MAH: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 29 सप्टेंबर रोजी ‘जनआक्रोश’ आंदोलनाचे आयोजन

September 28th, 2017 Posted In: Pune Express

Team TNV

पुणे – ‘अच्छे दिन’च्या प्रतिक्षेत असणार्‍या 128 कोटी देशवासियांच्या मनात आज फसविले गेल्याची भावना आहे. खोटी स्वप्ने आणि फसव्या घोषणांचा पाऊस सारा देश अनुभवतो आहे. याच्या विरोधात आता रान उठविण्याची वेळ आलेली आहे. जनतेच्या मनातील सुप्त संतापाला वाट करून देण्याची वेळ झालेली आहे. याच दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवार, 29 सप्टेंबर रोजी ‘जनआक्रोश’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत बोलताना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष, खा. वंदना चव्हाण यांनी दिली. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष अशोक राठी, मनाली भिलारे, विपुल म्हैसूरकर उपस्थित होते.
जनतेने प्रचंड आशेने निवडून दिलेल्या सरकारने जनतेलाच वार्‍यावर सोडल्याचा अभूतपूर्व अनुभव सारा देश घेतो आहे. या देशातील तरुणाईने मोठ्या विश्वासाने मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला होता. देशाचा विकास जलदगतीने होईल, उद्योगधंदे वाढतील, आर्थिक आलेख उंचावेल, रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध होतील, या आशेने त्याने मोदी सरकारला निवडून दिले. परंतु त्याच्या या अपेक्षांवर पूर्ण पाणी फेरले गेलेले आहे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणे तर सोडाच; पण आहे ती नोकरी कशीबशी टिकविणे, यासाठी त्याला कसरत करावी लागते आहे.
आयटी उद्योगात, बँकांत नोकर्‍या करणार्‍या लाखो तरुणांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कितीजणांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या, याची गणतीच नाही. नोटाबंदी आणि ‘जीएसटी’ने या परिस्थितीत भरच घातली. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल, दहशतवादी, नक्षलवादी यांचे कंबरडे मोडेल, ही आशा भाबडी ठरली आणि कंबरडे तर सामान्य व्यापारी, छोटे व्यावसायिक यांचे मोडले. ‘जीएसटी’ अर्धवट स्वरूपात आणणे, मूळ कायद्यात मोठे बदल करणे यामुळे ‘जीएसटी’ची परिणामकारकता संपली आणि त्याचा जाच वाटू लागला आहे. सेवा पुरवठादार, उद्योजक, व्यापारी यांची व्यावसाय करण्याची मानसिकता दुबळी करण्याचे काम केले गेले आहे.
महागाई वाढण्यात प्रमुख घटक इंधनाचे दर वाढते दर कारणीभूत असतात. 63 रुपयांनी असलेले पेट्रोल तब्बल 80 रुपयांवर पोचले. सरकारच्या खिशात यातील 48 रुपये जाताहेत. सरकार या पैशांचे काय करते आहे? सामान्य माणसाला आगीत होरपळत पाहण्यात सरकार कोणता आनंद मिळवते आहे? याचबरोबर सामान्य माणसाला सरकारच्या विरोधात, सरकारच्या विचारसरणीवर टीका करण्याची हिंमत होता कामा नये, असे वातावरण उभे राहिले आहे. पत्रकार गौरी लंकेश यांचा खून हे त्याचे धडधडीत उदाहरण आहे. उन्मादी वातावरणामुळे संपूर्ण देशभरात 38 जणांच्या हत्या जमावाकडून झाल्या. यासंदर्भात हत्यांचे समर्थन सरकारी पातळीवरील जबाबदार नेत्यांकडून होणे, ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. गोरखपूरसारख्या रुग्णालयात 72 तासांत 250 बालकांचे बळी जाणे, हे अनास्थेचे लक्षण आहे. नोटाबंदीनंतर पैसे बदलण्याच्या रांगेत 150 नागरिकांचे बळी जाणे, हे सरकारच्या असंवेदनशीलतेचे दर्शन आहे.
हे घडत असताना सारे काही अलबेल आहे, असे वातावरण निर्माण करण्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या जाहिरातींचा वापर सुरू आहे. जनतेला अंधारात ठेवण्यासाठी हे सुरू आहे. परंतु चटके बसणारी जनता आता उघडपणाने बोलू लागली आहे. तिच्या अंसतोषाचा उद्रेक होण्यास सुरुवात झालेली आहे. या ‘जनआक्रोश’ आंदोलनातून तो अधिक संघटितपणाने उमटेल, असे खा. वंदना चव्हाण यांनी सांगितले.

Attachments area

About Author

Team TNV

The author is a senior Journalist working in Goa for last one and half decade with the experience of covering wide-scale issues ranging from entertainment to politics and defense.

subscribe & follow

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions