धो धो पाऊस तरीही .. पाणी पाणी..

September 17th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

टिम “येवा कोकणात”

उन्हाळा आला कि कोकणच्या काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी पळापळ सुरु होते. शेतीतर दूरच राहिली. पावसाचे पाणी साठविण्याची तंत्रशुद्ध व्यवस्था कोकणात नाही. शिवाय कोकणातील झरे, औद्योगिक वापराचं पाणी, जलविद्युत प्रकल्पांचे अवजल, सिंचन व्यवस्था यांचे अचूक व्यवस्थापन साधलं तर कोकणातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकतो. कोकणच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार केल्यास  कोकण क्षेत्र सुमारे ३० लाख हेक्टर इतके आहे. यातले १८ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. परंतु पाणी प्रश्नाबरोबर चांगले कृषी तंत्रज्ञान विकसित करणे हि काळाची गरज बनली आहे.  कोकणातील प्रत्येक खेडेगावात ८-१५ वस्त्या विखुरलेल्या अवस्थेत आढळतात. नळ योजनांच्या दृष्टीने ही परिस्थिती खर्चिक  ठरते. बऱ्याच वाडय़ांजवळ वर्षांतून ७-८ महिने वाहणारे झरे आहेत. विशिष्ट तंत्राने हे झरे अडवून बारमाही करता येतील. दुसरी गोष्ट म्हणजे लहान बंधारे बांधून वाडीला आवश्यक पाणी वाडीजवळच साठविता येईल अशी जागाही बहुतेक वाडय़ांजवळच आहे. यांचा उपयोग करून कोकणात एक पाणी व्यवस्था उभी करता येईल. त्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. असे तज्ञांचे नातं आहे.  शेतीच्या बाबतीत विचार  कोकणात खरिपातच शेती चांगली होते. अतिपावसाच्या परिस्थितीमुळे भाताचेच पीक मुख्यत: घ्यावे लागते. भातानंतर घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी सिंचनाचे व्यवस्थापन करणे जरुरीचे असते. भातानंतर कुळीथ, पावटा अशी कडधान्ये व भुईमूंग, तिळासारख्या तेलबिया अशी पिके घेतली जातात. परंतु या सर्वच पिकांची एकरी उत्पादकता फारच कमी आहे. आज धरणांच्या लाभक्षेत्रातील जमिनी, पाणी उपलब्ध असूनही अल्प उत्पादकतेमुळे पडीक राहत आहेत. पाण्याची उपलब्धता या बरोबरच चांगले कृषी तंत्रज्ञान उपलब्ध नसने हा देखील अडचणींचा विषय आहे. या उलट फळबाग क्षेत्राची स्थिती आहे इथे तर तंत्रन्यान आहे परंतु पाण्याची उपलब्धता नाही. परिणामी आंबा उत्पादन वाढीतही अडथळा येत आहे. आंबा हे कोरडवाहू पीक असून त्याला तीन वर्षांनंतर पाणी देण्याची गरज नाही, असा समज सर्वाच्या मनावर बिंबवला गेला आहे. त्यामुळे पाण्याची फारशी सोय न करता आंबा लागवड करण्यात आली आहे. सिंचनाधारित नवीन तंत्राने आंबा उत्पादनात लक्षणीय वाढ होते हे आता बागायतदारांच्या ध्यानात येऊ लागले आहे. मात्र डोंगरमाथा व डोंगरउतारावर झालेल्या लागवडीसाठी बागायतदार पुरेशा भांडवल अभावी पाणी उपलब्ध करून घेऊ शकत नाहीत. शेततळे हा चांगला पर्याय आहे. परंतु खेकडय़ांच्या त्रासामुळे हा प्रयोग यशस्वी होईलच असे नाही. पाण्याची सोया झाली तर  एकूण आठ लाख हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली येऊ शकते.  कोयना, तिल्लारी, काळ, मुळशी, घाटघर जलविद्युत प्रकल्पांचे अवजल वापरण्याची मोठी संधी कोकणात आहे. यासाठी कोकण रेल्वे मार्गाचा वापर करता येऊ शकेल.  