पुणे – पुणे परिमंडलात 7419 कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी नवीन वीजजोडणी घेतल्यापासून वीजबिलच भरले नसल्याचे समोर आले आहे. या कृषीपंपधारकांकडे सध्या 19 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी आहे. परंतु, दुसरीकडे 38,620 कृषीपंपधारक शेतकरी नियमित वीजबिल भरीत असल्याने ते थकबाकीमुक्त असल्याची स्थिती आहे.
दरम्यान गेल्या तीन वर्षात पुणे परिमंडलाचे कार्यक्षेत्र असलेल्या हवेली, खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांत 13,384 कृषीपंपांना नवीन वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत तर सद्यस्थितीत 2940 पेडपेडींग यादीतील कृषीपंपांना विविध योजनांमधून वीजजोडण्या देण्यात येत आहेत.
सद्यस्थितीत वीजपुरवठा सुरु असणारे एकूण 1,22,700 कृषीपंपधारक वीजग्राहक पुणे परिमंडलात आहेत. त्यापैकी 84 हजार 80 कृषीपंपधारकांकडे वीजबिलांचे 226 कोटी 63 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांमधील 7419 कृषीपंपधारकांनी नवीन वीजजोडणी घेतल्यापासून एकही वीजबिल भरले नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे सद्यस्थितीत 19 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी आहे.
एका कृषीपंपाला वीजजोडणी देण्यासाठी सरासरी 1 लाख 16 हजार रुपये खर्च येतो हे विशेष. मात्र (कंसात थकबाकी) मावळ, खेड तालुक्यातील 2341 (7 कोटी 47 लाख), जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील 3148 (7 कोटी 92 लाख) तर मुळशी व हवेली तालुक्यातील 1930 (3 कोटी 80 लाख) कृषीपंपधारकांनी वीजजोडणी घेतल्यानंतर वीजबिलच भरलेले नाही, असे दिसून आले आहे. याउलट पुणे परिमंडलात सद्यस्थितीत नियमित वीजबिल भरणार्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांची संख्या 38,620 असून ते थकबाकीमुक्त आहेत हे उल्लेखनीय. गेल्या तीन वर्षांत पुणे परिमंडलात एकूण 13,384 कृषीपंपांना 30 सप्टेंबरपर्यंत नवीन वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. सध्या 2940 कृषीपंपांना विविध योजनांच्या माध्यमातून वीजजोडण्या देण्याची कार्यवाही सुरु आहे.