पुणे – जय हिंद… भारत माता की जय… वंदे मातरम्… च्या घोषणांनी भारलेल्या वातावरणात तिरंगी आकारात ठेवलेल्या तब्बल 400 फराळाचे बॉक्स, 800 पणत्या, भेटकार्ड व आकाशकंदीलांचे पूजन 900 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झाले. सैनिक हो तुमच्यासाठी… हे वाक्य सार्थ करीत चिमुकल्यांनी खाऊच्या पैशातून आणलेला आपुलकीचा फराळ जम्मू-काश्मिरमधील सैनिकांकरीता पाठवून देशाच्या रक्षणाकरीता सैन्यात भरती होण्याचा संकल्प देखील केला. निमित्त होते, दीपावलीनिमित्त बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, वीर सेनानी फाऊंडेशन आणि नू.म.वि.प्राथमिक शाळेच्यावतीने जम्मू-काश्मिर गुलमर्ग येथील जवानांकरीता आपुलकीचा फराळ पूजन व पाठविण्याच्या कार्यक्रमाचे. यावेळी महापौर मुक्ता टिळक, मेजर जनरल (निवृत्त) शिशीर महाजन, स्वराधिश डॉ.भारत बालवल्ली, कर्नल (निवृत्त) विक्रम पत्की, जितेंद्र जोशी, पीयुष शहा, ए.पी.कुलकर्णी, शाळाप्रमुख सोहनलाल जैन, मुख्याध्यापिका आशा नागमोडे, सुनीता गजरमल, नितीन शेंडे, शुभदा तावरे, कुमार आणवेकर, मधुकर कदम, नरेंद्र व्यास, गौरी गाडगीळ आदी उपस्थित होते. राष्ट्रीय रायफल्स बटालियनच्या राजेश्वर सिंग यांनी हा आपुलकीचा फराळ स्विकारला. महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, देशासाठी कार्य करणा-या सैनिकांचे कार्य मोठे आहे. त्यामुळे त्यांना सलाम करीत त्यांच्या कामाची आठवण आपण प्रत्येकाने ठेवायला हवी. शिशीर महाजन म्हणाले, देशाच्या सिमांचे रक्षण लाखो जवान करीत आहेत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे जवान देशाच्या रक्षणाकरीता सज्ज असतात. त्यामुळे जवानांच्या कार्याचे स्मरण करुन आपणही सैन्यात सहभागी होण्याकरीता अपार मेहनत व कष्ट घ्यायला हवेत. पीयुष शहा म्हणाले, खाऊच्या पैशातून शालेय विद्यार्थ्यांनी सिमेवर लढणा-या जवानांना फराळ पाठवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. जवानांच्या कार्याचे स्मरण मुलांना रहावे आणि सैन्यात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, याकरीता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.
काश्मिरमधील सैनिकांकरीता चिमुकल्यांनी पाठविला आपुलकीचा फराळ
Team TNV October 13th, 2017 Posted In: Pune Express
Team TNV