डांबराच्या बॅरलला पडणारी भोके थांबली नाहीत तर…

September 17th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांसी,

स.न.वि.वि

गोष्ट गत वर्षातली आहे. एक सच्चा दिलाचा हक्काचा मार्गदर्शक आणि कसलीही भीड न बाळगता आपली मत स्पष्ट्पणे मांडणाऱ्या कवी मित्राला आम्ही गमवल. कणकवली पासून ५ कि. मी. वरील जानवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा सात फुटी खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या उत्तम पवार याच्या बाइकला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिली आणि ४८ वर्षांच्या एका समर्पित आयुष्याची अखेर झाली. कणकवली तालुक्यातील भिरंवडे हे त्याचे जन्मगाव. जातीव्यवस्थेने लादलेली अभावग्रस्तता त्याच्याही वाट्याला आली. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली धर्मांतराची लाट यातून ऊर्जा मिळवत त्याने व्यक्तिगत आयुष्यातील अभावग्रस्ततेवर मात केली. त्याच्या सामाजिक जीवनाची सुरुवात छात्रभारती या विद्यार्थी संघटनेपासून झाली. पुढे फुले-आंबेडकरांचा वैचारिक वारसा समजून घेताना त्याला जातिअंताच्या लढ्याचे भान येत गेले आणि त्याच्या पुढील विचारांची दिशा निश्चित झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षात त्याने आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ‘दर्पण सांस्कृतिक मंच’ या युवा संघटनेची केलेली स्थापना ही त्याच्या आयुष्यातील आणि सिंधुदुर्गातील सामाजिक-सांस्कृतिक चळवळीतील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना ठरली. ‘दर्पण’च्या माध्यमातून उत्तम पवारने कणकवली तालुक्यातील सर्व दलित वस्त्यांतील तरुणांना सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याशी जोडून घेतले. त्याच्यात सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवल्या, वाड्या-वस्त्यांवर श्रमदान शिबिरे घेतली. चळवळीच्या पारंपरिक प्रबोधनाची चौकट भेदत तरुण-तरुणींना त्याने जातिअंताच्या लढ्याचा कार्यक्रम दिला. या चळवळीला त्याने २५ वर्षे एकहाती नेतृत्व दिले. सामाजिक कार्याला समांतर असे मोलाचे काम त्याने कवितालेखनाच्या रूपाने केले. ‘सत्तेच्या आतबाहेर’ हा त्याचा पहिला संग्रह त्याच्यातील विद्रोही कवीची सखोल सामाजिक जाण प्रतीत करणारा होता. सृजन प्रकाशनने प्रकाशित केलेली त्याची ‘पान-बेळे’ ही पोस्टर कविता खूप गाजली. सिंधुदुर्गातील बौद्ध समाजांतर्गत असलेल्या पान आणि बेळे या पोटजातींतील भेदावर त्याने या कवितेतून भेदक भाष्य केलेच पण प्रत्यक्ष कृतीतूनही या पोटजातीतील भेद मिटवण्याचा निकराचा प्रयत्न केला. कणकवलीत पहिले फुले-आंबेडकरी साहित्य संमेलन तसेच विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात त्याचा पुढाकार होता. ‘अक्षरसिंधू साहित्य चळवळ’ स्थापन करून त्याने सांस्कृतिक क्षेत्रातही कामाचा मोठा ठसा उमटवला.असे हे वादळ थांबले ते सर महामार्गावरील एका खड्यामुळे.  तसे या मार्गावर दर वर्षी मरणाऱ्यांची संख्या शेकडोत आहे. परंतु ते शेकडो लोक कुणासाठीतरी अत्यंत महत्वाचे होते, अगदी आमच्या उत्तमसारखे. गत काही वर्षातली मला आकडेवारी मिळाली आहे. अर्थात मुंबई गोवा महामार्गावर गतप्राण झालेल्या लोकांची. सन २०१० ते २०१५ या ५ वर्षाच्या कालावधीत ३ हजार १५९ अपघात झालेत त्यात ७३६ जणांनी आपला प्राण गमावला. या मरणाऱ्या लोकांमध्ये कुणाचातरी मुलगा, कुणाचातरी पती, कुणाचातरी बाप, कुणाचीतरी आई कायमची सोडून गेली. उत्तम पवारच्या जाण्याने तर एक मोठी चळवळच थांबली. सन २०१० मध्ये ६७५ अपधात झाले, १८२ जण गतप्राण झाले. २०११ मध्ये ६११ अपघात झालेत यात १३६ जण, २०१२ मध्ये ६१९ अपघातात १२४ जण, २०१३ मध्ये ४८७ अपघातात १२२ जण, २०१४ मध्ये ४५७ अपघातात ९३ जण आणि २०१५ या वर्षात झालेल्या ३१० अपघातात ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. या काळात जखमी झालेल्यांची संख्या ४ हजार एवढी आहे. दर वर्षाची अपघातांची व त्यात मरणाऱ्यांची सरासरी सारखीच आहे. या अपघातांना काही प्रमाणात भरधाव वेग हे कारण असले तरी ते प्रमुख व सयुक्तिक कारण नाही. कारण या मार्गाची गेल्या काही वर्षातली अवस्था पाहिल्यास भरधाव वाहन चालवणं तस दुरापास्तच आहे. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी ठिकठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. भराव, पुलाची कामे वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. रस्त्याच्या विभाजनाबाबतच्या सूचना देणारे चिन्हांचे बोर्ड पहायलाच मिळत नाहीत. त्यातही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मार्गावर झालेले खड्डेच खड्डे. हि अपघातांची प्रमुख कारणे आहेत. अलीकडेच महाडमधील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुल कोसळला. त्याच्या आदल्या रात्री आम्ही मुंबईकडे रवाना झालो होतो. सावित्रीचे ते त्या रात्रीचे विक्राळ रूप उद्या आपला अवतार दाखवेल याची पुसटशीही कल्पना त्यावेळी करवली नाही. विशेष म्हणजे आमच्या अभियंत्यांनी हे पुल निर्धोक असल्याचे भाकीत ते कोसळण्या पूर्वी केले होते. तुम्हाला माहित आहे का आज याच मार्गावर अनेक ब्रिटिशकालीन पुल यम दूत बनून उभी आहेत. सण १९३१ चे बांधकाम जगबुडी पुल,सण १९४३ वाशिष्ठी पुल, १९३९ सोनवी पुल, शास्त्री पुल, १९२५ बावनदी पुल, १९३१ आंजणारी पुल, वाकेडी पुल, १९४४ राजापूर पुल, १९४६ खारेपाटण पुल, १९४१ पियाळी पुल, १९३४ जाणवली पुल, गडनदी पुल, कसाल पुल, १९३८ बांबर्डे पूल. या धोकादायक पुलावरून आजही वाहतूक सुरु आहे. यातील अनेक पुलांचे खांब खालून पाहिल्यास त्यांना तडे गेलेले, त्यांच्या दगडांची झिझ झालेली आणि त्याला आमच्या अभियंत्याच्या सुपीक कल्पनेतुन केली गेलेली मालपट्टी पहायला मिळते.  आता रखडलेल्या कामांना शासनाकडून वेळेत निधी उपलब्ध न होणे, वेळोवेळी बदलणाऱ्या शासकीय धोरणांचा परिणाम होणे,शासनाच्या विविध खात्यांमध्ये गुंतागुंत असणे अशी काही कारण आम्ही मान्य करतो. परंतु जे काही काम पूर्ण होते ते करून घेताना तुमचे वारसदार म्हणून अभियांत्रिकी पदवी घेतलेले तज्ञ महाशय नेमके कुठे कमी पडतात हा संशोधनाचा विषय आहे. काही वर्ष पूर्वीची हि गोष्ट येथे सांगावीशी वाटते. कोकणातल्या वृत्तपत्रात कॉलम भरू पत्रकारिता चालते. म्हणजे मिळणारे मानधन हे कॉलमच्या हिशेबात असते.अशा प्रकारे काम करणारा आमचा एक पत्रकार मित्र मुख्य कार्यालयात मिटिंगसाठी येताना होणार पेट्रोलचा खर्च वसूल व्हावा म्हणून मार्गावरील खड्डे मोजत आला आणि दुसऱ्यादिवशी त्याने त्या अंतरात किती खड्डे आहेत याची बातमी केली. या आणि अशा बातमीची कात्रण एकत्र करून चक्क एका अभियंता महाशयांनी सदर मार्गाच्या खड्डे बुजविणाच्या कामी योजना तयार करून कार्पेट अर्थात डांबर खडीच्या थराचे काम मंजुरीला पाठविले. पुढे या कामातून काय साध्य करण्यात आले ते येथे सांगत नाही. माझ्या अनेक अभियंता मित्रांनी बातमी हि त्यांना कशी मदतगारच ठरत असते याची या सारखी अनेक उदाहरणे सांगितली आहेत.  सर तुम्हाला हे कितपत माहित असेल माहित नाही परंतु सरकारी खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा ठेकेदाराला मिळालेल्या कामात काही टक्के हिस्सा असतो असे म्हटले जाते, ते खर असेल तर फारच कठीण आहे. दुसरी बाब अशी अभियांत्रिकी क्षेत्रात आपण बरेच प्रयोग केलात हे प्रयोग अलीकडे थांबलेले दिसतात, कदाची ते खरही नसेल. मात्र मुंबई गोवा हा मार्ग जास्त पर्जन्यमान असलेल्या प्रदेशातून जातो. परिणामी यावर पाऊस पडला कि खड्डे पडतात. या बाबीचा अभ्यास करून हा मार्ग वाहतुकीसाठी निर्धोक बनविणारा एकही अभियंता कोकणात का मिळत नाही? आणि येत नाही? याच कारण काही केल्या सापडत नाही. कि “प्रश्नाचे हल काढणे म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी मारून खाणे” असे काही कारण त्याला आहे काय? आणि ते असेल तर त्या सारखे दुसरे दुर्दैव नाही. खड्डे पडत राहतील, अपघात होत राहतील, माणसे जखमी होतानाच अनेकजण मरत राहतील. डांबराच्या बॅरलला पडणारी भोके जो पर्यंत थांबत नाहीत, तो पर्यंत सर अनेक उत्तम च्या जाण्याने सामाजिक बदलाच्या चळवळीही थांबायला लागतील.
संपादक “येवा कोकणात”

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions