पुणे – ‘लघुपट निर्मितीच्या क्षेत्रात येण्यापूर्वी माध्यम कळणे महत्वाचे आहे ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी केले .
गांधी सप्ताह निमित्त नवमहाराष्ट्र युवा अभियान ,प्रयोग (मालाड ) आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘ लघुपट निर्मिती’ या विषयावर गांधी भवन येथे झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते . या कार्यशाळेत दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई ,प्रदीप देवरुखकर यांनीही मार्गदर्शन केले .
अशोक राणे म्हणाले ,’चित्रपट ,लघुपट ,माहितीपट यातील फरक समजावून घेतला पाहिजे . या निर्मिती क्षेत्रात कारकीर्द घडविण्याच्या भरपूर संधी आहेत मात्र त्याआधी हे माध्यम काय आहे ,हे समजावून घेतले पाहिजे . ‘फिल्म एकॅडेमिक्स ‘विषयातही भरपूर काम होण्याची गरज असून तरुणांनी त्यातही रस घ्यावा असे अशोक राणे यांनी सुचवले
सतत चित्रपट पाहणाऱ्या माणसाला समाजात वाया गेलेला माणूस समजले जाते ,मात्र ,सर्व प्रकारचे आणि सर्व भाषेतील चित्रपट पाहणे या क्षेत्रात येणाऱ्यासाठी आवश्यक गोष्ट आहे .
महेंद्र तेरेदेसाई म्हणाले ,’लघुपट हेही अभिव्यक्तीचे माध्यम आहे ,त्यातून आपण जे मांडणार ती गोष्ट महत्वाची असते . अनेकदा तंत्राकडे अधिक लक्ष दिले जाते ,आणि गोष्टीकडे दुर्लक्ष होते . गोष्ट चांगली असेल तरच तंत्र आपल्याला मदत करते . गोष्ट सुचताना ती दृश्य भाषेत सुचणे ही या क्षेत्रातील यशाची पहिली पायरी असते . श्रीराम टेकाळे यांनी प्रास्ताविक केले . रविवारी झालेल्या या कार्यशाळेला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला