पुणे – आई होणे ही बायकांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. परंतु बहुविकलांग मुलांची आई असणे हे खूप अवघड असते. अशाप्रकारच्या विशेष मुलांची सेवा, सुश्रुशा करणे आणि यामध्ये समाधान मानणारी आईच असते. या मुलांना वाढविण्यासाठी खूप जिद्द, शक्ती, भावना पाहिजे. यावरुनच जीवनामधील कठीण प्रसंगाला आनंदाने सामोरे जाण्याची ताकद स्त्रियांमध्ये असते हे दिसून येते, असे मत ज्येष्ठ समाजसेविका प्रतिभाताई शाहू मोडक यांनी व्यक्त केले.
सदाशिव पेठेतील निनाद, पुणे संस्थेतर्फे वसुबारसनिमित्त शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या पाल्याचे संगोपन करून त्यांना वाढविणा-या तसेच सेवासदन दिलासा केंद्रातील १२ मातांचा व पाल्यांचा कृतज्ञता सन्मान सदाशिव पेठेतील फडके हॉल येथील कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका शुभदा जोशी, वनिता पिंगळे, शोभा शिंदे, सुनीती देशपांडे, सुनीता शिवणगे, उषा पारखी, सुचेता फासे, सीमा दाबके आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, उपरणे, गीतासार, भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरुप होते. कार्यक्रमाचे यंदा 20 वे वर्ष असून शकुंतला चौधरी आणि रजनी दहिवेलकर यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार प्रदान केले जातात.
प्रतिभाताई शाहू मोडक म्हणाल्या, वसुबारस हा दिवाळीतील पहिला दिवस. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करतात. गाय-वासरु म्हणजेच आई आणि मूल त्यामुळे हा सण आई आणि मुलाचा आहे. परंतु सध्या अनेक ठिकाणी स्त्री-भ्रूण हत्येबद्दल ऐकायला मिळते. मुलगा आणि मुलगी ही एका रथाची दोन चाके आहेत. मुली नसतील तर या विश्वाचा नाश होईल. मुलगी नसतील तर माता कोठून येणार आणि माता नसतील तर जगच संपेल, असेही त्यांनी सांगितले. शुभदा जोशी यांनी प्रास्ताविक केले. स्मिता केसरी यांनी सूत्रसंचालन केले.
*आदर्श माता पुरस्कारार्थी : वसुधा एकबोटे, नीलम कासार, पुष्पा रोकडे, माधुरी चव्हाण, छाया शिंदे, मालती निकम, वर्षा राक्षे, मेधा राऊत, दिपांजली गिरी, आशा कदम, नेत्रा खेडेकर, सुरेखा भगत, दिपाली सावंत या मातांना यावेळी सन्मानित करण्यात आले.