कॉंग्रेसचा नारायण राणेंना जोरदार धक्का !

September 16th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

कॉंग्रेसचा नारायण राणेंना जोरदार धक्का !
सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसची कार्यकारिणी बरखास्त
काँग्रेसलाही सहन करावा लागणार मोठा फटका

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. नवे जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जिल्ह्यातील कॉंग्रेस संघटनेतील वर्चस्वाला प्रदेश कॉंग्रेसने दिलेला हा धक्का मानला जात आहे. विद्यमान कॉंग्रेस कार्यकारिणीत बहुसंख्य राणेसमर्थक पदाधिकारी होते. राणेंच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसचा हा निर्णय म्हणजे कोकणातील तापलेल्या राजकीय वातावरणाला आणखीन हवा देण्यासारखाच आहे.
गेले काही महिने श्री. राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. यातच राणे आणि प्रदेश कॉंग्रेस यांच्यातील दुरावा कायम आहे. वेळोवेळी राणेंनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनी तर चव्हाण यांच्यावर थेट टीकेची तोफ डागली होती. इतके होवूनही प्रदेश कॉंग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
गेल्या आठवड्यात कॉंग्रेसने जिल्ह्यात माजी खासदार हुसेन दलवाई, राजन भोसले हे निरीक्षक पाठविले. त्यांनी कॉंग्रेसची बैठक बोलावली; मात्र याला राणेंना आमंत्रित केले नव्हते. तर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता सामंत यांनी त्याच दिवशी ओसरगाव येथे बैठक बोलावली होती. निरीक्षकांच्या उपस्थितीत सावंतवाडीत झालेल्या बैठकीला राणे समर्थक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत श्री. दलवाई यांच्यासह इतर निरीक्षकांना राणेंना न बोलावण्याबाबत जाब विचारला. यानंतर निरीक्षकांनी आपला अहवाल प्रदेशकडे सुपूर्द केला होता. या पार्श्‍वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी बरखास्त केल्याची व नवे जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांच्या नियुक्तीची घोषणा प्रदेश कॉंग्रेसने प्रेसनोट काढून केली.
प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आज सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी, ब्लॉक अध्यक्ष व ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या नियुक्‍त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे यात नमूद आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व कॉंग्रेस कमिट्या बरखास्त झाल्या आहेत. सध्या जिल्हा व तालुका कॉंग्रेस कमिट्यांवर कार्यरत बहुसंख्य पदाधिकारी राणेंचे नेतृत्व मानणारे आहेत. त्यामुळे प्रदेश कॉंग्रेसकडून या कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय राणेंच्या कॉंग्रेसमधील संघटनात्मक फळीसाठी धक्कादायक म्हणावा लागेल. दरम्यान या निर्णयाचा फटका काँग्रेसला बसणार हे नक्कीच.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions