पुणे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडीयाची घोषणा केल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना गतीमान झाल्या. शासनाने राबविलेल्या ई-गव्हर्नन्स धोरणामुळे मला दि. 6 सप्टेबर 2016 रोजी कोंढवा खुर्द येथे कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) उघडण्याची संधी मिळाली. या माध्यमातून सामान्य लोकांना मी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देत आहे. या माध्यमातून मला रोजगार तर मिळालाच परंतु सामान्य लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याने परमार्थही साधता आल्याची भावना रईसा राज फय्याज यांनी व्यक्त केली. त्यांची ही यशोगाथा इतर महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
कोंढवा खुर्द येथे राहणाऱ्या रईसा राज फैय्याज यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत स्वयंरोजगाराची वाट निर्माण केली आहे. आपल्या यशस्वी प्रवासाबद्दल त्या म्हणतात, माझे पती रिक्षाचालक होते. ऱ्हदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती, त्यातच दहावी पर्यंत शिक्षण आणि पदरात दोन मुले अशी माझी स्थिती होती. सुरूवातीला उदरनिर्वाहासाठी लहान मुलांचे शिकवणी वर्ग घ्यायला सुरुवात केली. घरच्या परिस्थितीमुळे आणि लग्नानंतरच्या कौटुंबिक जबाबदारीमुळे हुशार असूनही माझे शिक्षणही थांबले होते. मात्र शिकवणी वर्ग घेत असतानाच मी बारावी, पदवी आणि नंतर कॉम्प्युटर डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. माझ्या बरोबरच आजूबाजूच्या महिला व मुलींना संगणक साक्षरतेचे धडे द्यायला सुरूवात केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजीटल इंडियाची घोषणा केली, त्यानंतर खऱ्या अर्थाने देशासह राज्यात डिजीटल धोरणाचे वारे वाहू लागले. शासनाने राबविलेल्या ई-गव्हर्नन्स धोरणामुळे मला दि. 6 सप्टेबर 2016 रोजी कोंढवा खुर्द येथे कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) उघडण्याची संधी मिळाली. या माध्यमातून सामान्य लोकांना मी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देत आहे. याच कालावधीत पुण्यात झालेल्या डिजी धन मेळाव्यात माझ्या कामाचे कौतुक झाले. सन 2015-16 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने मला 13 आधारकार्ड मशीन मिळाल्या. जिल्ह्यातील वेल्हा, जुन्नर, मंचर, हवेली तालुक्यात शिबीरे घेवून अनेक लोकांना आधारकार्डांचे वितरण केले. यामध्ये मला चांगला फायदा झाला.
आता माझ्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून शासकीय दाखले, जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, नॉन-क्रिमिलियर दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदींसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लोकांना उपलब्ध करून दिला. याच बरोबर केंद्र सरकारचा “दिशा” संगणक साक्षरतेचा कोर्स आला आहे. या कोर्सचा लाभ अनेकांना मिळावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. शासनाच्या कॅशलेस इकॉनॉमीचे स्वप्न साकार करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. इतर महिलांनीही शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेवून स्वत: पायावर उभे राहावे, असे त्या आवर्जुन सांगतात.