का होतंय स्थलांतर, कोकणी युवकाचं??

September 17th, 2017 Posted In: येवा कोकणात

Team TNV

चंद्रशेखर तेली

प्रत्येक व्यक्तीला आपला व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजीरोटीचा प्रश्न सोडविणे गरजेचे असते. त्यासाठी मग जगाच्या पाठीवर कुठेही जायला तो तयार असतो. पोटापाण्याच्या प्रश्नासाठी देशाटन कारण हि काही चुकीची गोष्ट नाही. उलट आपले बुद्धी कौशल्य, अंगभूत क्षमता पुरेपुर वापरून अधिक चांगल्या प्रतीचे उत्पन्न, आर्थिक फायदे मिळविता येतात. हे जरी खरे असले तरी आता जग बदलत चालले आहे. हाताच्या बोटावरच जग आलेले आहे. कुणाशीही बोलता येते. या प्रसार माध्यमांमुळे आता व्यावसायिक गणिते बदलू लागली आहेत. वेगाने परिवर्तनाच्या लाटेवर अनेकजण स्वार होऊन यशस्वी होण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सर्व  पार्श्वभूमीवर भौगोलिक सीमारेष जरी धूसर झाल्या असे वाटत असले तरी भौगोलिक प्रदेशाचे महत्व काही कमी होत नाही. उलट   आपल्या परिसराचे जातन, संवर्धन, चाली रीती, रूढी परंपरा,शाबूत ठेवत, आपल्याला आपला परिसर,प्रदेश सुजलाम सुफलाम बनविण्याचे प्रयत्न सातत्याने करावेच लागतात.  स्वतःचा प्रदेश सुद्धा मानव जातील समृद्ध करण्याइतका नक्कीच समर्थ असतो. देशातील वाळवंटातील प्रदेशात सुद्धा लोक विकासाची गंगा आणू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे इस्राईल देश आहे. त्यांनी केलेली वाळवंटातली शेती जगभरात कौतुकच विषय ठरली आहे. कमी पाण्याच्या सुयोग्य नियोजनावर शेतीतली हि क्रांती घडविण्यात आली आहे. त्याला आधुनिक विज्ञानाची कास धरून अतुलनीय कामगिरी करण्याची इच्छाशक्ती हेच एकमेव कारण ठरले आहे. हि आणि अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर असली तरी आपण कोकणी माणसे याच फारसा गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. आम्हीही देशाटन करतो फारफार मुंबई गुजरात गाठतो. कसतरी पोट भरेल अशी नोकरी धरून गुजराण करण्यात धन्यता मानतो. गावाकडे येऊन चाकरमानी बिरुदावली अभिमानाने मिरवतो. सध्या हि बिरुदावली चेष्टेचा विषय झाली आहे. जो उठतो तो मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात आपले नशीब अजमावण्यासाठी धाव घेतो. असं करताना एक गोस्ट विसरतो ती म्हणजे “तुझे आहे तुजपाशीं, परी जागा चुकलासी” . अश्या जागा चुकलेल्या, आजपर्यंत चुकत आलेल्या, आणि भविष्यातही हि चूक करणाऱ्या आपल्या कोकणातल्या युवकांच्या भवितव्यासाठी पुन्हा एकदा विचार होणे गरजेचे आहे. शक्यतो आपल्या जन्मभूमीतच राहून प्रगतीच्या नव्या वाट शोधणे आता सहज शक्य आहे. या विचाराने प्रेरित होऊन काम करण्याची जाणीव कोकणी युवकाला व्हायला हवी मग उठ सूट स्थलांतर करण्याची प्रवृत्ती हळू हळू कमी होऊ लागेल. हे सुद्धा खरे आहे कि, गावापासून फारकत घेऊन शहराकडे धावणारा आपला कोकणातला युवकच यासाठी पूर्णपणे जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही. उलट तो असं का वागतोय याचाही दुसऱ्या बाजूने विचार व्हायला हवा. इथली भौगोलिक, नैसर्गिक, सांस्कृतिक परिस्थिती अनुकूल असली तरी त्यातून नव निर्मिती करण्यासाठी आर्थिक बळ अपुरे पडते. याकडे कानाडोळा करता येत नाही. नव्या नव्या व्यवसायाच्या सांधी समोर दिसत असताना केवळ आर्थिक परावलंबित्व आल्याने रोजगार निर्मिती होऊ शकत नाही. इथल्या युवकांसाठी हे पंगुत्व ठरते आहे. आणि स्थलांतरासाठी हेच एक महत्वाचे मूळ कारण होऊन बसले आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल त्या पटीत स्थलांतर थांबेल.  