– तब्बल 5 हजार पणत्यांचा दीपोत्सव व आकर्षक रंगावली ; राष्ट्रीय कला अकादमीतर्फे आयोजन
पुणे : सामाजिक संदेशांसह आकर्षक रचनांनी सजलेल्या रांगोळ्या आणि तब्बल 5 हजार पणत्यांच्या लखलखाटात उजळलेल्या चतु:श्रृंगी देवी मंदिरात पाडव्यानिमित्त शेकडो भाविकांनी गर्दी केली. देवीच्या दरबारात ज्योतिबाच्या नावानं चांगभल… असे लिहित ज्योतिबाची सचित्र रंगावली रेखाटण्यात आली होती. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने दीपोत्सवात सहभागी होऊन उत्तम आरोग्य आणि सुख-शांतीकरीता देवीचरणी मनोभावे प्रार्थना करीत प्रगतीच्या प्रकाशपर्वाला प्रारंभ करण्याचा संकल्प यावेळी केला.
बलिप्रतिपदा आणि पाडव्यानिमित्त चतु:श्रृंगी देवस्थान येथे राष्ट्रीय कला अकादमीतर्फे दीपोत्सव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, नगरसेविका रेश्मा भोसले, सोनाली लांडगे, आदित्य माळवे, देवस्थानचे अध्यक्ष डॉ.गंगाधर अनगळ, सुहास अनगळ, देवेंद्र अनगळ, संजय मयेकर, अकादमीचे मंदार रांजेकर, रोमा लांडे, अमर लांडे, प्रतिक आथने, सागर राऊत, योगिनी बागडे आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा 16 वे वर्ष आहे.
सुनील गोडबोले म्हणाले, दिव्यांच्या तेजाप्रमाणे आपले भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे. अपार मेहनत आणि कष्ट यांच्या जोरावरच आपण यश मिळवू शकतो. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सध्या तरुणाई एकत्र येत असून ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. यामाध्यमातून समाजाच्या तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांना मदतीचा हात देणे शक्य होत आहे, असेही त्यांनी सांगितले.