पुणे – गृहिणी असलेल्या पुण्याच्या श्रेया तुपे यांनी उल्लेखनीय सादरीकरण करत ‘मिसेस महाराष्ट्र 2017’वर आपले नाव कोरले. गृहिणी असूनही सासूबाईंसह कुटुंबातील सर्वांकडूनच प्रोत्साहन मिळाल्याने हा सन्मान मिळवू शकले, अशी भावना श्रेया तुपे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
याप्रसंगी श्रेया यांचे पती आणि कृष्णाई वॉटर पार्कचे संचालक अभिषेक तुपे, सासूबाई रत्नमाला तुपे, सासरे सुभाष तुपे, दिवा पेजेंटचे अंजना मास्कारेन्हास आणि कार्ल मास्कारेन्हास व श्रद्धा रामदास आदी उपस्थित होते. दिवा पेजेंट आणि महाराष्ट्र वनतर्फे ‘मिसेस महाराष्ट्र 2017’ स्पर्धेचे पुण्यात नुकतेच आयोजन करण्यात आले होते. घर सांभाळतानाही आपण महिला सक्षमपणे आपल्यातील कलागुणांना वाव देऊ शकतो, हे या स्पर्धेतून सिद्ध झाले.
राज्यभरातून 40 स्पर्धक अंतिम फेरीत दाखल झाले होते. तत्पूर्वी, राज्यातून पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर येथून निवड चाचणी घेण्यात आली होती. जवळपास 300 महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ओळख परेड, रॅम्प वॉक, प्रश्नोत्तरे आदी निकषांवर ही निवड करण्यात येते. 20 ते 34 वयोगटातील या महिला होत्या. श्रेया या पुण्यातील तुपे कुटुंबाच्या सून असून, त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. तुपे कुटुंबाने श्रेया यांना स्पर्धेसाठी पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले.
या यशाबद्दल श्रेया तुपे म्हणाल्या, “कुटुंबाचा पाठिंबा आणि अंजना मॅडम व कार्ल सर यांच्या मार्गदर्शनामुळे हा किताब पटकावू शकले. माझ्यातील घरात बसलेली स्त्री त्यांनी बाहेर काढली. या यशामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. यापुढे आता मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्ससाठी उत्सुक आहे.”