अॅड. शशांक मराठे
स्वच्छता आणि कचरामुक्तीच्या बाबतीत वेंगुर्ले शहराने मिळविलेले यश राज्यातच नाही तर राष्ट्रीय पातळीवर देखील मैलाचा दगड ठरले आहे. हागणदारीमुक्ती आणि प्लॅस्टिकमुक्त शहर अशा लौकिकाची देश पातळीवर नोंद घेण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यातील वेंगुर्ले, लोणावळा व शिरुर (जि. पुणे), सांगोला (जि. सोलापूर), देवळाली-प्रवरा (जि. अहमदनगर), उमरेड (जि. नागपूर), कागल, मुरगुड, पन्हाळा (जि. कोल्हापूर), पाचगणी (जि. सातारा) या पालिकांनी सर्वोत्कृष्ट कार्य केले आहे. याआधी राज्यस्तरावर गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत वेंगुर्ले नगरपरिषदेने हागणदारीमुक्त स्वच्छ शहर, वसुंधरा पुरस्कार असे राज्यस्तरावरचे पुरस्कार पटकावले आहेत. मुख्याधिकारी रामदास कोकरे, नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा नार्वेकर, सर्व नगरसेवक, नगरपरिषदेचे कर्मचारी, सफाई कामगार यांचे उत्कृष्ट नियोजन आणि त्याला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे दिलेले सहकार्य यामुळे वेंगुर्ले शहराने ही मजल मारली आहे.प्लॅस्टिकमुक्तीचा पॅटर्न राज्यभर राबविणार मुख्याधिकारी रामदास कोकरे आणि नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी अतिशय नियोजनबद्ध रितीने प्लॅस्टिक आणि कचरामुक्तीचा पॅटर्न राबविला. शहरातील व्यापारी, सदनिकाधारक, सोसायटीचे सदस्य, रिक्षाचालक, हॉटेलचालक यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात बैठका घेण्यात आल्या. जनजागृतीसाठी पोस्टर्स, पत्रके, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रॅली काढण्यात आल्या. शालेय पातळीवर निबंध, प्रश्नमंजूषा यासारखे उपक्रम राबविण्यात आले. या सर्वांचे फलित म्हणजे शहरातील प्रत्येक वयोगटापर्यंत स्वच्छतेच्या विषयाचे महत्व पोहोचले. नागरीक सुका व ओला कचरा अशी विभागणी करुन तसा कचरा न.प.च्या ओझोन घंटागाड्यांमध्ये देऊ लागले. कचरा एकत्र करण्यासाठी नगरपरिषदेने जास्तीची वाहने देखील खरेदी केली. यामुळे विशिष्ट वेळेत कचरा उचलला जाऊ लागला.प्लॅस्टिक कॅरीबॅगपासून मुक्ती खरेदीला जाताना प्लॅस्टिक कॅरिबॅग वापरणे ही वर्षानुवर्षाची घातक सवय मोडायला कोकरे आणि त्यांच्या टीमला विशेष प्रयत्न करावे लागले. जनजागृतीचा भाग म्हणून सुरुवातीला शहरातील बँका, यु.एन.डी.पी. प्रोजेक्टच्या सहकार्याने नागरिकांना कापडी पिशव्या आणि डस्टबीनचे वाटप करण्यात आले. शहरातील व्यापा-यांनी देखील प्लॅस्टिक कॅरीबॅग ग्राहकांना न देण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. प्रसंगी नगरपरिषदेच्या कर्मचा-यांना दंडात्मक कारवाई करावी लागली. आता अगदी कॉलेजची मुलेदेखील कापडी पिशवी घेऊन बाजाराला जाताना दिसतात. रविवारच्या बाजारानंतर अगर गणपतीच्या गजबजलेल्या अकरा दिवसात कधीही रात्रीचा फेरफटका मारलात तर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग आणि रस्त्याच्या कडेला दिसणारा कच-याचा ढीग औषधालाही मिळणार नाही. बाजारासाठी पिशवी नेली नसेल तर ५ ते १० रुपयांची कापडी पिशवी खरेदी करण्याची मानसिकता आता तयार झाली आहे.झीरो गारबेज – झिरो डंपींग शून्य कचरा आणि शून्य कच-याची साठवणूक… वाचायला किवा ऐकायला हे शब्द जरी स्वप्नरंजक वाटले तरी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या टीममुळे सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हे सत्यात उतरले आहेत. शहरातील एकत्र केलेला सुका व ओला कचरा सामान्यपणे डंपींग ग्राऊंडवर आणून एकत्र केला जातो. कित्येक महिने हा कचरा तसाच पडून राहतो. मग कधीतरी रात्री आग लावली जाते. राज्यासह देशाला भेडसावणा-या समस्येला वेंगुर्ले शहराने या पथदर्शी प्रकल्पातून उत्तर दिले आहे. प्लॅस्टिक क्रशर मशिनमधून प्लॅस्टिकच्या कच-यावर प्रक्रिया केली जाते आणि ह्या प्रक्रिया केलेल्या प्लॅस्टिकच्या ८ टक्के घटकांचा वापर वेंगुर्ले शहरातील रस्ते डांबरीकरणावेळी करण्यात आला. बेंगलोर नंतर हा प्रयोग करणारे वेंगुर्ला हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. पूर्वी कचरा डंपींग ग्राऊंडच्या बाजूने जाताना नाकाला रुमाल बांधायला लागायचा. आता त्याच ग्राऊंडवर मुलं खेळताना दिसत आहेत. कचरा मुक्तीचा हा पॅटर्न यशस्वीपणे राबविणारी वेंगुर्ला ही राज्यातील पहिली नगरपरिषद ठरली आहे. मुख्याधिकारी रामदास कोकरे, नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा नार्वेकर, सर्व नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी, सफाई कामगार यांच्या एकत्रित ‘टीमवर्क’ला शहरवासीयांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे वेंगुर्ले शहराने स्वच्छतेमध्ये सातत्य राखल्याचे दिसत आहे. अर्थात स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज वेंगुर्ले शहरातील पथदर्शी प्रकल्प राज्यात सगळीकडे राबविले जाणार आहेत, ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. ती कायम ठेवण्याची जबाबदारी पर्यटनदृष्ट्या विकसीत होण्याची क्षमता असलेल्या वेंगुर्ले शहरातील नागरिकांची देखील तेवढीच आहे.