पुणे – दिव्यांनी उजळलेले यादवकालीन त्रिशुंड्या गणपती मंदिर….तांडवनृत्य, भरतनाट्यम् आणि कथक या प्राचीन नृत्यशैलीतून उलगडलेला शास्त्रीय नृत्याचा आविष्कार… पुरातन मंदीर आणि प्राचीन नृत्यकलेचा झालेला अप्रतिम समन्वय… अशा मंगलमय वातावरणात दीपनृत्याच्या कलाविष्काराने त्रिशुंड्या गणपती मंदिरात नवे चैतन्य निर्माण झाले.
साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त सोमवार पेठेतील अठराव्या शतकातील यादवकालीन त्रिशुंड्या गणपतीच्या प्राचीन मंदिरात मन मंदिरा तेजाने या दीपनृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नू. म. वि. प्राथमिक शाळा, भव नृत्यालय यामधील सलोनी पालशेतकर, अनुष्का पालशेतकर, आर्यन शेलार या विद्याथर््यांनी नृत्यप्रकारांचे आणि स्मिता जोशी यांनी गीतांचे सादरीकरण केले. साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयुष शहा,नगरसेवक योगेश समेळ, संकेत निंबाळकर, अभिजीत धोंडफळे, मुख्याध्यापिका आशा नागमोडे, मंजिरी वैद्य, स्मिता जोशी, भाऊ आदमणे, साहील केळकर, अक्षता व्यास, स्वाती रजपूत, दिलीप नाईक आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना पीयुष शहा यांची होती.
कार्यक्रमाची सुरुवात ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था… या कथक नृत्याने झाली. कि बोल हर हर… या तांडवनृत्यप्रकार आणि मंगलम् गणेशम् या दीपनृत्यान शिल्पाकिंत राऊळात चैतन्य निर्माण केले. शुभम् कुरुत्वम् कल्याणम्… या कथक नृत्यप्रकाराच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली. भरतनाट्यम् नृत्यप्रकारातील तोडा, पुष्पांजलीचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले.
पीयुष शहा म्हणाले, प्राचीन काळात अनेक शास्त्रीय नृत्यकलाप्रकार मंदिरांसमोर सादर केले जात असत. भारतीय संस्कृतीतील भरतनाट्यम् , कथक हे नृत्यप्रकार प्राचीन मंदिरासमोर सादर व्हावेत, यासाठी अठराव्या शतकातील यादवकालीन त्रिशुंड्या गणपती मंदिरामध्ये त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दीपनृत्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.