या उभ्या रेषा काढल्या जातात त्या गणपतींच्या भार्यास्वरूप असलेल्या सिद्धी -बुद्धी आहेत. श्री गणपतींचा बीजमंत्र आहे – अनुस्वारयुक्त “ग”.  अर्थात” गं”.  श्री गणपतींचा जन्म चतुर्थी तिथीला झाला याचे तात्पर्य असे आहे की, श्री गणपती हे बुद्धीचे दैवत असून ते बुद्धी प्रदाता आहेत.

जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीया या चार अवस्था असून, या चारही अवस्थेतील चौथी अवस्था ही ज्ञानावस्था आहे. याचं कारणामुळे सर्वांना बुध्दीप्रदान करणाऱ्या  देवतेचा जन्म चतुर्थी तिथी मध्ये होणे हे अगदी सुसंगतच आहे.

श्री गणपतींचे पूजन सिद्धी, बुद्धी, लाभ आणि क्षेम प्रदान करते.हे चार बाबीनी युक्त असलेल्या स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूस असलेल्या चारही उभ्या रेषा याचे प्रतिकात्मक रूप आहे. अगदी याच प्रमाणे आपण श्री गणेशजींच्या प्रत्येक अंगावयवाचा विचार केल्यास या प्रत्येक  स्वरूपाचे स्वतंत्र असे एक रहस्य आहे हे आपल्या लक्षात येते. श्री गणपतींचे ठेंगण गोंडस बाल रुप  नजरेसमोर आणले की आपल्याला  सरळता, नम्रता या सद्गुणांसह स्वतःच स्वतःला लहान मानून  समाजात  वावरणे आवश्यक आहे हे मनाशी पक्के करूनच  मनुष्याने रहावे. समाजसेवी पुरुषाला ह्या गुणांचे आचरण करणेच श्रेयस्कर आहे. असे झाले तरच आपल्यात अहंकाराचा अंकुर रुजणार नाहीं. आणि अशी व्यक्तीच आपल्या कार्यात निर्विघनतापूर्वक सफलता प्राप्त करते.

श्री गणपती हे ‘गजेंद्रवदन’आहेत. भगवान शंकरांनी क्रोधाविष्ट होऊन त्यांचे मस्तक धडापासून वेगळे केले, आणि पुन्हा प्रसन्न होऊन हत्तीचे मस्तक जोडून दिले अशी घटना घडल्याचे इतिहासात वर्णन आहे. हत्तीचे मस्तक लावण्याचे तात्पर्य एवढेच आहे की ते स्वतः बुध्दीप्रद आहेत. मस्तक हेच बुद्धीचे (विचारशक्तीचे) प्रधान केंद्र आहे . हत्तीमधे सुद्धा बुद्धी ,धेर्य आणि गंभीरता  या गुणांचे प्राधान्य असते. हत्तीला काही खाऊ घातले तर तो इतर प्राण्यांप्रमाणे खाद्य पदार्थाला बघून ,शेपटी हलवत त्यावर तुटून पडत नाही. तर धीराने व गंभीरतापूर्वक त्याचे ग्रहण करतो.  हत्तीचे कानही खूप मोठे असतात. याचाही प्रत्येकाने ,साधकाने विचार करून  सर्वांचे शांतपणे ऐकून घ्यायची सवय लावून घेतली पाहिजे. नुसतं एकूण घेऊन फारसा उपयोग होईल असेही नाही तर ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर अतिशय गंभीरपणे विचार करावयास हवा.  तरच आयुष्यात सफलता मिळू शकेल. असे वागणारी व्यक्तीच यशस्वी झाली आहे अशी अनेक उदाहरणे आपणास आजूबाजूस पाहायला मिळतात.

