पुणे : शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देणारे अनेक किल्ले महाराष्ट्रात आहेत. परंतु आज बहुतांश किल्ल्यांवर भग्न अवशेष दिसून येतात. हे अवशेष पाहताना पर्यटकांच्या मनात किल्ल्याविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. याच प्रश्नांचा विचार करून इतिहास प्रेमी मंडळ यावर्षी रायगड पूर्वी होता तसा… या विषयावरील प्रदर्शनातून रायगड किल्ल्याचा इतिहास लाईट आणि साऊंडच्या माध्यमातून पुणेकरांसमोर जिवंत करणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, 17 आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत होणार आहे, अशी माहिती इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी दिली.
किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम उपस्थित राहणार आहेत. तसेच लिंगाणा किल्ला 32 मिनीटात सर करणारे अनिल वाघ आणि आग्रा ते राजगड पायी प्रवास करणारे मारुती गोळे यांचा साहसवीर पुरस्कार देऊन विशेष गौरव केला जाणार आहे. रसिकांना या किल्ल्याची प्रतिकृती दि. 18 ते 23 आॅक्टोबर दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत पाहता येणार आहे.
प्रदर्शनात चाळीस फूट लांब व तीस फूट रुंद असा भव्य रायगडाचा माथा दाखविण्यात येणार आहे. यामध्ये नगारखाना, राजसभा, मनोरे, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर या प्रमुख इमारती आणि त्यांचा इतिहास उलगडला जाणार आहे. तसेच यावेळी विविध चित्रफितींच्या माध्यमातून रायगड किल्ल्याचे भौगोलिक व ऐतिहासिक दर्शन घडविण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर नगारखान्यापासून जगदिश्वराच्या मंदिरापर्यंत हत्तीवरून काढण्यात आलेल्या मिरवणूकीच्या प्रसंग साकारण्यात येणार आहे, हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. रायगडावरील इमारतींचे आर्किटेक्चर डिझाईन तयार करून वीस महाविद्यालयीन तरुणांनी विविध तज्ज्ञांकडून माहिती मिळवून या वास्तू साकारल्या आहेत. यासाठी डॉ. रमा लोहकरे आणि गोपाळराव चांदोरकर या इतिहास तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.
दिवाळी दुर्ग प्रतिकृती प्रदर्शन मागील १५ वर्षांपासून इतिहास प्रेमी मंडळ आयोजित करीत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहासातील कथा उलगडून दाखविणे, हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. आत्तापर्यंत प्रतापगडावर काय घडले?, पानिपतचा रणसंग्राम, उंबराखिंडीचे युद्ध अशा अनेक ऐतिहासिक कथांमधून मंडळाने आपला इतिहास प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविला आहे.