घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेसमधून सीमोल्लंघन करणारे आणि भाजपातील प्रवेशासाठी ताटकळत राहणारे नारायण राणे यांनी अखेर आज आपल्या नव्या राजकीय इनिंगची घोषणा केली. नारायण राणे यांनी आपल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ची घोषणा केली. त्यांनी पक्षाची घोषणा करताच भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याविषयी त्यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे राणेंचा सत्तेत सहभाग होणार हे आता निश्चित झाले आहे.
नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून आपला पक्ष काम करेल. अल्पसंख्यांक, महिला आणि गोरगरिबांच्या हिताचं राजकारण करण्यावर आमचा भर असेल, असं सांगतानाच पक्षाचा झेंडा आणि निशाणी लवकरच जाहीर करण्यात येईल. त्याचप्रमाणे पक्षाची नोंदणीही करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षात आपले मित्र आहेत. त्यामुळे लवकरच आमदारांची भेट घेणार असून पक्षबांधणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना आणि काँग्रेस आपले प्रतिस्पर्धी असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तुम्ही राज्यातील सत्तेत सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला असता ऑफर आली तर विचार करू. सध्या तरी कुणाची ऑफर आलेली नाही, असं सांगतानाच राणे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही हे तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा असं सांगत त्यांनी हा प्रश्न टोलवून लावला. पक्ष स्थापन केल्यानंतरच एनडीएतील सहभागाचा निर्णय घेऊ असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदाची आपली महत्त्वकांक्षा कायम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान राणे यांनी पक्षाची घोषणा करताच त्यांना एनडीएचे निमंत्रण मिळाले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
बुलेट ट्रेन आणली तर चांगलेच !
जी बुलेट ट्रेन ५० वर्षानंतर दिसणार होती, ती दोन-चार वर्षात दिसणार असेल तर बुलेट ट्रेन का नको? असा सवाल करत राणे यांनी बुलेट ट्रेनचं समर्थन केलं. माझा विकासाला विरोध नाही. कर्ज काढून का होईना बुलेट ट्रेन मिळत असेल तर त्याला आपला पाठिंबा असेल, असे त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना सत्तेला चिटकून बसलेला पक्ष
शिवसेना ही कधीच सत्तेबाहेर पडणार नसून त्यांना हाकलले तरच ते सत्तेबाहेर जातील अशी खरमरीत टीका राणे यांनी केली. उद्धव सरकारच्या निर्णयावर टीका करतात. मात्र, शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत का गप्प बसतात, असा सवालही राणेंनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याआधी उद्धव यांनी आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्ला देतानाच मोदींवर टीका करण्याएवढी उद्धव यांची योग्यता तरी आहे का?, असा सवाल त्यांनी केला. सत्तेत राहून भांडण करण्यापलिकडे शिवसेनेने काहीच केले नाही. मुंबईतून मराठी माणस हद्दपार झाला असून त्याला शिवसेना जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली. नोटाबंदी म्हणजे देशद्रोह आहे असं म्हणता तर नोटाबंदीविरोधात तुमच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात नोटबंदीचा निषेध का नोंदविला नाही?, असा सवाल त्यांनी केला. पेट्रोल, डिझेल आणि महागाई विरोधात मंत्रिमंडळात सेनेचे मंत्री काहीच बोलत नाहीत, उलट झोपा काढतात, असा हल्लाच त्यांनी चढवला. जनतेसाठी सत्तेत गेलो म्हणणारे आंदोलन का करत आहेत?, असा सवालही त्यांनी केला. काश्मीरमध्ये भाजप सत्तेसाठी लाचारी करत आहेत तर तुम्ही महाराष्ट्रात काय करता? असा सवाल करतानाच उद्धव आयत्या बिळावर नागोबा आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
राज ठाकरे यांच्या बुलेट ट्रेनच्या विरोधातील धमक्या पोकळ असून त्यांचा पक्ष मीडियाने जिवंत ठेवलेला पक्ष आहे, असा टोला राणेंनी लगावला. तसंच राज यांनी मोदींना खोटारडे म्हणणं पटलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत याचं भान राह्यला हवं, असंही ते म्हणाले.
दरम्यान राणे यांनी पक्षाची घोषणा करताच कणकवली सह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करून फटाक्यांची आतषबाजी केली.