पुणे : देशात होणाºया फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, जागतिक क्रमवारीत देशाचे नाव उंचावणारा फ्री स्टाईल फुटबॉलपटू कुणाल राठी याने केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी पुण्याच्या फुटबॉल डे चा समारोप झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून 25 लाख खेळाडूंनी फुटबॉल खेळून विश्वचषकाला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, राजेश पांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, शरदचंद्र धारुरकर, संतोषअप्पा दसवडकर, अमित गायकवाड, जयदीप अंगिरवार, शिवाजी कोळी, प्रविण बोरसे, प्रदीप जागडे, कमलाकर डोके, विश्वनाथ पाटोळे, राजेंद्र घुले आदी उपस्थित होते.
विजय संतान म्हणाले, फेडरेशन आॅफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशनच्या (फिफा) वतीने 6 ते 28 आॅक्टोबरच्या दरम्यान 17 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंमध्ये खेळाची आवड निर्माण होवून अधिकाधिक खेळाडूंनी फुटबॉल खेळण्यासाठी प्रवृत्त व्हावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
**पुण्यामध्ये 2060 ठिकाणी फुटबॉल सामन्याचे आयोजन झाले. सर्व शाळांमध्ये मिळून एकूण 2 लाख 60 हजार पेक्षा जास्त खेळाडूंनी महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन या उपक्रमात सहभाग घेतला.