पुणे – शेतमालाची मागणी आणि पुरवठ्याचा समतोल राखायचा असेल तर शेतमाल तारण कर्ज योजना अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यशाळा व शेतमाल तारण कर्ज योजना 2016-17 पुरस्कार वितरण कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ सभापती दिलीप मोहिते, आ. माधुरी मिसाळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार, सरव्यवस्थापक दिपक शिंदे, सहाय्यक व्यवस्थापक एम. एल. लोखंडे, पणन संचालक डॉ. ए.बी. जोगदंड, कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापक जे.जे जाधव उपस्थित होते.
सुभाष देशमुख म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमाल काढणी हंगामात कमी भावाने विक्री न करता तो शेतमाल बाजार समितीच्या गोदामामध्ये तारणात ठेवून शेतकऱ्यांना तारण कर्जाच्या स्वरुपात कमी व्याजदराने त्वरित सुलभ निधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी आहे. यामुळे कमी भावात शेतमाल विकून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी होणार आहे. शेतकऱ्यांचे तारण करता बाजार समिती आहे. त्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती देवून मदत करा व योग्य मार्गदर्शन करुन प्रामाणिकपणे काम करा, अशाही सूचना देशमुख यांनी बाजार समितीच्या सदस्यांना दिल्या.यावेळी त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना काजूसाठी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच या योजनेची माहिती राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देवून पुरस्कार प्राप्त बाजार समित्यांना शुभेच्छा दिल्या.
चार्टर्ड अकाऊंटन्ट डॉ. संजय बुरड यांनी जी.एस.टी कायदा व बाजार समित्या या विषयावर मार्गदर्शन केले, सरव्यवस्थापक दिपक शिंदे यांनी शेतमाल तारण कर्ज योजेची सविस्तर माहिती दिली, सहाय्यक व्यवस्थापक एम. एल. लोखंडे यांनी बाजार समित्यांमधील ई-ट्रेर्डींग व ई-ऑक्शन बाबत माहिती दिली तसेच डॉ. ए. बी. जोगदंड यांनी बाजार समिती कायद्यातील प्रस्तावीत बदलांबाबत माहिती दिली.
दरम्यान सन 2016-17 मध्ये शेतमाल तारण कर्ज योजने अंतर्गत जिल्हा स्तरांवर अकोला, लातूर, अमरावती, वाशिम वर्धा, परभणी, सोलापूर, अहमदनगर येथील बाजार समित्यांना पुरस्कार देण्यात आले.तसेच विभागीय स्तरावर अमरावती, नागपूर, लातूर, पुणे, नाशिक व औरंगाबाद या कार्यालयांना देखील पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सदस्य, राज्यातील सर्व बाजार समिती सहकारी संघटनेचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.