पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातील भाषणे पुस्तकरूपाने मराठीत उपलब्ध होत आहेत. ‘मन की बात मराठी भाग १’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (5 नोव्हेंबर) होत असून मा. राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे.
भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आणि नवभारत संकल्प-सिध्दी अभियान या संस्थांतर्ङ्गे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मन की बात’ हे पुस्तक तयार करण्यात आले असून प्रकाशन समारंभात राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांचे मुख्य भाषण होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे यांची समारंभात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रविवारी बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
आकाशवाणीच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधण्याच्या उपक्रमाला मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2014 मध्ये प्रारंभ केला. पुस्तकाच्या पहिल्या भागात ऑगस्ट 2016 पर्यंत झालेल्या तेवीस भाषणांचा मराठी अनुवाद देण्यात आला आहे. ‘मन की बात’मधील भाषणांच्या प्रादेशिक भाषांमधील अनुवादाचे हे पहिलेच पुस्तक असल्याची माहिती नवभारत संकल्प-सिध्दी अभियानाचे समन्वयक योगेश गोगावले यांनी दिली