पुणे – उपसा जलसिंचन योजनेसह कृषीपंपधारक शेतकऱ्यांच्या थकबाकीमुक्तीसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत जून 2017 चे त्रैमासिक चालू वीजबिल येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत भरून सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत दि. 31 मार्च 2017 पूर्वी असलेल्या मूळ थकबाकीचा हप्त्यांनी भरणा केल्यास व्याज व दंड माफ केले जाणार आहे. त्यासाठी कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी जून 2017 चे त्रैमासिक वीजबिल येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत भरून योजनेत सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. यानंतर योजनेत सहभागी न झालेल्या कृषीपंपधारकांकडून नियमानुसार थकबाकी वसुली किंवा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होणार आहे.
योजनेनुसार ग्राहकांची 31 मार्च 2017 पूर्वी मूळ थकबाकी 30 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास 5 समान हप्ते प्रत्येक तीन महिन्यांच्या कालावधीत तर 30 हजारांपेक्षा अधिक थकबाकी असल्यास समान 10 हप्ते प्रत्येकी दीड महिन्यांच्या कालावधीत भरावे लागणार आहे. ज्या प्रमाणात पाच /दहा समान हप्ते कृषीग्राहक वेळेवर भरतील त्याच प्रमाणात कृषीपंप ग्राहकांचे व्याज व दंडनीय आकार माफ करण्याबाबत शासनाकडून विचार करण्यात येईल. या योजनेचा फायदा घेण्यासाठी माहे मार्च 2017 अखेरची मूळ थकबाकी येत्या 31 डिसेंबर 2018 पूर्वी दिलेल्या मुदतीत चालू देयकांसहीत भरणे बंधनकारक आहे. याशिवाय 1 एप्रिल 2017 नंतरची सर्व चालू वीजबिलांचा भरणा करणेही आवश्यक आहे.
ज्या शेतकर्यांनी या योजनेत सहभाग घेतला नाही किंवा योजनेअंतर्गत ठरविण्यात आलेल्या रक्कमेचा भरणा केला नाही त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येईल व संबंधीत ग्राहकांकडून व्याज व दंडासहीत थकबाकी नियमानुसार वसुल करण्यात येणार आहे. पुणे परिमंडलातील थकबाकीदार कृषीपंपधारकांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त व्हावे तसेच महिती घेण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन असे आवाहन महावितरणने केले आहे.