टीम “येवा कोकणात”
गुजरातचे प्रसिद्ध लोकनृत्य. ‘गरबी’ व ‘गरबा’ असे याचे दोन प्रकार आहेत. पुरुषांनी वर्तुळाकार उभे राहून समूहगीत गात, टाळ्या वाजवत, साध्या पदविन्यासांनी केलेले नृत्य ‘गरबी’ आणि स्त्रियांनी नाजुक अंगविक्षेपांनी केलेले नृत्य ‘गरबा’ होय. पुरुषांच्या गरबीनेच गरब्याला सुरवात होते. हे नृत्य प्राचीन काळापासून गुजरातमध्ये जपले जात आहे. आतातर संपूर्ण भारतभर हे नृत्य पोचले आहे. गेल्या काही दशकात या नृत्याने कोकणही व्यापले आहे. कृष्णाची नातसून म्हणजे बाणासुराची कन्या उषा हिने स्वत: पार्वतीकडून शिकलेले लास्यनृत्य सौराष्ट्रातील गोपींना शिकविले तेच पुढे रास नृत्य म्हणून नावारूपास आले. पूर्वी नवरात्रात देवीजवळ सच्छिद्र घटात अखंड दीप लावून ठेवत. त्याला दीपगर्भघट म्हणत. दीपगर्भ शब्दातील काही वर्णांचा लोप होऊन ‘गरबा’ असा अपभ्रंश रूढ झाला असावा. हा घटदीप म्हणजे ‘गरबा’ शक्तिमातेचेच प्रतीक मानला जातो. धार्मिक विधींतून प्रारंभी हा गरबा चुंबळीच्या आधाराने डोक्यावर ठेवून स्त्रिया गोलाकार उभे राहून त्याला स्पर्श न करता दोन्ही हातांनी टाळ्या व चुटक्या वाजवत अंबा, कालिका, रांदलमाँ इ. देवींची स्तुतिगीते गात वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करत. पुढे तो गरबा मध्यभागी ठेवून त्याभोवती स्त्रिया नृत्य करू लागल्या. नंतर कृष्णलीला, ऋतुवर्णने किंवा सामाजिक विषय ह्यांवर आधारलेल्या गीतरचनांवर नृत्ये होऊ लागली. टाळ्याचुटक्यांच्या ऐवजी खंजिरी, मंजिरी, दीपांच्या थाळ्या इ. साधने नृत्यामध्ये वापरली जाऊ लागली. या नृत्यात ६,८,१४ मात्रांचे ताल वाजवतात. चांगला आवाज असलेली एखादी स्त्री गाणे म्हणते व मग नृत्यात भाग घेणार्या इतर स्त्रिया तिचे अनुकरण करतात. गरबा हा गुजरातचा अत्यंत लोकप्रिय नृत्यगीतप्रकार आहे. समाजाच्या सर्व थरांत गरब्याची वेगवेगळी गाणी आहेत. गुजरातचे लोकजीवन ह्या गाण्यातून सर्वांगांनी व्यक्त झाले आहे. गुजरातप्रमाणेच ते राजस्थान व मध्य प्रदेशाच्या काही भागांतही प्रचलित आहे. आता ते देशभर पोचले आहे. मात्र चित्रपटातील विविध गाण्यांनी या नृत्याला पार बदलून टाकले आहे. डीजेच्या कर्कश आवाजात जिथे तिथे रात्री गाजविल्या जातात. यात विसरला जातोय तो नृत्य कलेमागचा खरा इतिहास. भारतीय नर्तनकला ही भारतीय संस्कृतीइतकीच प्राचीन आहे, भारतीय नर्तनाचा इतिहासही सबळ पुराव्याअभावी सांगोवांगी आणि दंतकथांवर अवलंबून आहे असे असले, तरी त्या काळी नृत्यकलेचा विकास त्या काळच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचला होता. भारतीय परंपरेने नृत्याचा जन्मदाता भगवान श्रीशंकरांना मानले आहे. लयबद्ध आणि डौलदार हालचालीतून मूर्तिमंत गतिमानता प्रकट करणारी, तसेच चेहऱ्यावरील व हालचालीतील भावविभ्रमातून, भाषेच्या मर्यादांचे कुंपण ओलांडून, भावनेची रसोत्कटता रसिकांपर्यंत पोहोचवणारी एक समर्थ कला म्हणून नृत्यकलेची ओळख आहे. नृत्य या शब्दाचा मूळ धातूच मुळी ‘नृ’ हा आहे आणि भाष्यकार पतंजलीने या नृ धातूपासून नृत्य या शब्दाची व्युत्पत्ती मान्य केली आहे. नृत् शब्दाचा अर्थच शरीराच्या विभिन्न भागांचे हलणे-डुलणे असा मानला गेला आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत नृत्यकला ही महत्त्वपूर्ण कला मानली जात असे. नृत्याच्या विकासावर दृष्टिक्षेप टाकणारा सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे भरतमुनींचे ‘नाटय़शास्त्र’ हा होय. या ग्रंथात नाट्याच्या उगमाविषयी मोठा रंजक व आकर्षक इतिहास कथन केला आहे. नाट्यशास्त्रात असे म्हटले आहे की, ज्या वेळी त्रेतायुग सुरू झाले तेव्हा माणसामाणसांत हेवेदावे, दु:ख, ईर्षां, द्वेष यांसारखे दोष निर्माण होऊन याद्वारे दु:खाची निर्मिती झाली. कलह माजला. सारा समाज दु:खी-पीडित झाला. तेव्हा देवराज देवेंद्र ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवास विनंती केली. देवांनी ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली की मनोरंजनासाठी असे काही साधन उपलब्ध करून द्या की ज्याद्वारे सर्व संसार आश्चर्यचकित होऊन जाईल. तेव्हा ब्रह्मदेवाने सर्व वेदांच्या सारातून ‘नाट्यशास्त्र’ हा पाचवा वेद निर्माण केला व आचार्य भरतमुनींना तो दिला. ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे भरतमुनींनी आपली मंडळी घेऊन कैलासपर्वतावर ‘त्रिपुरदाह’ नामक नाटकाची प्रस्तुती केली. भरताने गंधर्व, अप्सरा आणि किन्नर यांची मदत घेऊन भगवान शंकरासमोर सर्वप्रथम ‘त्रिपुरदाह’ आणि मग ‘अमृतमंथन’ नावाचे दोन प्रयोग सादर केले. भगवान शंकर ते पाहून भरतमुनींवर खूश झाले. तेव्हा भगवान शंकरांनी या नाटकात नृत्याचा समावेश करण्यास सांगितले. भारतीय परंपरेनुसार भगवान शंकरांना नृत्यकलेचे प्रथमप्रवर्तक मानले जाते. नृत्यकलेची उपासना, आराधना करणारे सर्व नर्तक नटराजाची प्रार्थना करून आपली साधना सुरू करतात. असे मानतात की भगवान शंकर रोज संध्यासमयी धुंद होऊन नर्तन करतात, त्यांच्या या आनंदनर्तनात सर्व देवता सामील होतात. ब्रह्मदेव ताल धरतात, सरस्वती वीणावादन करते, विष्णू मृदुंग वाजवतात, अप्सरा व किन्नरी श्रुतींकडे लक्ष ठेवतात, नारद तुंबरू गायन करतात, नंदी आणि भृंगी डमरू आणि मादल वाजवितात, शिवशंकराच्या पदाघाताने पृथ्वी थरथरून उठते, तर हातांच्या संचलनाने आकाशमंडल गतिमान होते. शंकराचे विराट नृत्य पाहून पार्वतीदेवीसही नृत्य करण्याची स्फूर्ती आली, पार्वतीने केलेले सुकोमल, मोहक नृत्य ‘लास्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले. भगवान शंकरांनी आपला प्रिय शिष्य तंडू मुनीस आदेश दिला की भरतमुनींना नृत्यकलेचे ज्ञान दे आणि अशा प्रकारे तंडूकडून शिकवले गेले ते ‘तांडवनृत्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले. भरतमुनींनी ‘तंडू’ याच्याकडून तांडवनृत्याची, तर पार्वतीकडून ‘लास्य’ या नृत्याची तालीम आपल्या दोन्ही पुत्रांना दिली. तंडूमुनींकडून शिकलेल्या नर्तनाला ऋषीमुनींनी तांडव नृत्यकला म्हणून मनुष्य लोकात प्रचारात आणली. पार्वतीनेही बाणासुराची कन्या उषा हिला लास्य नृत्याचे शिक्षण दिले. उषाने द्वारकेला येऊन गोपींना नृत्य शिकवले. गोपींनी सौराष्ट्रातील अर्थात आताच्या गुजरातमधील महिलांना ते नृत्य शिकवले, याच नृत्याला भगवान श्रीकृष्णाने ‘रास’ या समूहनृत्याचे स्वरूप दिले आणि अशा रीतीने पृथ्वीतलावर नृत्याचा जन्म म्हणजेच उत्पत्ती झाली. हडप्पा मोहेंजोदडोमध्ये जी मूर्ती सापडली त्यामुळे नृत्याचे पहिले स्वरूप लक्षात आले. त्या प्रतिमांवरून असे स्पष्ट होते की तत्कालीन जनजीवनात नृत्याला महत्त्वपूर्ण स्थान होते. अशाच प्रकारे लोथल, मिर्जापूर, पटना, काथियावाड, उदयगिरी, महाबलीपुरम् इत्यादी प्रागतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी उत्खननामध्ये सापडलेल्या कलासाधनांमध्ये नृत्य व अभिनयाशी संबंधित वस्तूंचा समावेश होता. असेच काही ऐतिहासिक पुरावे आजही आपल्याकडे उपलब्ध आहेत.गरबा नृत्याचे विद्रुपीकरण नवरात्रोस्तवात कोकणातील एकही गाव असा मिळणार नाही ज्या गावात गर्भा नृत्याचे रास पहायला मिळत नाही. गावागावात गर्भोत्सव मंडळे स्थापन झालेली आहेत. शहरात तर अनेक नेत्यांणीं या परंपरेला उत्सवी स्वरूप दिले आहे. विशेष म्हणजे या प्राचीन परंपरेचे जे विद्रूपीकरण होतंय ते भयावह आहे. चित्रपटातील रिमिक्स गाणी आणि त्यांच्या बेधुंद चाली. परिसर दणाणून सोडणाऱ्या डीजेचा कर्कश आवाज प्राचीन आणि पौराणिक परंपरेला भलत्याच दिशेकडे घेऊन जातेय हे निश्चित.