जी. एस. चव्हाण
उप अभियंता, पी.एम.जी.एस.वाय. सिंधुदुर्ग
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. साक्षात विश्वकर्म्याने येथे येऊन स्थापत्य कला सादर करावी अशा प्रकारे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी आपल्या कौशल्याने अनेकांना भारावून सोडले. त्या काळात कोणताही मोठा प्रकल्प असो विश्वेश्वरय्या यांच्याशिवाय किंबहुना त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय तो पूर्ण होत नसे, आजही त्यांनी घालून दिलेल्या सूत्रांचा वापर अभियांत्रिकी क्षेत्रात केला जात आहे. एवढा मोठा माणूस या देशाच्या इतिहासात होऊन गेला याचा सर्वानाच सार्थ अभिमान आहे. कुशाग्र बुद्धिमता आणि कोणतेही काम करताना अगदी पूर्ण मेहनत करण्याची तयारी यामुळे जागतिक स्तरावर नाव लौकिक मिळविलेल्या सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी देशाच्या अभियांत्रिकी क्षेत्राला एक दिशा दिली. लहान वयात वडिलांचे छत्र हरपले, अपार मेहनतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुंबईत नोकरी करत असताना नैसर्गिक पाणी घरा घरात पोहोचवितानाच घरातून बाहेर पडणारे सांड पाणी व्यवस्थित रित्या बाहेर जावे यासाठी त्यांनी पाईप लाईनची योजना बनविली. पुढे देशभर ब्रिटिश सरकारने त्यांच्या कौशल्याचा उत्तम उपयोग करून घेतला. अनेक मोठे प्रकल्प त्यांच्या कल्पकतेतून आकाराला आले. नोकरीची २५ वर्ष पूर्ण होण्या आधीच सर विश्वेश्वरय्या यांनी राजीनामा दिला, ब्रिटिश सरकारने खास बाब म्हणून त्यांना निवृत्ती वेतन सुरु केले. ब्रिटिश सरकारच्या काळात एकदा खचाखच भरलेल्या रेल्वेतून ते प्रवास करत होते. बहुतेक प्रवासी हे ब्रिटिशचं होते. ते सर्व त्यांना अशिक्षित भारतीय समजत होते. मात्र विश्वेश्वरय्या यांनी त्याकडे दुर्लक्ष केला. काही वेळाने अचानक त्यांनी रेल्वेची चैन खेचली, गाडी थांबली गार्ड आला. चैन खेचण्याचे कारण विचारण्यात आले तेव्हा सर विश्वेश्वरय्या यांनी काही अंतरावर रेल्वे रूळ उखडले आहेत असा माझा अंदाज आहे असे सांगितले. रेल्वे रुळाच्या आवाजातील बदलावरून त्यांनी हा अंदाज मांडला होता. रेल्वे गार्ड आणि सोबत सर जाऊन पाहतात तर खर्च रूळ उखडले होते. काही प्रवासीही घटनास्थळी पोचले होते. या माणसाने आपला जीव वाचवला याची भावना प्रत्येकाच्या मनात होतीच. जेव्हा आपण ज्याला अशिक्षित भारतीय समजत होतो ती व्यक्त म्हणजे प्रसिद्ध स्थापत्य अभियंता सर विश्वेश्वरय्या आहेत, हे सर्वाना समजलं तेव्हा सर्वजण स्थब्ध झालेत. सर विश्वेश्वरय्या यांनी आपल्या कार्यकाळात भारतातील अनेक मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावली. हैद्राबाद शहरातील मुशी नदीच्या पुराचे नियंत्रण, भद्रावती स्टील प्रकल्प, वृंदावन गार्डन, कृष्णराजसागर धारण हि आणि अशी बरीच कामे त्यांच्या खात्यात जमा आहेत. सर विश्वेश्वरय्या वयाच्या ९२ व्य वर्षीही कार्यरत होते. १९५२ मध्ये गंगा नदीवर जेव्हा पूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला तेव्हा मार्गदर्शन करायला ते जातीने उपस्थित होते. विशेष म्हणजे या प्रकल्प स्थळी ते प्रखर उन्हातही पायी चालत गेले. अशा या महान अभियंत्याचे वयाच्या १०२ व्य वर्षी निधन झाले. त्यांचे नंदी हिल्सच्या भूमीवर त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीत एक सुंदर व चित्रमय स्मारक मुद्देनहळ्ळी येथे उभारण्यात आले आहे. त्यात त्यांचे घर, त्यांना मिळालेली अवार्ड्स, त्यांची पुस्तके, कृष्णराजसागराचे मॉडेल, आदी विविध गोष्टी पहायला मिळतात.