पुणे – पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर व सांगली जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 18 लाख वीजग्राहकांकडून थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी महावितरण 15 नोव्हेंबरपर्यंत विशेष वीजतोड मोहीम राबविणार आहेत.
वीजबिल भरा अन्यथा बत्ती गूल होणारच हा संदेश थकबाकीदारांना देत पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे अधिकारी व कर्मचारी शेकडोंच्या संख्येत एकत्रितपणे या मोहीमेची मंगळवारी (दि. 7) सुरवात करीत आहेत.
वारंवार आवाहन केल्यानंतरही पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 18 लाख 11 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे 289 कोटी 51 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी पुढील आठ दिवस महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी जास्तीत जास्त संख्येत एकत्रितपणे पथक तयार करून धडक कारवाईला सुरवात करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी सोमवारी (दि. 06) प्रकाशभवन येथे आयोजित बैठकीत दिले. यावेळी मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे (पुणे), श्री. नागनाथ इरवाडकर (बारामती) व श्री. किशोर परदेशी (कोल्हापूर) यांची उपस्थिती होती.
मंगळवारी (दि. 7) सकाळी 9 वाजता महावितरणचे पश्चिम महाराष्ट्रातील हजारोंच्या संख्येत असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी संबंधीत कार्यालयात जमा होऊन थकबाकीदारांविरोधात वीजतोड मोहीमेला लगेचच सुरवात करणार आहे. थकबाकीदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे अशा परिसरांत, गावांत, सोसायटींमध्ये एकत्रितपणे फेरी काढून थकीत बिल भरा अन्यथा बत्ती गूल होणारच असा संदेश देत त्वरीत वीजतोड मोहीमेस सुरवात करणार आहेत. तसेच प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्यासह सर्व मुख्य अभियंता विविध ठिकाणी दौरे करून या मोहिमेला अधिक आक्रमक करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तर थेट अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी तसेच हजारो कर्मचारी मोहिमेत सहभागी होणार असून येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत सुटींच्या दिवशीही ही कारवाई सुरु राहणार आहे. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
येत्या आठ दिवसांत सुमारे 18 लाख थकबाकीदारांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहिमेची महावितरणने तयारी केलेली आहे. थकीत वीजबिलांचा भरणा केला नाही तर संबंधीत ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणचे पथक खंडित करणार आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्गांसह व घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.