या भागात अनेकांनी यावे त्यातून आपणास काही उत्पन्नाची निर्मिती व्हावी या उद्देशाने आम्ही अगदी निष्ठेने “येवा कोकण आपलाच आसा” अशी प्रेमळ साद घालतो. परंतु येणाऱ्या पर्यटकांच्या आदरातित्यासाठी आपण कितपत सज्ज आहोत याकडे बघावे लागेल. एक पर्यटक अकरा लोकांना आर्थिक सहाय्य मिळवून देतो असे सर्व सामान्य प्रमाण आहे. या छुप्या संधी समजून घेत नसल्याने त्या भागातली छुपी बेरोजगारी वाढत जात आहे. यासाठी या भागात काम करणाऱ्या अनेक वित्तीय संस्थांनी विविध योजना राबून इथल्या  उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी वित्तपुरवठा केला पाहिजे. व्यवसायाभिमुख योजना राबून तारून पिढीला आकर्षित केले पाहिजे. केवळ रिटेल बँकिंग करायचे आणि नॉन प्रोडक्टीव्ह कर्ज वाटप करून त्यातून एनपीओ वाढल्यावर मुळातच हातात पैसे नसलेल्या लोकांकडे वसुलीसाठी पिच्छा पुरवायचा एवढा एक कलमी राबवून सर्वसामान्य लोकांपर्यंत विकासाची गंगा रडतखडत पोचवायची व त्यातच धन्यता मानायची हा जुनाट विचार आता सोडून द्यायला हवा.  उद्योजकाला गरज असेल तर तो आमच्यापर्यँत येईल या भावानेपोटी इथल्या उद्योग जगताचे मोठे नुकसान होत आहे.  याची चिंता  वित्तीय संस्थांनी करायला शिकले पाहिजे. सुदैवाने या संस्था चालविणारे लोकही आपलेच असतात त्यांना येथील परिस्तितीची पुरेपूर जाणीव असते. पण अडते कुठे कळत नाही. काही संस्था यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला यशही येत आहे. पण या सेवा अगदी सार्वजनिक स्थरावर पोचणे आवश्यक आहे. पैशातून पैशाची निर्मिती करण्याची कला अवगत असणाऱ्या वित्तीय संस्थाच यापुढे स्वतःचेही अस्तित्व टिकविणारा आहेत. त्याचबरोबर आपल्या तरून वर्गाला त्यांच्या धेय्याप्रत पोचायला मदत करणार आहे. संपूर्ण कोकणात व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करणे गरजेचे आहे. नूसाठीच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊन इथला युवक स्पर्धेत टिकणार नाही.  व्यवसायावर आधारित शिक्षण हायस्कुल स्तरावर सुरु केले पाहिजे. केवळ ९९ टक्के मार्क मिळवून त्या आधारे तो आपले पोट भरू शकत नाही. कोकणात बहुतांशी सुशिक्षित बेरोजगार या सदरातले आहेत. त्यांना ध्येयप्रवृत्त करण्याची गरज आहे. अनेक महाविद्यालयात ग्रामीण विकासावर शिक्षण दिले जाते मात्र याकडे विद्यार्थी फारसे वळत नाहीत किंबहुना विचाराची आचार क्षमता असूनही त्यांना या विषयासाठी प्रवृत्त केले जात नाही. ग्रामीण भागाचा विकास हा एक विचार आहे तो सर्वांपर्यंत पोचवला तर दृश्य विकास होत असतो. त्यातून नव निर्मिती होत असते. आता कोकणातील तरुणांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या विषयाच्या अनुषंगाने नवीन तरुणांना स्थलांतरापासून थांबविता येऊ शकते.  तंत्रज्ञानाच्या सहकार्याने शेती विकास हा एक कळीचा मुद्दा आहे. केवळ शेती परवडत नाही या एकाच करून घेतलेल्या समजपाई इथला तरुण शेतीपासून दूर जात आहे. नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची कुवत असलेला आपला तरुण असं का वागतो हे अनाकलनीय आहे. इथल्या कृषी क्षेत्राचे धोरण ठरविणाऱ्या एजन्सीजनी पारंपरिक मानसिकतेतून बाहेर काढून येथील शेतकऱ्याला आधुनिक शेतीकडे नेले पाहिजे. शेती हा मुख्य व्यवसाय आणि त्याला जोडधंदे आपणास स्थलांतरापासून रोखू शकतात. कोणत्यातरी बोगस कंपन्यांच्या आमिषाला बाळी पडून त्यांनी दिलेल्या कमिशनला भुलत आणि नंतर ती कंपनी गाशा गुंडाळून गेली कि स्वतःचा चेहराही लपवायला जागा उरत नाही. त्यापेक्षा कृषी क्षेत्रात स्वतःची प्रगती  साधताना इतरांना त्यात सहभागी करून घेणे कधीही चांगले. कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती साधण्याची वेळ आता आली आहे. कित्तेक एकर पडीक जमीन आपली वाट पाहत आहे. आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणूनच आपली वाट लागत आहे. आपल्या कोकणची कात टाकायची प्रक्रिया केव्हाच सुरु झाली आहे. तरुणांचे उद्याचे कोकण कसे असेल याचे भव्य चित्र उभारायची तयारी आपणच करायची आहे. आणि स्वतःचे स्थान अधिक बळकट करायचे आहे. अनेक भागातले, राज्यातले लोक येथे मोठ्या आशेने आपले पाय रोवत आहेत. केवळ त्यांना दूषणे न देता आपण सक्रिय होण्याची गरज आहे. स्थलांतराच्या विषयावर चर्चा करताना येथे अनेक मुद्दे अस्पर्शित राहिले आहेत. मात्र यातून मूळ विचार आपणापर्यंत नक्कीच पोचेल असे वाटते. आपण या मातीचे भूमिपुत्र आहोत  उत्कर्षाची लेणी खोदण्याचे सामर्थ्य आमच्या अंगी आहे केवळ जाणीव होणे गरजेचे आहे.

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions