पुणे – पुणे स्थित मूत्रविकारतज्ञ आणि एस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,एरंडवणेचे डॉ.सुरेश पाटणकर यांना दोन युरोपियन पेटंट प्राप्त झाले आहेत. एक पेटंट शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा लवकर भरून काढण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कंपोझिशनसाठी आणि दुसरे पेटंट छोट्या किडनी स्टोन्स आणि त्याचे पुनरागमन रोखण्यावरील उपचार यासाठी मिळाले आहे. याच गोष्टींसाठी डॉ.पाटणकर यांना 2015आणि 2016 मध्ये दोन अमेरिकन पेटंट मिळाले असून एक भारतीय पेटंट मिळाले आहे.
अनेक कंपन्या आणि वैद्यकीय संस्थांच्या नावावर अनेक पेटंट्स असतात पण एस हॉस्पिटल तर्फे कमिशन केलेल्या अहवालानुसार डॉ.पाटणकर हे बहुधा भारतातील 534 पैकी एकमेव डॉक्टर आहेत ज्यांना 5 पेटंट प्राप्त झाले आहेत. एकूण जगभरातील 37080 पेटंटसपैकी 3099 पेटंटस हे स्वतंत्ररित्या व्यक्तींच्या नावावर आहेत.त्यातील 70-80 टक्के पेटंटस हे चीनी पारंपारिक औषधांशी निगडीत आहेत.
यामुळे असे स्पष्टपणे दिसून येत आहे की,आपला देश पारंपरिक औषधांवरील संशोधनात मागे आहे.आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पारंपरिक औषधांबद्दलचा ज्ञानाचा साठा आहे,जो की अजूनही सर्वांना परिचित नाही.
डॉ.सुरेश पाटणकर म्हणाले की, दोन्ही उपचार पद्धती 2000 हून अधिक रुग्णांवर केल्या गेल्या आहेत आणि त्याचे विश्लेषण करण्यासाठी आमच्याकडे या रूग्णांचा माहितीसाठा देखील आहे. आम्ही लवकरच ही औषधे बाजारात आणण्याचा विचार करत आहोत यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना याचा फायदा होईल.
पारंपरिक वैद्यकीय शास्त्र हे पुरेशा दस्तऐवजांअभावी (डॉक्युमेंटेशन) व आधुनिक शास्त्रीय पध्दतींनी केलेल्या संशोधनाअभावी कमी पडत आहे. म्हणून लोकांना त्याचा पूर्ण फायदा घेता येत नाही. हे पेटंट म्हणजे वैयक्तिक यश नाही तर विज्ञानाच्या संबंधित शाखेतील संशोधनास निर्णायक दिशा देणारे ठरणार आहे.
ते म्हणाले जर सायंटिफिक व्हॅलिडेशन (वैज्ञानिक प्रमाणीकरण) आणि आधुनिक पद्धती वापरून जर पारंपरिक विज्ञानात संशोधनाचे काम केले जात असेल तर ते आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील कमी भरून काढू शकतात. ज्या दोन उपचारांसाठी पेटंट मिळाले आहेत त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा लवकर भरून काढण्यास व संसर्गाचा धोका रोखण्यास तसेच प्राथमिक टप्प्यात असलेल्या किडनी स्टोन्समुळे होणारे पेशींचे नुकसान कमी करण्यास तसेच मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास मदत करेल.
पुढे जाऊन आम्ही सुद्धा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरीसाठी 3 डी कॅमेर्याचा वापर या संशोधनावर काम करणार आहोत.ज्याला इंटरनॅशनल पेटंट ऑथोरिटीकडून नॉवेल क्लेम्स प्राप्त झाले आहे.