पुणे – रेल्वेच्या वतीने स्वच्छता अभियानास 15 सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून 2 ऑक्टोबर पर्यंत ते सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली. या अभियानांतर्गत मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध रेल्वे स्थानके, प्लॅटफॉर्म, रेल्वे, रेल्वे कॉलनी येथे स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. येत्या काही दिवसांत पुणे रेल्वे स्थानक परिसरात विविध संघटना, प्रवासी, स्वयंसेवकांकडून स्वच्छता मोहिम राबविली जाणार असून श्रमदान करून साफसफाई केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे पोस्टर, बॅनर, उद्घोषणा, सेमिनार या द्वारे प्रवाशांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण करून त्याचा प्रसार करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. रेल्वेतील स्वच्छतागृह देखील स्वच्छ करण्यात येणार असून ऑडिओ व व्हिजुअल द्वारे प्रवाशांमध्ये समाजप्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे केर-कचरा स्थानकांवरील कचरा पेटीतच टाकण्यात यावा व सिगारेट, कागद, कप, प्लेट्स, प्लास्टिकच्या बाटल्या रेल्वेतील बायो टॉयलेटमध्ये टाकू नयेत, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे. 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार असून अभियानाची सांगता त्याच दिवशी करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.