पुणे – हि-याचे सौंदर्य हे प्रत्येकाला वेड लावणारे असे असते. त्यामुळे हिरा आणि विश्वसनीयता हे नाते ओघानेच येते. हि-यांच्या या व्यवसायातील पिढ्यान् पिढ्यांचे एक विश्वसनीय नाव म्हणून पुणेकरांबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला ‘पीएनजी डायमंड्स अॅण्ड गोल्ड’ हे नाव माहित आहे. हेच नाव आता नव्या रुपात सर्वांसमोर येत असून ‘पीएनजी ब्रदर्स’ या नव्या नावाने ते ओळखले जाणार आहे. या संदर्भातील औपचारिक घोषणा पीएनजी ब्रदर्सचे संचालक अक्षय गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत केली. पीएनजी ब्रदर्सच्या संचालिका पद्मिनी गाडगीळ, रोहन गाडगीळ, नुपूर गाडगीळ याबरोबरच सदिच्छा दूत (ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर) अभिनेत्री प्रिया बापट आणि पीएनजी ब्रदर्सच्या मिडीया हेड अरुंधती भिडे यावेळी उपस्थित होते. पीएनजी ब्रदर्सच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरणही यावेळी प्रिया बापट यांच्या हस्ते करण्यात आले.
यासंदर्भात अधिक माहिती देताना अक्षय गाडगीळ म्हणाले की, पुरुषोत्तम नारायण गाडगीळ यांनी 1832 साली सांगली येथे सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायाला सुरूवात केली. त्यानंतर विसुभाऊ, नानाकाका आणि दाजीकाका या तीन भावंडांनी पुण्यात लक्ष्मी रस्त्यावर पहिले दालन सुरुवात केले. नानाकाका उर्फ लक्ष्मणराव गाडगीळ यांना सांगलीच्या महाराजांनी रत्नपारखी अशी पदवी दिली होती. 9 फेब्रुवारी 1958 सालानंतर कालपरत्वे व्यवसायाचा विस्तार होत गेला. सोन्याच्या दागिन्यांबरोबरच हि-यांना असलेले महत्त्व लक्षात घेत व पुढे जाऊन हि-याच्या व्यवसायाचे भविष्य या दूरदृष्टीने 1998 साली श्रीकृष्ण उर्फ राजाभाऊ गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएनजी ज्वेलरी अॅण्ड जेम्स’ अस्तित्वात आले. ज्यांनी सोन्याबरोबरच हिरे, मौल्यवान खडे, मोती, पोवळे आणि त्यांचे दागिने या व्यवसायात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
त्यांच्या पश्चात 2002 पासून मी स्वत: या व्यवसायात जातीने लक्ष दिले. त्यासाठी मी डायमंड ग्रेडरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर आता अक्षय व रोहन ही माझी दोनही मुले समर्थपणे व्यवसायाची धुरा सांभाळीत आहेत. अक्षय गाडगीळ यांनी एमबीए फायनान्स बरोबरच अमेरिकेतून जेमोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. तसेच रोहन गाडगीळ यांनी देखील एमबीए फायनान्स करून डायमंड ग्रेडिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आता दिवसेंदिवस विस्तारत चाललेला हा व्यवसाय लक्षात घेत आम्ही आमची एक नवी ओळख बनविली आहे. आता यावर्षीच्या घटस्थापनेचा मुहूर्त साधत या नव्या ओळखीबरोबरच, एका नव्या संकल्पनेसह ग्राहकांसमोर येत असताना आम्हाला आनंद होत असल्याचे यावेळी अक्षय गाडगीळ यांनी सांगितले.
या नव्या नावाबरोबरच हिरे खरेदी करणा-या ग्राहकांची खास सोय व्हावी आणि एकाच छताखाली त्यांना हि-यांच्या दागिने खरेदीचे अनेक पर्याय उपलब्ध व्हावेत या उद्देशाने आम्ही खास ‘डायमंड लाउंज’ सुरू करीत असून त्याचे पहिले दालन हे लक्ष्मी रस्त्यावर असणार आहे, अशी माहितीही यावेळी अक्षय गाडगीळ यांनी दिली.
या ‘डायमंड लाउंज’चे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एकाच छताखाली हिरे, मौल्यवान खडे, प्लॅटिनम, सॉलिटेअर आदी गोष्टी ग्राहकांना उपलब्ध असणार आहेत. याशिवाय शहरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणा-या लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या या लाउंज मध्ये येणा-या ग्राहकांना वॅलेट पार्किंगची सोयही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अक्षय गाडगीळ यांनी नमूद केले.
सध्या पुण्यात लक्ष्मी रस्त्याबरोबरच पौड रस्ता, औंध, लुल्लानगर, बंडगार्डन तसेच नाशिक येथे ‘पीएनजी डायमंड्स अॅण्ड गोल्ड’ दालने असून नजीकच्या भविष्यात शहराच्या महत्त्वाच्या भागात विस्तार करण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती रोहन गाडगीळ यांनी दिली.