कोकण रेल्वेचे रूळ घालताना १६० फुटाला १ फूट या प्रमाणात चढ किंवा उतार ठेवला गेला आहे. भराव, बोगदे किंवा पूल बांधताना अशा प्रकारे व्यवस्था केली गेली आहे.रुळांच्या कडेने पाइपलाइन टाकून त्यातून हे अवजल गुरुत्वाकर्षणाने बऱ्याच ठिकाणी अल्प खर्चात पोहोचविले जाऊ शकेल. कोकणातील पूरस्थिती हि एक समस्या आहे. सलगपणे ८०० ते ९०० मिलीमीटर इतका पाऊस झाला तरच पूरपरिस्थिती निर्माण होते. असा पाऊस पावसाळ्यात ३ ते ४ वेळा पडतो. यानंतर पाऊस थांबतो . पावसाच्या या पडण्याच्या पद्धतीचा वापर करून प्रत्येक पाणलोट क्षेत्रात ५ ते ६ ठिकाणी मुख्य नद्यांच्या उपनद्यांवर तीन-चार दिवसांतील पावसाचे पाणी सामावले जाईल अशा क्षमतेचे छोटे-छोटे सिमेंट बंधारे बांधावे. अतिवृष्टीच्या काळात यात ते पाणी साठवून ठेवावे व अतिवृष्टी संपल्यावर पाऊस थांबलेला असताना हे पाणी हळूहळू सोडून देऊन पुढील अतिवृष्टी काळापर्यंत बंधारे रिकामे करून ठेवावेत.  सूचना काही तज्ञांनी शासनाला केली आहे.  कोकणातील महत्त्वाच्या दहा पूरक्षेत्रांचे पूर्वेकडे ४०० ते ६०० चौरस किलोमीटरची पाणलोट क्षेत्रे आहेत. या पाणलोटात पडलेले पावसाचे पाणी तीन ते चार तासांतच या पूरक्षेत्रात एकवटते आणि तेथील नद्यांची जलनिसारण क्षमता कमी असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात हे पाणी पसरून महापूर येतात. कोकणात एकूण ७४६३ द.ल.घ.मी. पाणी साठविण्याचे शासकीय प्रस्ताव आहेत. पूरप्रश्न सोडविण्यासाठी सर्व १० पूरक्षेत्रांत मिळून केवळ ४००० द.ल.घ.मी. पाणी अडविण्याची क्षमता पुरेशी होणार आहे. या पद्धतीने पडणाऱ्या एकूण पावसाच्या १० टक्के इतकेच पाणी अडवून पूरनियंत्रण साध्य करता येईल. मात्र मोठी धरणे बांधणे जागे अभावी शक्य नसून आता लहान धरणांवर भर दिला जात आहे. कोकणात २२ उपखोरी आहेत. यात तीस हजार हेक्टर इतकी सिंचनक्षमता निर्माण झालेली आहे. अजून तीन लाख सत्तर हजार हेक्टर इतकी सिंचनक्षमता निर्माण करावयाची आहे.  मुंबई वगळता कोकण क्षेत्र सुमारे तीस लाख हेक्टर इतके आहे. त्यापैकी १८ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. यापैकी प्रस्तावित आणि पूर्ण झालेली सिंचनसुविधा एकूण सुमारे चार लाख हेक्टर क्षेत्राला उपलब्ध करण्यात येईल आणि उरलेल्या चौदा लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनव्यवस्था उपलब्ध करणात येणार नाही, असे शासनाचे एकूण नियोजन आहे. आजमितीस फक्त ३० हजार हेक्टर क्षेत्रासाठी सिंचनाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. कोकणात हेक्टरी सुमारे ३७ हजार घन मीटर पाणी उपलब्ध आहे. कोकणातील लोकसंख्या सुमारे १ कोटी २९ लाख इतकी आहे. मोठे, मध्यम व लघुपाटबंधारे यातून आतापर्यंत ५५३ द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्याशिवाय अन्य प्रस्तावित  प्रकल्पांतून ५८९६ द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण करण्यात येणार आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions