पुणे – खडकी ते लोणावळा या परिसरातील सर्व फोटोग्राफर्स, व्हिडीओग्राफर्स, स्टुडीओ ओनर्स, डिझायनर्स, हौशी फोटोग्राफर्स आणि सर्व मिडीया क्षेत्रातील फोटोग्राफर्स यांच्या व्यवसायीक अडीअडचणींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने फोटोग्राफर्स फाऊंडेशन ऑफ पिंपरी चिंचवड या संस्थेची स्थापना नुकतीच करण्यात आली.
पिंपरी, कामगार भवन येथील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुंबईतील ज्येष्ठ फोटोग्राफर पराग शिंदे, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पासलकर, उपाध्यक्ष हेमंत मिश्रा, सचिव प्रमोद भोसे, कार्याध्यक्ष संजय भोंडवे, खजिनदार संन्याल शिंदे, कार्यकारीणी सदस्य किरण ढमढेरे, विनोद कदम, ज्येष्ठ छायाचित्रकार गुरुदास भोंडवे, जगदिश भगताणी, जे. फर्नांडिस, पुणे फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अभय कापरे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ फोटोग्राफर पराग शिंदे म्हणाले की, फोटोग्राफर हा उत्कृष्ट कलाकार असतो. व्यक्तींच्या मनातील भावना योग्य वेळी कॅमेरात टिपून सुंदर छायाचित्रं घेण्याची कला ज्याला अवगत आहे. असा कलाकार कधीही मागे राहणार नाही. या नविन तंत्रज्ञानाला कष्ट, प्रयत्न व भांडवलाची जोड दिल्यास फोटोग्राफर देखिल अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देऊ शकतो. वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान, साधनांचा सुळसुळाट, शासनाचे वेळोवेळी बदलणारे नियम व धोरणे यामुळे फोटोग्राफी व्यवसायात तीव्र स्पर्धा वाढत असतानाही यात अनेक संधी देखिल उपलब्ध होत आहेत असे शिंदे म्हणाले.
उपाध्यक्ष हेमंत मिश्रा प्रास्ताविकात म्हणाले की, शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, पर्यटन अशा विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणे. तसेच या क्षेत्रातील सर्व संबंधितांचे संघटन करुन त्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न फाऊंडेशन करणार आहे. तसेच फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी विषयी समाजात जनजागृती करुन विविध स्पर्धात्मक कार्यक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. सर्व प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे. व्यवसाय वृध्दीसाठी वेळोवेळी चर्चासत्र, मार्गदर्शन शिबीरे, व्याख्याने आयोजित करणे. संस्थेच्या सभासदांना व त्यांच्या कुंटूंबियांना विविध शासकीय योजनांचा व संस्थेने आयोजित केलेला प्रकल्पांचा (उदा. इन्शुरन्स, प्रदर्शने, इक्किपमेंट खरेदी इ.) लाभ मिळून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहिल. संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये ही संस्था सहाय्यक संस्था निबंध पुणे येथे नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात पुणे असून आगामी काळात संपुर्ण महाराष्ट्रात सामाजित कार्य करण्याचा उद्देश आहे. इच्छुकांनी प्रशांत (9422005527), हेमंत (8928311417), संजय (8806239900) यांच्याशी संपर्क साधावा.
स्वागत प्रशांत पासलकर, सुत्रसंचालन संजय भोंडवे आणि आभार प्रमोद भोसे यांनी मानले.