टिम “येवा कोकणात
महाराष्ट्र राज्याच्या सुमारे ७२० किमी कोकण किनारपट्टीवर जवळ जवळ २९८३९ हेक्टर क्षेत्र कांदळवन अर्थात तीवर किंवा खरपुटी क्षेत्र आहे. त्यापैकी सरकारी जमिनीवरील सुमारे १६५५४ हेक्टर क्षेत्र, खाजगी जमिनीवरील सुमारे १३२८५ हेक्टर कांदळवन क्षेत्र आहे. अलीकडे या क्षेत्रात माणसाच्या अति विस्तारवादी भूमिकेची कुऱ्हाड चालताना दिसत आहे. त्यामुळे हि नैसर्गिक सुरक्षा प्रणाली धोक्यात येत आहे. तिवर, खारपुटी म्हणजे सागरतीरीचे सैन्यच. तिवराचेही काही प्रकार आहेत. लाल खारपुटी म्हणजे कांदळ. ही सर्व एकत्र कुटुंबात वाढणारी झाडे, फक्त कुळं वेगळी. हा दलदलीत वाढणारा. कारलिया तेवढा डोंगरावर, गोडय़ा मातीत वाढतो. पण खरा तिवर खाऱ्या चिखलातच वाढतो. तिवरांची झाडे खाऱ्या पाण्याच्या भरती-ओहोटीच्या जमिनीतच जास्त दिसतात. भरती-ओहोटीचा, अमावस्या, पौर्णिमेच्या पाण्याच्या जोराच्या चढउतारावर ती युक्तीने मात करतात. ढिल्या, अस्थिर, चिखल जमिनीत ती आपली मुळं आडवी पसरवतात. त्या आडव्या मजबूत कार्ड मुळांपासून चिखलात फांद्या पसरतात. जाळ पसरत आणि ते चिखल घट्ट धरून ठेवते. त्यामुळे तो पाण्यानेही हलत नाही. वादळातही ही झाड स्थिर राहातात आणि किनारपट्टीचं रक्षण करतात. कांदळ व केवडा यांच्या उभ्या खोडाच्या आतल्या भागातून जाडजूड मुळं जन्माला येतात. जमिनीकडे वाढतात आणि चिखलात गेल्यावर त्यांना फांद्या फुटतात. मुळांचे जाळेच तयार होते. कांदळाची लहानलहान झाडे चिखल पकडून स्थिरपणे ५-६ पायांवर उभी असतात. तिवरांनी मुळांच्या जाळ्याच्या विणीत आणखी कमाल केली आहे. मुळ पाणथळीत असतात, तेथे हवेचा तुटवडा असतोच. म्हणून चिखलातल्या आडव्या मुळांपासून वर मोकळ्या हवेत याच्या मुळांच्या फांद्या जातात. जमिनीला काटकोनात याची निमुळती टोक. ही लांब लांब बोटासारखी, काही मनगटाएवढी, खुंटासारखी, काही माणसांच्या गुडघ्याएवढी असतात. त्यांच्या हवेकडील बाजूवर टाचणीच्या डोक्याएवढी असंख्य छिद्र असतात. तेथून हवा मुळांच्या मध्यापर्यंत जाते. मग शरीरभर पसरते आणि त्यातील प्राणवायू सर्व पेशींना उपयोगी होतो. या झाडाच्या प्रजनन, प्रसाराच्या पद्धतीही मजेशीर आहेत. कांदळाला पाण्याकडील बाजू जास्त पसंत. काठीवर चालणाऱ्या माणसासारखी ही झाडे त्यात उभी असतात. १०/१२ काठय़ांनंतर झाडे मोठी होताना त्यांची संख्या वाढते. जाळेच होते. प्रत्येकच आधारमूळ होते. उन्हाळ्यात पांढरी फुले येतात. मधमाशांमार्फत फलन होते. पेरूच्या आकाराची मळकट, तपकिरी रंगाची ती असतात. झाडावरच फळातून कोंब बाहेर येतो. ते वाढून लांब हिरव्या शेंगेसारखे दिसतात. ते नव्या झाडांचे मूळ असते. पावसाळ्याच्या शेवटी हे फळ आडवं-उभं कसंही पडतं. गुरुत्वाकर्षणाने मुळाचे टोक जमिनीकडे वाढत चिखलात जाते. त्याला तेथे फांद्या फुटतात. दुसऱ्या टोकाला २/३ पानांचे कोंब फुटून नवीन झाड तयार होते. हे कोंब त्या पाणथळीतल्या प्राण्यांना फार आवडतात. ओहोटीच्या वेळी कीटक, अळ्या, गोगलगाई ते खातात. झाड वाढतानाच नवे कोंब फुटून, नवीन मुळे तयार होऊन जमिनीत शिरतात. मुळांच्या काठांचा जणू पिरॅमिड तयार होतो आणि त्यावर झाड डौलाने उभे राहाते. रत्नागिरी, मालवण, मुरुड या भागात कांदळवन चांगल्या अवस्थेत दृष्टीस पडते. मुंबईत शिवडी, मुलुंड ठाण्यापर्यंत मिठी नदीच्या काठी अर्थात माहीमच्या खाडीत वांद्रे, वर्सोवा, मनोरी, दहिसपर्यंत सर्वत्र जास्त प्रमाणात एविसेनिया जातीचे कांदळवन वृक्ष दिसून येतात. जगण्याची, वाढण्याची संधी हे झाड सोडत नाही. अचंबित करणारी जिद्द या तिवरांच्या झाडात पहायला मिळते. उन्हाळ्यात तिवर फुलतो. लहान पिवळी फुले उन्हाळ्याशेवटी फुग्यासारखी दिसतात. हिरवी फळं येतात. ती पावसाळ्यात फुटून बिया चिखलात पडतात. रोपं तयार होतात. पावसाळ्यात ही पाणथळ कमी खारट असते. त्यावेळी मोठय़ा झाडांखाली असंख्य छोटी झाडं दिसतात. ओहोटीबरोबर वाहत जाऊन दुसरीकडेही रुजतात. डहाणूला सावटा खाडीत अशामुळे दाट जंगल तयार झालं आहे.