पुणे – आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त 8 सप्टेंबर 2017 रोजी राष्ट्रीय साक्षरता मिशन प्राधिकरण स्कूल शिक्षा व साक्षरता विभाग,मानव संसाधन विकास मंत्रालयाच्यावतीने विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साक्षर भारत योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात प्रौढ साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाच्या प्रभारी उपसंचालक प्रिया शिंदे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्राकात म्हटले आहे, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर, यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार असून यावेळी मानव संसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा, डॉ. सत्यपाल सिंह उपस्थित राहणार आहेत. साक्षर भारत योंजनेंतर्गत महाराष्ट्रातील जालना, हिंगोली, गडचिरोली, परभरणी, बीड,उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नंदुरबार व गोंदिया या 10 जिल्हयातील प्रौढ निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दीष्ट आहे.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून दि. 8 सप्टेंबर 2017 रोजी या 10 जिल्हयामध्ये साक्षरता दिन साजरा करण्यात येणार आहे. याबाबत स्थानिक पातळीवर निरक्षर प्रौढ महिला व पुरुषांमध्ये निरंतर शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी प्रभात फेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच बरोबर आपले शिक्षण व आपला विकास आणि अक्षरधारा पुस्तक निरक्षरांना वाटणे,स्थानिक कलाकारांच्या निरंतर शिक्षणाबाबत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन समाजातील निरक्षरांना साक्षर होणेसाठी प्रोत्साहन देणे आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांना अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक टी.एन. सुपे, प्र. उपसंचालक प्रिया शिंदे, अधीक्षक नितीन अलकुंटे, समाज शिक्षणाधिकारी डॉ. बी.एस. कारेकर उपस्थित राहणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.