अनामिका आर. जाधव
सहाय्यक अभियंता (वर्ग १, श्रेणी १), सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, कुडाळ
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्म दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा कर्नाटक राज्यातील कोलार जिल्हयातल्या चिकबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर १८६४ रोजी झाला. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मानाणे सन्मानित करण्यात आले. त्यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या स्थिस्तीत गेले. बाल्यावस्थेत ऐकलेल्या रामायण, महाभारत, पंचतंत्रातील गोष्टींचा त्यांच्यावर प्रभाव होता. तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले.त्याने त्यांचे कुटुंब हादरले. यावेळी प्रश्न निर्माण झालाय तो शिक्षणाचा. मात्र बंगलोर येथे मामाच्या घरी राहून त्यांनी आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलांच्या शिकवण्या घेत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा मुंबई विद्यापीठात प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले. प्रत्येक अडचणीत मार्ग काढत त्यांनी आपल्या प्रगतीचा मार्ग शोधला. बंगलोर येथे त्यांची अभ्यासातली हुशारी पाहून त्यांच्या ब्रिटिश प्राचार्यानी त्यांना पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली.नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले.त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतीशय क्लिष्ट योजना राबविली. १८८३ साली त्यांच्यावर सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीचे पाणी पुरविण्याचे काम सोपविण्यात आले. जेव्हा नदीचा सर्वे करण्यासाठी ते तिथे पोचले तेव्हा त्यांना गाळाने भरलेली नदी पाहून धक्काच बसला. दूषित पाणीही त्यांच्या चिंतेचा विषय होताच. मात्र रात्रन दिवस मेहनत करून त्यांनी आपल्या अभियांत्रिकी कौशल्याच्या जोरावर पाणी पिण्यालायक बनविताणाच संपूर्ण प्रोजेक्ट कसा असेल याचा एक प्लॅन तयार केला. यांनतर या योजनेला त्यांनी मंजुरी मिळविली. नदीच्या तळाशी विहिरी खोदण्यात आल्या, त्यात रेती भरण्यात आली. यामुळे पाणी गाळलं जातानाच ते शुद्ध होण्याची प्रक्रिया सुरु झाली. हे पिण्यायोग्य पाणी शहरात पोचले. या कामगिरीसाठी सरकारने त्यांचा “केसर ए हिंद” हा ‘किताब देऊन गौरविले.
सन १९०९ मध्ये स्वेच्छा-निवृत्तीनंतर,म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणुन त्यांनी कामाला सुरवात केली. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजाच्या आधारामुळे,त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी निर्विवाद असे योगदान दिले. आपल्या योजनांचा फायदा सामान्य जणांना झाला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. ते स्वतःहून लक्ष देत. लोकांच्या गरजा आणि प्रतिक्रिया समजून घेत. पुढे त्यांनी लोकांचे अज्ञान, दारिद्र्य दूर व्हावे म्हणून लढा उभारला. त्यातूनच पुढे सन १९९७ मध्ये म्हैसूर येथे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. म्हैसूरपासून बारा मैलावर विश्वेश्वरैया यांना,कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हे धरण दीड मैलाहून लांब. ११० फूट रुंद, १४०० फूट खोल आहे. या धरणाचे दरवाजे पाण्याच्या पातळीप्रमाणे उघडतात. धरणाजवळ सुंदर वृदावन आहे. पुण्यातील खडकवासला धरणाला लागलेले पाण्याच्या पातळी प्रमाणे उघडणारे आणि बंद होणारे कळसूत्री पद्धतीचे दरवाजे हि त्यांचीच कल्पकता. या त्यांच्या कल्पकतेचा पनामा कालव्यातही उपयोग करण्यात आला आहे. भारतातील अनेक जल योजनांचा आराखडा त्यांनी तयार केला. त्यामुळे कर्नाटकात सिमेंट, कागद, साबण यांचे कारखाने उभारले गेले. भद्रावती येथे पोलादाचा कारखाना उभा राहिला. चांगल्या प्रतीचे पोलाद मिळू लागले. जगातील स्थापत्य क्षेत्रातील लोकांनी तोंडात बोटे घालावीत असे काम त्यांनी केले. बंगलोर मधील दि हिंदुस्थान एअरक्राफ्ट आणि मुंबईतील प्रीमियर हे त्यांच्या कामाचे मूर्त स्वरूप आहे. देशात अर्थव्यवस्थेचे नियोजन करणारे डॉ विश्वेश्वरैय्या पहिले अभियंता होते. त्यांनी या विषयावर “फ्लान्ड इकॉनॉमिक फॉर इंडिया” हे पुस्तक लिहिले आहे. व्यापार आणि उद्योगाच्या वाढीसाठी त्यांनी बँक ऑफ म्हैसूरचे स्थापना केली. ते म्हैसूर येथे दिवाण असतांना त्यांना,जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, ‘नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर’ या सन्मानाने गौरविले गेले.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले.सर विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व, तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेने फेलोशिप देउन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही अनेक विद्याशाखातली पदवी देउन गौरविले.ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेस चे अध्यक्ष होते. ते भारत देशातील एक महान अभियंता होते त्यांच्या कार्याला सलाम !!