श्री गणपती ‘लंबोदर ‘आहेत. श्री गणेश आराधना करीत असताना आपणास ही महत्त्वाची बाब लक्षात यावयास पाहिजे, की त्यांचे पोट फारच मोठे आहे. आपलेही  कितीतरीजनांचे पोट त्याच्यासारखे मोठेच असते. पण त्याचा उपयोग काही नाही.कारणं   गणेशजींच्या  मोठ्या पोटाचे खरे काम आपल्याला कळले नाही.  खरंतर  दैनंदिन जीवनात   आपले कर्म करीत असताना , प्रत्येकाचे  बरे वाईट मत ,विचार  आपल्यापर्यंत आल्यावर त्यावर अचानक प्रतिक्रिया न देता , घाईगडबडीने त्यावर मत व्यक्त न करता आपल्या पोटात ठेवायला शिकलं पाहिजे. अश्या अर्थाने पोटाच्या आकाराचा विचार करावयास हवा. सर्व गोष्टी आपल्या पोटात ( मनात)  सामावून घेता आल्या पाहिजेत. योग्य वेळी त्याचा वापर करुन शहाणपणा दाखवता आला पाहिजे.

श्री गणपतींचा एक दात असल्याने त्यांना’ एकदंत’ असेही संबोधले जाते. हा एक दात आपल्याला एकतेचा ,संघटनात्मक असण्यासाठीचा विचार देतो.  नेहमी आपण असं ऐकतो की ,अमुक एका व्यक्तींच्या समूहात एकसंधपणा आहे, ते एकजुटीने काम करतात. यावर एक म्हण आहे ,”एक दाताने रोटी खातात”.  अगदी याच प्रकारे आम्हाला गणेशजी  एकतेची शिकवण देतात . त्यांना मोदक लाडू आवडतो ,लाडू हे प्रतीक फार सुंदर आहे, विखुरलेल्या बुंदीला आपण एकत्र वळून त्याचा लाडू  बनवतो आणि त्याचा प्रसाद श्री गणपतींना अर्पण करतो.  समाजात एकटी व्यक्ती काहीच करू शकत नाही, व्यक्तींचा सुसंघटित समाजच  योग्य दिशेने मार्गक्रमण करू शकतो.

श्री गणपती आपल्याला या मोदक लाडू या प्रतिकातून हाच संदेश देत आहेत. समाजातल्या  सर्व स्तरातल्या व्यक्तींना हे पदार्थ माहित आहेत.

श्री गणपतींनी आपल्या अंगावर  सिंदूर लेपन करून घेतले आहे. सिंदूर सुद्धा सौभाग्यसुचक आणि मांगलिक द्रव्य आहे. तसेच दुर्वांकुर हे शीतल असल्याने  त्या गणपतींना प्रिय आहेत. त्या फार कोमल आणि सरळ ,नम्रतेचं प्रतीक आहेत.  गुरू नानक ह्या दुर्वांचं फार छान उदाहरण देतात. ते म्हणतात, *नानक नन्हे बनी रहो, जैसी नन्हे दूब । सबै घास जरी जायगी, दूब  खूब-की खूब ।।*  गणपतीची आराधना करणाऱ्या भक्तजनांच्या कुलवंशाची वृद्धी या पसरत जाणाऱ्या ,वाढत जाणाऱ्या दुर्वांप्रमाणे होत राहो ,त्यांना स्थायी सुखाची प्राप्ती होवो अशीच यामागे कल्पना आहे.

श्री गणपतींना उंदराची सवारी कशासाठी ? त्याचं तात्पर्य एवढंच आहे ते असे की, या उंदराचा स्वभाव ! कुठल्याही वस्तूला कुरतडण्याचा .  वस्तू नवीन असो की जुनी ,उंदीर ती नाहक कुरतडणारच. अगदी अशाच प्रकारे कुतर्की लोकसुद्धा प्रसंग किती सुंदर आहे ,हिताचा आहे याचा जराही विचार करत नाहीत. उलट  स्वभाववश ते याची चेष्टाच करतात. प्रबल बुद्धीचे साम्राज्य आले की अश्या प्रकारची कुतर्की बुद्धी दबली जाते. श्री गणपती अखंड बुध्दीप्रद असल्याने त्यांनी कुतर्क रुपी उंदराला वाहनरूपाने आपल्याखाली दाबून ठेवले आहे.अश्याप्रकारे आपणांस श्री गणपतींच्या प्रत्येक श्रीअंगांपासून  नेहमीच्या व्यवहारात कसे वागावे याचे शिक्षण मिळते.श्री गणपतींच्या या स्वरूपाचे आणि त्यांच्या रहस्याचे   आपण महत्व जाणून घेणे अत्यन्त आवश्यक आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions