पुणे – मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात राहणाऱ्या सौ. प्रगती साधवानी (वय 32) या गर्भवती महिलेची 85 दिवसांच्या कोमातून सुटका आणि सुखरुप प्रसूती करण्याचा चमत्कार येथील ‘रुबी हॉल क्लिनिक’मधील डॉ. सुनीता तांदूळवाडकर आणि डॉ. आर. एस. वाडिया यांनी घडवून दाखवला आहे. प्रगतीला मधुमेह असून त्यावर ती गेले 8 वर्षे उपचार घेत आहे. ती साडेतीन महिन्यांची गर्भवती असताना गेल्या 5 मार्चला तिला अचानक आकडी येऊन तोंड वासले गेले आणि शुद्ध हरपून तिने बोलण्याची क्षमता गमावली. तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि 15 दिवस उपचारांदरम्यान ती आकडीमुळे रक्तातील साखर कमी होऊन बेशुद्धीत (हायपोग्लायसेमिक कोमा) गेल्याचे निदान झाले. उपचारांनंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर तिच्या फॅमिली डॉक्टरांनी तिला पुण्यातील ‘रुबी हॉल क्लिनिक’च्या डॉ. वाडिया यांच्याकडे पाठवले.
डॉ. वाडिया यांच्या देखरेखीखाली मस्तिष्क व मधुमेह उपचारांसाठी प्रगती ‘रुबी हॉल क्लिनिक’मधील हाय डिपेन्डन्सी युनिटमध्ये (एचडीयू) गेल्या 20 मार्चला दाखल झाली. ती 17 आठवड्यांची गर्भवती असल्याने प्रसूतिपूर्व सुरक्षेसाठी तिला डॉ. सुनीता यांच्याकडे सोपवण्यात आले. डॉ. सुनीता यांनी प्रगतीच्या प्रकृतीचा पूर्वेतिहास तिच्या नातलगांकडून काळजीपूर्वक नोंदवून घेतला आणि त्यानुसार सविस्तर व्यवस्थापन आराखडा आखला. स्वतःच्या देखरेखीखाली त्यांनी प्रगतीवर क्रमवार सोनोग्राफी चाचण्या केल्या आणि गर्भाच्या हृदयाच्या ठोक्यांवर रोज लक्ष ठेवले. प्रगतीच्या आहाराचेही उत्तम नियोजन करण्यात आले व तिच्या शरीरातील प्रमुख अवयवांवर, तसेच रक्तातील साखरेच्या प्रमाणावर काटेकोर लक्ष देण्यात आले. एकूण 132 दिवसांपैकी जवळपास २२ दिवस ती ‘एचडीयू’ विभागात होती. प्रकृतीत सुधारणा दिसून आल्याने तिला रुग्ण विभागात हलवले. रुग्णालयात दाखल झाल्यापासून तब्बल 85 दिवसांनी प्रगतीने पहिला शब्द उच्चारला. हळूहळू तिला सभोवतीच्या वातावरणाचे भान आले, ती बोलू लागली आणि तिला पोटातील बाळाच्या हालचालीही जाणवू लागल्या. डॉ. सुनीता यांनी हा सर्व काळ प्रगतीची अत्यंत काळजी घेतली. वेळोवेळी प्रतिजैविके आणि उत्तेजके देत रोजची सीटीजी देखरेख सुरु ठेवली.
प्रगतीला 33 व्या आठवड्यात जोराच्या प्रसूतिकळा सुरु झाल्या आणि तिने 2.2 किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला. या चिमुकलीला काही काळशिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ठेवले गेले. प्रसूतीनंतर आईला संसर्ग न होता तिच्याकडून मुलीला नियमित स्तनपान पोषण मिळेल, याची सर्वतोपरी काळजी डॉ. सुनीता यांनी घेतली. या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे फलित म्हणजे प्रगती आज सहजतेने हिंडू-फिरु आणि बोलू शकते आणि सुदृढ मुलीसमवेत समाधानाने खेळते.
डॉ. सुनीता तांदूळवाडकर आणि डॉ. वाडिया यांच्या अथक प्रयत्नांमुळे केवळ एका आईचाच नव्हे तर तिच्या पोटातील मुलीचाही जीव वाचला. प्रगतीच्या नातलगांना तर या डॉक्टरांचे कोणत्या शब्दांत आभार मानावेत, हेच सुचत नव्हते. डॉ. तांदुळवाडकर यांनी प्रगतीच्या वैद्यकीय खर्चाचे बिल माफ केल्याने तिचा भाऊ केशव मलानी आनंदाने भारावून गेला. बहीण आणि भाचीला जीवदान मिळवून दिल्याबद्दल आपले कुटूंबीय या डॉक्टरांचे कायमचे ऋणी असल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली आहे. ‘रुबी हॉल क्लिनिक’मध्ये आपल्याला मिळालेल्या सकारात्मक अनुभवाविषयी प्रगतीच्या कुटूंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र पाठवून कळवले आहे.