पुणे – पुण्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु विसर्जन मिरवणूक झाली की पुढच्या गणेशोत्सवालाच सर्व कार्यकर्ते एकत्र येतात. परंतु काही गणेशोत्सव मंडळे वर्षभर समाजासाठी काम करीत असतात. त्यामुळे समाजातील गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचते. गणेशोत्सव मंडळाचे हे सामाजिक योगदान मोठे आहे. त्यामुळे गणेशोत्सव ही एक सामाजिक परंपरा आहे, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
अकरा मारुती चौक गणेशोत्सव मंडळ, सत्येश्वर मित्र मंडळ, राष्ट्रीय कला अकादमी न्यास यांच्यावतीने कै. विनायक महादेव रेणुसे यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता सेवा पुरस्कार मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष विनायक घाटे, वैभव रेणुसे, संकेत जाधव, मिलिंद घाटे, कौस्तुभ वैद्य, ऋषी घाटे, सिद्धेश घाटे, प्रथमेश घाटे आदी यावेळी उपस्थित होते.
लुई ब्रेल अंध अपंग कल्याणाकारी संस्थेच्या नुतन केंद्रे आणि वंचित विकास संस्थेच्या आरती तरटे यांना कृतज्ञता सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुणे महानगरपालिकेच्या कोटणीस दवाखान्यातील महिला कर्मचारी आणि पुरुष सेवार्थींचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला.
आनंद सराफ म्हणाले, समाजासाठी झटणारे अनेक हात आहेत. त्यांची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे ही देखील एक सेवाच आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दवाखाने या ठिकाणी काम करताना कर्मचारी आपले कुटुंब मागे ठेऊन अतिशय सेवाभावाने आपले कर्तव्य निभावत असतात. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.