पुणे – राधे कृष्ण, गोपाल कृष्ण…चा अखंड जयघोष, शुभमंगल सावधान् चे स्वर कानी पडताच वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणा-या पारंपरिक वेशातील महिला आणि डोक्यावर कृष्णाची मूर्ती व तुलसीवृदांवन घेऊन काढलेली वरात… अशा थाटात पारंपरिक पद्धतीने तुलसीविवाह सोहळा पार पडला. एरवी वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी उत्सुक असलेल्या व-हाडी मंडळींनी आज चक्क श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळ्यानंतर देवाच्याच चरणी नतमस्तक होत, उत्तम आरोग्य व सुखी समाज याकरीता प्रार्थना केली.
निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुलसीविवाह सोहळ्याचे. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, राजाभाऊ घोडके, उल्हास भट, बाळासाहेब सातपुते, संगीता रासने यांसह महिलावर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे यंदा ३५ वे वर्ष होते.
दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. चौका-चौकात मिरवणुकीचे स्वागत करीत श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत फुगडया घालत फेर धरुन महिलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. प्रभात बँड आणि दरबार ब्रास बँड देखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. रांगोळीच्या पायघडयांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. दरवर्षी गणेश मंदिरामध्ये महिनाभर सुरु असलेल्या काकड आरतीचा समारोप या विवाह सोहळ्याने होतो. दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचा समारोप समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात झाला. त्यानंतर आयोजित विवाहसोहळ्याला पुणेकरांनी मोठया संख्येने हजेरी लावली.