अस्थिर चिखलात खारफुटीने वेगळ्या तऱ्हेने मुळ पसरल्याने चिखल स्थिरावतो. जमिनीची धूप कमी होते. त्यामुळे खाडीत मातीची भर पडत नाही. भरतीच्या वेळी खाडी तुमच्या वस्तीत येत नाही. पावसाळ्यात जमिनीवरून येणारा कचरा, पालापाचोळ्यासह तिवरांच्या जंगलात घुसतो,हे कचरायुक्त पाणी तिवरांच्या मुळांमुळे गाळल जात. पाणी खाडीत जात आणि कचरा मुळांच्या जाळ्यात अडकून कुजतो. लहान मासे, कोळंबी, खेकडे, शंख, कालव यांना अन्न मिळते. या सदाहरित झाडांमुळे प्रखर सूर्यापासून संरक्षणही मिळते. ही वने नसतील तर आपल्याला हे स्वस्तातले, पण प्रथिनयुक्त अन्न कसं मिळेल? दूर समुद्रातील मासेही प्रसवायच्या वेळी या वनात येतात. लहान पिलांना इथे ठेवतात. कारण त्यांना अन्न, निवारा, संरक्षण निसर्गदत्त देणगीमुळे आहे. पूर्वी मुंबई किनारपट्टीवर १५/२० फुटी कांदळ, तिवर, गुडघे मूळवाला कांदळ सहज वाढत होते. पण ३०/४० वर्षापासून पाणी हटवून जमीन मिळविण्यासाठी खारफुटीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. १९८७ मध्ये त्यांना अभय देणारा कायदाही आला. पण तो कागदावरच राहिला. १९९१ पासून किनारा संरक्षण नियम आले. पण खारफुटीचं दुर्दैव संपलं नाही. २६ डिसेंबर २००४ रोजी याच त्सुनामी लाटांनी घातलेला प्रचंड हैदोस, त्यावेळी झालेली वित्त व मालमत्तेची हानी लक्षात घेता आता तरी या तिवरांच्या जंगलांचे जतन व संवर्धन करणे गरजेचेच बनले आहे. खारफुटीचे लाकूड चमकदार असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते. मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी वापरले जाते. कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही. तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो. टॅनिनचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, रंगविण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो. या समूहात एकच विषारी वनस्पती आढळते ती म्हणजे इक्झोकरीआ अगर गेवा. या वनस्पतीचा चीक जर डोळ्यात गेला तर डोळ्यांना अपाय होतो. आग्नेय आशियात या लाकडाचा उपयोग बांधकामासाठी, लोणारी कोळसा तयार करण्यासाठी केला जातो.
कांदळवनाच्या संरक्षणासाठी शासनाने घेतली भूमिका :कांदळवनांच्या संरक्षणाबरोबरच किनारी भागातील लोकांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ प्रकल्प सन २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षापासून राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अलीकडेच घेण्यात आला आहे. यामुळे आता सार्वजनिक तसेच खासगी जमिनीवर असलेल्या ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदळवनांचे संरक्षण होण्यास मोठी मदत होणार आहे. संयुक्त वन व्यवस्थापनाच्या धर्तीवर कांदळवनांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यातून उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. या योजनेंतर्गत ज्या गाव व वस्तीच्या क्षेत्रांमध्ये कांदळवने आहेत तेथे सामूहिक स्वरूपाचे फायदे देण्यासाठी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येईल. सामूहिक स्वरूपांच्या कामासाठी शासनाचा सहभाग ९० टक्के व समितीचा सहभाग १० टक्के राहील. वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामासाठी शासनाचा सहभाग ७५ टक्के व लाभार्थीचा सहभाग २५ टक्के राहील. या योजनेंतर्गत खेकडापालन, कालवेपालन,मधुमक्षिकापालन, शिंपले पालन, गृहपर्यटन,शोभिवंत मत्स्य शेती, भातशेती व इतर योजनेद्वारे रोजगार निर्मिती होईल. २०१७-१८ मध्ये या योजनेसाठी १५ कोटी रु पयांची तरतूद करण्यात आली असून पालघर,ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० गावांची निवड होणार आहे. २०१८ ते २०२० या दोन वर्षांच्या कालावधीत कोकणातील नवीन एकूण ७५ गावांत योजना राबविणे प्रस्तावित आहे. या योजनेसाठी राज्य योजनेव्यतिरिक्त जिल्हा योजना, मँग्रोव्ह फाउंडेशन अशा विविध स्रोतातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तसेच नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहेत. .