पुणे – अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी राज्यभर पावसाने दमदार कमबॅक केले. गेल्या 2-3 दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबईत पाऊस बरसत होता. मात्र त्याचा जोर कमी होता. शनिवारी मात्र पुण्यासह मध्य महाराष्ट्रात सातारा, महाबळेश्वर येथे तो संततधार अशा स्वरूपाचा बरसला. कोकण, घाटमाथा, मुंबईत हलका ते मध्यम स्वरूपाचा तर विदर्भ, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, येत्या 48 तासांत मुंबई, कोकणात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कर्नाटक किनारपट्टी ते केरळदरम्यान किनारपट्टीलगत समांतर कमी दाबाचे क्षेत्र (ऑफ शोअर ट्रफ) निर्माण झाले असून हवेच्या वरच्या थरातील चक्रीवादळ कोकण, विदर्भ, बंगालच्या उपसागरात व ओडिशा येथे तयार झाले आहे. या सर्व स्थितींचा एकत्रित परिणाम म्हणून कोकणसह राज्यभर शनिवारी दमदार पाऊस बरसला, असेही हवामान विभागाने नमूद केले आहे. पुढील 2-3 दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असून त्यानंतर त्याचे प्रमाण कमी होईल, असेही सांगण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत श्रीवर्धन 70 मि.मी, सावंतवाडी 60 मि.मी, रत्नागिरी 40 मि.मी, चिपळूण 30 मि.मी, सातारा 50 मि.मी, महाबळेश्वर 10 मि.मी, औरंगाबाद 90 मि.मी, उस्मानाबाद 40 मि.मी, लातूर 10 मि.मी, बुलढाणा 90 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.